भाषातज्ज्ञ डॉ. अविनाश बिनीवाले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019
Total Views |



मराठी, हिंदी, संस्कृत, सिंधी, गुजराती, बंगाली, आसामी या भारतीय भाषांबरोबरच इंग्रजी, जर्मन, रशियन, फ्रेंच या युरोपीय भाषांचे अभ्यासक असलेल्या अविनाश बिनिवाले यांच्याविषयी...


­­­

विविध प्रकारची नावं-आडनावं ऐकण्याची आता सवय झालीय. त्यावेळी आताच्या इतकी नव्हती. पण जरा काही वेगळं नाव वाटलं की लगेच तेव्हाही संशोधन सुरू व्हायचं. चर्चगेट ! पश्चिम लोहमार्गावरचे सुरुवातीचे स्थानक. सुरुवातीला त्यांच्या सरकारी निवासात अविनाशजींशी भेट झाली. ‘बिनी’चे म्हणजे आघाडीचे सरदार म्हणून ‘बिनीवाले’ असे त्यांचे आडनाव लक्षात आल्यावर एका ऐतिहासिक नावाच्या व्यक्तीबरोबर भेट झाल्याचं कुतूहल वाटलं होतं. साध्या सोप्या भाषेत गप्पा, शांत स्वभाव, अफाट, विविध प्रकारची माहिती अशा अनेक गुणांनी परिपूर्ण व्यक्तिमत्त्व. स्वाभाविक एका मोठ्या माणसाशी इतक्या मोकळ्यापणे मनसोक्त गप्पा मारण्याची तशी कदाचित पहिलीच वेळ असावी. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा यत्किंचितही स्वाभिमान, अभिमान, गर्व नसणारा माणूस माझ्यासारख्या साध्या सामान्य माणसाबरोबर इतक्या सोप्या शब्दात बोलतानाच ते बोलणं, गप्पा संपूच नयेत, असं वाटत होतं. १९९१ पासून पूर्वांचलाच्या कार्यात मी सहभागी झालो होतो. अविनाशजींचाही पूर्वांचलाशी जुना संबंध आहे, असे पहिल्या भेटीतच कळलं. त्यांनी इंफाळ विद्यापीठातून शिक्षकाचे कार्य केले आहे, असेही समजलं. स्वाभाविक त्यांना पूर्वांचलातील भरपूर माहिती होती. ‘भारत-चीन युद्धाची कथा’, ‘बोमदीला’, ‘आतंकवाद में झुलसता पूर्वांचल’ अशा पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले होते. आराधना प्रकाशनाने ती पुस्तकं प्रकाशितही केली. अविनाशजींनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसे, कोणत्या भाषेतून शिकवावं यावर एक अभ्यासक्रम तयार केला होता. प्रत्येक विषयाची शिकण्याची आपली एक स्वतंत्र भाषा असते. त्या भाषेतून शिकविल्यास विद्यार्थी आवडीने आणि जलद गतीने ग्रहण करू शकतात, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणजे गणित, इतिहास, विज्ञानासारखेही विषय शिकविण्याची एक आपली भाषा असते हे त्यांनी विविध उदाहरणातून पटवून दिले. मला सुरुवातीला गंमत वाटली पण हळूहळू त्यांच्या म्हणण्याचे गांभीर्य पटले. विषयाच्या भूमिकेत जाऊन शिकणे, हा त्यामागचा मथितार्थ होता. पूर्वांचलात जाऊन तेथील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा अविनाशजींचा मानस होता. रा. स्व. संघांचे पूर्वांचलातील कार्य हे अनेकांना माहीत आहेच. संघाच्या माध्यमातून चालणाऱ्या शाळांतील संबंधित प्रशिक्षण देण्याची प्राधान्यता त्यांनी बोलून दाखविली. तत्कालीन मुकुंदराव पणशीकर हे महाराष्ट्राचे प्रांत प्रचारक होते. त्यांना प्रत्यक्ष भेटून या विषयासंदर्भात सविस्तर चर्चा केली. कारण, महाराष्ट्र प्रांताद्वारे संघाच्या रचनेतून तेथील काही राज्य दत्तक घेतली होती. विविध प्रकारच्या योजना, निधी इ. संबंधित सहकार्य महाराष्ट्रातून होत होते.

 

मुकुंदरावांनी काही जणांचे संपर्क दिले पण अनेक आठवडे विषयांतर्गत कोणतीच पाऊले उचलली जात नव्हती. मग शेवटी त्यावेळचे आसाममधील प्रचारक मधुकरराव लिमये यांच्याशी संपर्क साधला व तोच विषय सविस्तर सांगितला. मधुजी “पाहूया” म्हणाले व “जेव्हा अविनाशजी गुवाहाटीत येतील तेव्हा प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलेन,” असे सांगितले. काही दिवसांनी अविनाशजी आसामात जाऊन मधुजींना भेटले व कल्पना सांगितली. पण का कोण जाणे प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नव्हती. शेवटी त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला व तेथील ‘विद्याभारती’च्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांच्या शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण द्यावयास सुरू केले. कोणत्याही प्रकारचे पगार, मानधन वा कोणताही प्रवास खर्च न घेता, स्वतःच्याच निधीतून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. अविनाशजींविषयीचा आदर वाढणे हे अगदी स्वाभाविक होते. त्यांच्याशी आता नियमित संपर्क सुरू झाला. कधी त्यांना चर्चगेटला जाऊन भेटणे, कधी फोनवरून, तर कधी ते माझ्या घरीही यायचे. काही वृत्तपत्रातून खासकरून भाषा विषयावर त्यांच्या लेखमाला प्रसिद्ध होत होत्या. मला त्यातले फारसे काही कळत नसतानादेखील माझ्याशी ते या विषयावर चर्चा करायचे, याची गंमत वाटायची. काही दिवसांनी मी मेघालयात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून गेलो, त्या दीड-दोन वर्षात त्यांच्याशी फारसा संपर्क नव्हता. मेघालयात असताना सुरुवातीच्या तीन महिन्यात मी बऱ्यापैकी खासी बोलायला शिकलो होतो. तेव्हा अविनाशजींची नक्कीच आठवण व्हायची. कारण, त्यांनी कळत नकळत पाजलेल्या छोट्या छोट्या ज्ञानामृतातून एक वेगळीच भाषा शिकणे सहज सोपे झाले होते. त्याच आधारावर मला आसामी, नागामिस, बंगाली या भाषा बऱ्यापैकी समजायला आणि बोलायला येऊ लागल्या. कालांतराने मुंबईत अस्वस्थ होऊन मी परत आलो होतो. डोळ्यासमोर दिसणाऱ्या आव्हानांवर नवनवीन कल्पनांच्या आधारे प्रयोग करणाऱ्या माझ्या स्वभावाला कोठेतरी पायबंद बसतोय, असे जाणवत होते आणि त्यातून काही न सांगण्याजोग्या इतर गोष्टी होत्या त्या वेगळ्याच, असो! १९९८ साली मुंबईत पुन्हा स्थिरावताना शाळेच्या कामात गुंतलो गेलो. तेथेही काही नवकल्पनांच्या आधारे विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. अविनाशजींचा उपक्रम तर मनात भरला होताच, पण कोणावरही कोणतीही गोष्ट लादणे हा माझा स्वभाव नसल्याने आमच्या शाळेत तो उपक्रम राबविण्यास सबुरीने घेत होतो. कार्यकरिणीशी, शिक्षकांशी या विषयावर चर्चा करूनही काही यश आले नव्हते. तसे मी मोकळेपणाने अविनाशजींना सांगितलेही होते. निवृत्तीनंतर अविनाशजी त्यांच्या पुण्यात, विश्रांतवाडीच्या घरी राहायला गेले. पण त्यांच्या तीनही मुली लग्नानंतर मुंबईतच राहत असल्याने त्यांना भेटायला त्यांचे आजही येणे होत असते. त्यानिमित्ताने मलाही त्यांचा फोन येत असतो आणि दोघांच्याही सवडीने आम्ही आजही भेटत असतो. अविनाशजींना मिळालेल्या भाषा विषयातील ‘तज्ज्ञ’ या पदवीच्या बातमीने मला खूप आनंद झाला. अविनाशजींनीच मला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कळवलं. इतक्या साध्या राहणीमानातून भाषेसाठी गेली चार तप मोलाचे कार्य करीत असलेल्या व्यक्तीची सर्वसामान्यांना माहिती व्हावी या हेतूने, आजपर्यंतचे माझ्या आठवणीतले अविनाशजींविषयी काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

 

अविनाशजींच्या अपरोक्ष मी अनेक जणांकडे त्यांच्याविषयी बोलतो. तेवढीच माझी कॉलर टाईट करून घेण्याचा मोह की, अशा मोठ्या व्यक्तीशी माझा परिचय आहे. असेच एकदा माझ्या एका पत्रकार मित्राबरोबर बोलणे झाल्यावर तो म्हणाला, “सध्या इंग्रजी शिकण्याची अनेकांना इच्छा आहे. आपण अविनाशजींचे इंग्रजी शिकण्याचे वर्ग सुरू करूया का ?”मी लगेच “हो” म्हटले. अविनाशजींशी संपर्क केला, त्यांनी सहमती दर्शविली आणि इंग्रजी शिकवणी वर्ग सुरूदेखील झाले. दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी त्या वर्गाच्या ठिकाणी अविनाशजींना अंधेरी स्थानकातून घेऊन जाताना माझा अजून एक अधिवक्ता मित्र वाटेत भेटला. मी त्याचा परिचय करून देण्याआधीच त्याने बरळायला सुरुवात केली. म्हणाला, “काय रे दया, तुम्ही कोणी बिनीवाले फेणीवाले म्हणून कोणाचे क्लासबिस चालू केलेत.” मी अगदी ओशाळून गेलो, पण अविनाशजींनी शांतपणे लगेच उत्तर दिले, “नमस्कार, हो मीच तो.” आमच्या अधिवक्ता मित्रालादेखील न देता शालजोडीतले मिळाले. अगदी हसतखेळत अशा घडलेल्या अनेक प्रसंगांना शांतपणे त्यांनी झेललं आहे. अविनाशजींनी एकदा ‘भाषांची मावशी’ या लेखमाला लिखाणाची सुरुवात केली होती. ते सुरू करण्याच्याही अगोदर आमच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. त्यांनी केलेल्या लिखाणाच्या प्रती मला मुंबईला येताना नेहमी आवर्जून वाचायला आणायचे. देशांतर्गत भाषांची कशी एकमेकांशी सुसंगती आहे याचे उदाहरणांसहित विश्लेषण दिलेलं होतं. शेवटी भाषांचेच वैद्य ते! या आठवणीवरून मला हल्लीच मराठी दिनानिमित्त एक कविता सुचली होती.

 

माय मराठी, बोली मराठी,

माझ्या मुखात गर्जे ही मर्दानी मराठी ॥

मालवणात माझ्या मालवणी मराठी,

कोकणात माझ्या कोंकणी मराठी,

अहिराणी ही माझीच मराठी

माझी धेडगुजरी मराठी,

पुण्यात माझ्या पुणेरी मराठी,

माझ्या घाटमाथ्यासी घाटी मराठी

बेळगावी माझ्या माझी झुंजते मराठी,

नागपुरासह विदर्भी विभक्ततेय मराठी,

शहरात तुमच्या आंग्लेत बाटतेय मराठी

खेड्यापाड्यातच माझ्या मुक्त श्वासात मराठी,

गरिबांच्याच पोरांची शाळा मराठी,

स्वाभिमानात माझ्या फक्त लखलखते मराठी

मारतो हाळी मी मराठी महाराष्ट्र मराठी,

घालतो पोरास्नी पण त्या शाळेत इंग्रजी,

धाडतो चाकरीस त्यांना त्या दूर परदेशी

माझी मावशी गुजराती, आत्या पंजाबी,

माझी काकी मैथिली तर पुतणी तामिळी,

असमियात बंगालीत ही माझी नातीगोती

देशांतर्गत भाषांतही सख्या नात्यांची सुसंगती

राष्ट्र उद्धारण्यास जपुया मायबोली मराठी,

सर्व भाषा सन्मान करते मराठी,

दोन भावना जपण्यास रसाळ माझी मराठी...

 

ही कविता सुचण्यामागे अविनाशजींच्या त्या भाषांची मावशी’ या लेखाची प्रेरणा निश्चितच होती. एल्फिन्स्टन महाविद्यालयात अविनाशजी जर्मन भाषेचे प्राध्यापक होते. ‘मराठीतून जर्मन शिका’ या प्रकाशित पुस्तकाची एक प्रत दाखवून त्यांनी जर्मनीत ‘गुटन मॉर्निंग, गुटन नाईट’ असे काही प्राथमिक शब्द पाच एक मिनिटातच शिकविले होते. येऊरला गेलो असताना तेथे एका जर्मन मुलीशी परिचय झाला, अविनाशजींची आठवण झाली पण, त्या गोऱ्या गोमट्या मुलीकडे पाहत ‘गुटन नाईट’ वगैरे पार विसरून गेलो होतो. अटलजींवर झालेल्या फोटोबायोग्राफी या पुस्तकाचे लिखाणदेखील त्यांनी केले होते. भाषेवरील, पूर्वांचलातील अनुभव, कैलास मानस, मराठीतून जर्मन शिका अशा जवळपास ७०/८० पुस्तकांचे लिखाण त्यांच्याकडून झालं आहे. मी मेघालयातून परत आल्यावर ‘मराठीतून खासी शिका’ अशा पुस्तकाचे लिखाण करावयास अविनाशजींनीच प्रवृत्त केलं होतं. माझ्या कुवतीनुसार मी ते पूर्णदेखील केलं आहे. पण त्यांच्या सल्ल्यानुसार तांत्रिक पद्धतीने त्याची पूर्तता झाल्याशिवाय प्रकाशित न करण्याच्या आग्रहामुळे ते अजून प्रकाशित व्हायचे बाकी आहे. पण मी ते लवकरच मनावर घेणार आहे.

 

अविनाशजींचा रागही मी अनुभवला आहे. माझ्या माहितीनुसार त्यांच्या घरच्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी याचा आस्वाद घेतला नसेल. घटना अशी होती, मराठी दिनाचाच कार्यक्रम, २८ फेब्रुवारी असावा. शाळेत उपक्रमानिमित्त आणण्याच्या प्रयत्नाविषयी सांगितलंच आहे. मराठी दिनानिमित्त अविनाशजींचे व्याख्यान शाळेतल्या मुलांसमोर ठेवण्याचा कार्यक्रम आखला. खास तेवढ्यासाठी ते पुण्याहून मुंबईला आले होते. आमच्या शाळेत विज्ञान दिन आणि मराठी दिन एकाच दिवशी होतो. कारण, मागे-पुढेच हे दिन असतात. खर्च आणि ताण वाचविण्याच्या दृष्टीने असावं कदाचित. अविनाशजी शाळेत आले. सर्वांशी परिचय झाला. कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली आणि आमचे त्यावेळचे मुख्याध्यापक म्हणाले, तुम्हाला विषय मांडायला पाच मिनिटे ठेवली आहेत. मी एकदम हबकून गेलो. पण प्रसंगावधान राखून गप्प राहणे योग्य समजलो. अविनाशजींकडे पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यातील रागाचे कारण मी समजू शकलो होतो. पण त्यासमयी त्यांच्या समोर मुख्याध्यापकांना काहीही बोलणे योग्य दिसले नसते म्हणून गप्प राहिलो. इतकाच समजूतदारपणा अविनाशजींमध्येही होता म्हणून प्रसंग टळला. पण कार्यक्रम वगैरे झाल्यावर अविनाशजींनी मला शब्दांनी चांगलाच चोपला. इतका वेळ आणि पैसे खर्च करून मला पाचच मिनिटं बोलायला बोलावलं होतंस का रे? मी शरमेने मान खाली घालून त्यांची क्षमा मागितली. पण तरी ते रागाने म्हणालेच, “यापुढे तुझ्या शाळेत कधीच येणार नाही.” पण असे बोलून त्यानंतरही मला भेटायला म्हणून अनेकदा आलेही. पण आमच्या मंडळींना त्यांच्याकडून मौल्यवान काही घेण्याचे कदाचित भाग्य नसावे.. कृतिशील शिक्षणावर त्यांच्याशी केलेल्या चर्चा व आमचे एकमत अनेकदा व्हायचे. पण ते कृतीत आणण्यासाठी होणारा संघर्ष हे दुर्दैवी आहे. संशोधन प्रोत्साहन प्रकल्प असेल, मुलांचे इंग्रजी सुधारविण्याच्या दृष्टीने, मुलांची ग्रहण क्षमता वाढविणे, इतर भाषांची गोडी लावणे, वाचनात मुलांना आवड निर्माण व्हावी, लेखनातून विचार व्यक्त करता यावेत इत्यादी अनेक कल्पना कृतीत आणण्यास त्यांनी सोबत दिली आहे. प्रत्यक्षात त्या दीर्घकाळ चालण्यासाठी सोबत दुसरी फळीदेखील लागतेच, पण या बाबतीत फारसे यश आले नाही. जेव्हा जेव्हा मला ते भेटतात तेव्हा नवनवीन गार्हाणी मी सांगतच असतो. एक दिवस मला ते म्हणाले की, “तू लिखाण सुरू कर. तुला जे जे काही वाटतं, तू अनुभवतोस, भोगतोस ते सर्व काही लिहून काढत जा. आज तुला जे काही करावंसं वाटतंय ते कदाचित तुझ्या सोबत्यांना पटणारे नसेल वा काही गैरसमजुतींमुळे वा अज्ञानामुळे त्यांच्याकडून समजूनदेखील घेतले जाणार नाही. पण जर तुझ्या मनातील विचार जर तू कोठेतरी लिहून संग्रही केलेस, तर भविष्यात त्याचा उपयोग होवो अगर न होवो, तुझ्या मनातील खळखळ वाहणाऱ्या धारेला वाट मिळेल.” माझ्या मनातील भावना, माझे अनुभव, विचार इत्यादींना लेखनातून प्रवृत्त करण्यास काही मोजक्या लोकांसोबत अविनाशजींचाही वाटा आहे.

 

सध्याचे माझे घर तसे १० बाय १२ फुटांचे, त्यावेळी शौचालयदेखील सार्वजनिक पण अविनाशजी खुल्या आणि मोठ्या मनाने घरी निवासाला यायचे. आता वयोमानानुसार त्यांना शक्य होत नाही. कोणत्याही प्रकारचा संकोच माझ्या मनात येऊ न देता त्यांनी जमिनीवर चटईवर झोपून माझ्या घरी निवास केला आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीतही एकदम हे मनमुराद प्राणी. “काहीही खायला द्या, मी हे खात नाही असे कधी आजतागायत ऐकले नाही.” सुरमई, पापलेट तर कधी कोंबडी वडेदेखील माझ्यासोबत मांडीला मांडी लावून आवडीने खाल्ले आहेत. त्यांची जेवणाची आवड आणि टापटीप जेवताना पाहून माझ्या बहिणीनं आणि भावोजींनीदेखील त्यांच्या घरी जेवायला आणण्याचा आग्रह केला होता आणि आम्ही एक-दोन वेळा गेलोदेखील. अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा, मनातील विचार, कल्पना इ. अविनाशजींसारख्या माणसांबरोबर करण्यास मिळतात, हे माझे मी खरंच भाग्य समजतो. अनेक विविध कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची माझी इच्छा आहे. त्यांच्याबरोबर एकदा तरी पूर्वांचलात जाण्याची माझी अतीव इच्छा आहे. कारण, त्यांच्या नजरेतून एखादी गोष्ट पाहणं यासारखा दुसरा अभ्यासक्रम नसेल. अनेक विविध अंगाने मी अविनाशजींसारखी अनेक मंडळी पाहत आलो आहे. पण सर्वसामान्य माणसांपर्यंत त्यांनी केलेलं कार्य पोहोचविण्यास कोठेतरी मध्येच शुक्राचार्य बसले असावेत. आज त्यांना मुंबई विद्यापीठाने दिलेल्या डी.लिट्. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) या सर्वोच्च पदवीच्या निमित्ताने अविनाशजींचे अंतरंग मांडण्याचा मोह आवरता आला नाही. डॉ. बिनीवाले यांनी आतापर्यंत कोशकार्यात मूलभूत आणि महत्त्वपूर्ण असे प्रचंड कार्य केलेले आहे. मराठीच्या आणि जर्मनच्या दृष्टीने अपूर्व असलेला जगातला हा पहिलाच मराठी-जर्मन शब्दकोश आहे. या शब्दकोशाच्या निर्मितीसाठीच प्रा. बिनीवाले यांना डी. लिट्. पदवी देण्यात आली आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाने ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ देऊन डॉ. बिनीवाले यांचा गौरव केला. २०१४ मध्ये डॉ. बिनीवाले यांच्या ‘जय कैलाश’ या हिंदी कादंबरीला हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. भाषांतराच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान आकाराने आणि योग्यतेने खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे. इंग्लिश, जर्मन, रशियन, फ्रेंच, हिंदी, गुजराती, बंगाली, असमीया, उडिया अशा अनेक मूळ भाषांमधून त्यांनी मराठी, हिंदी, इंग्लिश, जर्मन भाषांमध्ये अनेक प्रकारची साहित्यिक, वैचारिक, तांत्रिक, यांत्रिक, व्यापारिक, कायद्याची इ. भाषांतरे केली आहेत.

 

- दयानंद सावंत

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@