नाट्यपंढरीतला लखलखता प्रकाश....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019   
Total Views |



तुम्हाला नाटक आवडते की, एकपात्री प्रयोग? रंगमंचावर सादर करण्यासाठी नाटक अधिक आव्हानात्मक की एकपात्री प्रयोग? बहुतेकजण नाटकाला पसंती देतील, तर काहीजण एकपात्री प्रयोगाला. पण, खरे पाहता दोन्ही कलाविष्कारांत मंचावरील कलाकारांचा कला सादर करतेवेळी नेहमीच कस लागतो अन् वेगवेगळ्या कलाकृतीतून तो आपल्याला दिसतोही. आपल्या अंगभूत कलेला नाट्य, एकपात्री प्रयोग, काव्य आणि लेखनाद्वारे विविध रंगात भिनवणारे असेच एक नाट्यपंढरीतले हरहुन्नरी अभिनेते म्हणजे श्रीप्रकाश सप्रे.


महाविद्यालयीन काळापासून आज वयाच्या 64व्या वर्षीही रसिकांच्या मनोरंजनासाठी धडपडणारे कलाकार म्हणजेच श्रीप्रकाश सप्रे. आयुष्याचा सर्वाधिक काळ पुण्यात व्यतीत केलेल्या श्रीप्रकाश सप्रे यांनी अनेकानेक नाटकांचे हजारो प्रयोग केले. नंतर स्वतःच लिहिलेल्या संहितेवर आधारित ‘सप्रेम नमस्कार’ या एकपात्रीचेही शेकडो प्रयोग केले. रंगमंचाव्यतिरिक्त श्रीप्रकाश सप्रे यांनी आपली काव्यलेखनाची आणि मासिकांत, दिवाळी अंकात निरनिराळ्या विषयांवर लिहिण्याची आवडही जोपासली. आता येत्या गुढीपाडवा ते श्रीरामनवमी उत्सवानिमित्त ते आपला ‘सप्रेम नमस्कार’ हा एकपात्री प्रयोग काळाराम मंदिर ट्रस्टच्या निमंत्रणावरून अयोध्येतही सादर करणार आहेत. अशाप्रकारे गेल्या तीन-चार वर्षांपासून ते इथे जातात आणि एका आगळ्यावेगळ्या प्रकारे श्रीरामाची व भक्तांचीही सेवा करत आहेत. श्रीप्रकाश सप्रे यांचा जन्म 1955 साली पुण्यात झाला. वडील अ‍ॅम्युनेशन डेपोमध्ये नोकरीला, तर आई गृहिणी. वडिलांना सरकारी नोकरी असल्याने घरची परिस्थिती ठीकठाकच. तसे पाहता बालपणाची मजाही घेता आली. पुण्यातल्याच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले, तर सर परशुरामभाऊ महविद्यालयात पुढील शिक्षण. मात्र, बीएच्या पहिल्या वर्षानंतरच शिक्षणाची नावड म्हणा किंवा नोकरीची निकड म्हणा, त्यांनी शिक्षण सोडले आणि कामाला सुरुवात केली. नंतर श्रीप्रकाश यांनी कितीतरी ठिकाणी नोकऱ्या केल्या, सोडल्या, पुन्हा केल्या आणि अखेर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पण, श्रीप्रकाश यांना नाटकाची आवड कशी निर्माण झाली? तर श्रीप्रकाश यांचे काका कर्‍हाडच्या साखर कारखान्यात नोकरीला होते. तेव्हा कर्‍हाडसारख्या शहरात नाटककंपनी, थिएटर वगैरे नसल्याने गणपती मंडळ वा अन्य सार्वजनिक सण-उत्सव, जयंतीनिमित्त नाटक ठरवण्यासाठी पुण्याला येत व भावाकडे म्हणजेच श्रीप्रकाश यांच्या घरीच थांबत असत. तेव्हा आपल्या काकांबरोबर बालगंधर्व रंगमंदिर वा अन्य ठिकाणी नाटकमंडळी, नाटक कंपनीत ते जात. याचवेळी नाटक सुरू असताना कलाकारांची कला श्रीप्रकाश सप्रे यांना पाहता आली. ते वातावरण त्यांनी पाहिले आणि त्यांना ते आवडू लागले. मात्र, नाटकात प्रत्यक्ष काम करण्याचा योग काही येत नव्हता.

 

नाटक सादर करायचे तर एखाद्या नाटक कंपनी, नाटक मंडळी वा हौशी गटाशी जोडले जाणे गरजेचे होते. पण, तेही जमत नव्हते. म्हणून शिक्षण सोडल्यानंतर त्यांनी नोकऱ्या करताकरताच आपल्यालाही नाटक व आपली कला रसिक प्रेक्षकांपुढे घेऊन जाता यावी म्हणून 1978च्या गुढीपाडव्याला ‘अक्षय थिएटर’ नावाने स्वतःचीच संस्था सुरू केली. आज गेली 42 वर्षे श्रीप्रकाश सप्रे याच संस्थेच्या माध्यमातून नाटक सादर करत आहेत. सप्रे यांनी आपले पहिले नाटक सादर केले, ते कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धांतून, इथेच बरीच बक्षिसेही मिळवली. जवळपास चार-पाच वर्षे त्यांनी कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कितीतरी नाटके केली. पण, कामगार कल्याण मंडळाचे नाटक असले तरी ते भरपूर गाजायचे, प्रेक्षकांची वाहवाही मिळायची, मात्र उत्पन्न काही मिळत नसे. म्हणून मग रोजचा खर्च भागवण्यासाठी स्पर्धांतील नाटकांची तिकिटविक्रीही त्यांनी केली. कारण, कलाकारांना मानधन देणे तर गरजेचे होते, कोणी मोफत काम तर करू शकत नव्हते किंवा तशी अपेक्षाही नव्हती. कामगार कल्याण मंडळाच्या नाटकांतून श्रीप्रकाश सप्रे यांचे जसे नाव होऊ लागले तसे त्यांना अन्यत्रही निमंत्रणे येऊ लागली. पुणे आणि पुण्याबाहेरही दौरे सुरू झाले, पण नोकरी करत असल्याने नाटकाच्या दौऱ्यावेळी सुट्ट्यांवरून घासाघीस होतच असे. म्हणून ते टाळण्यासाठी त्यांनी नोकरीच सोडली. पण, नोकरी सोडली तरी पोटापाण्यासाठी काहीतरी करणे भाग होते, केवळ नाटके करून पोट भरणार नव्हते. म्हणून त्यांनी शाळा-विद्यालयांना फळे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. जवळपास 28 वर्षे त्यांनी नाटकांच्या साथीने हा व्यवसाय केला आणि 2016 साली बंद केला. पण, नाटक मात्र सुरूच ठेवले.

 

यशाचा मूलमंत्र

नाटक किंवा एकपात्री कलेला ‘प्रयोग’ म्हणतात, कारण तिथे प्रत्येक कलाकाराला आपली कला अधिकाधिक उत्तम प्रकारे सादर करण्याची संधी उपलब्ध असते. म्हणजे चित्रपट वा दूरचित्रवाणी मालिकेसारखे इथे नसते, तर आपल्याच अभिनयाचा अभ्यास करून कलाकार नव्याने अभिनय करू शकतो, संवाद फेकू शकतो. हाच नाट्यकारकिर्दीतील यशाचा मूलमंत्रही आहे.

 

प्रसिद्ध नाट्य-सिने कलाकार शरद तळवलकर हे श्रीप्रकाश सप्रे यांचे गुरू. श्रीप्रकाश यांनी अभिनयाचे धडे तळवलकरांकडूनच गिरवले, परिणामी त्यांचे नाणे नेहमीच खणखणीत वाजले. शरद तळवलकरांच्या जोडीने त्यांनी ‘वरचा मजला रिकामा,’ ‘सखी शेजारणी,’ ‘बिनधास्त’ यासह आणखीही बरीच नाटके केली, तर निळू फुले यांच्याबरोबर ‘राजकारण गेलं चुलीत,’ यशवंत दत्त यांच्याबरोबर ‘बिनपैशाचा तमाशा,’ तसेच ‘मृच्छकटिक,’ ‘कट्यार काळजात घुसली’ ही संगीत नाटके, ‘प्रतापगड,’ ‘आपलं बुवा असं आहे,’ ‘जोडी हिंदुस्थानी’ यांसारख्या 52 हून अधिक नाटकांत प्रमुख अभिनेता म्हणून काम केले. श्रीप्रकाश सप्रे यांनी आतापर्यंत या सगळ्याच नाटकांचे राज्यासह संपूर्ण भारतभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे तिथे सहा हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले. सोबतच ‘आकाशाची फळे,’ ‘कथाकथी,’ ‘टोकन नं.,’ ‘नूपुर,’ ‘साईबाबा आणि मोरया गोसावी’ या मराठी तर ‘आकाशदीप’ आणि ‘रेशमी धागे’ या हिंदी दूरचित्रवाणी मालिकांतही भूमिका साकारल्या. एका बाजूला अन्य लेखकांच्या कलाकृती, नाटके, संहितांतून अभिनय करतानाच श्रीप्रकाश सप्रे एकपात्री प्रयोगही पाहत असत. तेव्हा ‘आपणही एखादा एकपात्री प्रयोग केला तर...’ असा विचार त्यांनी केला आणि त्यातूनच जन्म झाला ‘सप्रेम नमस्कार’ या धमाल प्रयोगाचा! खुसखुशीत विनोद, विडंबन, चारोळ्या, संगीत, अंताक्षरी, काव्य आणि त्यात लपलेल्या एखाद्या संदेशाच्या आधारावरील हा प्रयोगही प्रचंड गाजला. गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या ‘सप्रेम नमस्कार’चेदेखील महाराष्ट्रासह भारतात आजपर्यंत 650 पेक्षा अधिक प्रयोग झाले. यासोबतच ‘थापेने मारली थप्पड’ हा एकपात्री प्रयोगदेखील श्रीप्रकाश सप्रे करतात. दोन्ही प्रयोगांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.

 

नाटक व एकपात्री प्रयोगातील फरकाबाबत श्रीप्रकाश सांगतात की, “दोन्ही कला या जिवंत कला आहेत. पण, नाटकामध्ये प्रेक्षकांचे लक्ष एकाचवेळी दोन, तीन, चार, पाच... कितीही कलाकारांवर सतत वळत असते. त्यामुळे एखादा चुकला तरी दुसरा त्याला सावरू शकतो. मात्र, एकपात्री प्रयोगात तशी संधीच नसते. समोर बसलेला शेकडो, हजारोंचा जनसागर मंचावर केवळ एका व्यक्तीला पाहत असतो आणि त्याला प्रेक्षकांवर नियंत्रणही ठेवायचे असते. म्हणून नाटकापेक्षा एकपात्री प्रयोग अधिक आव्हानात्मक वाटतो.” कलाकार आपली कला सादर करतो, पण त्याची दखल ही केवळ प्रेक्षकच नव्हे तर परीक्षक, समीक्षकही घेतात व त्यातूनच पुरस्कारांवरही त्यांचे नाव कोरले जाते. श्रीप्रकाश सप्रे यांनाही अनेकानेक पुरस्कार मिळाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कै. गंगाधर लोंढे स्मृती पुरस्कार, कै. ताई घाणेकर स्मृती मंचाचा राष्ट्रगौरव पुरस्कार, बालगंधर्व परिवार पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा विनोदी कलाकारासाठीचा कै. वसंत शिंदे स्मृती पुरस्कार हे त्यापैकी विशेष उल्लेखनीय पुरस्कार. केवळ पुरस्कारच नव्हे, तर गेल्या तीन वर्षांपासून श्रीप्रकाश सप्रे यांना अखिल भारतीय नाट्यसंमेलनातही आपल्या एकपात्री प्रयोगाची झलक दाखवता आली. यंदाच्या 99व्या नाट्य संमेलनातही त्यांनी ‘सप्रेम नमस्कार’चा प्रयोग सादर केला. श्रीप्रकाश सप्रे यांची कला केवळ अभिनय, नाट्य वा एकपात्री प्रयोगापुरतीच मर्यादित नाही, तर ते स्वतः कविताही करतात, म्हणूनच ‘मशाल’ या युट्यूब चॅनलवरील कविसंमेलनातही त्यांनी भाग घेतला. सोबतच ‘वास्तुविचार,’ ‘उल्हास प्रभात,’ ‘चपराक’ आदी नियतकालिकांत व दिवाळी अंकातही ते वेगवेगळ्या विषयांवर लिहितात. अशा या हरहुन्नरी कलाकाराचे रसिकरंजनाचे काम अजूनही सुरूच आहे आणि पुढेही सुरूच राहणार, याबाबत शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@