तुका म्हणे ऐशा नरा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |


 


ज्यांच्याशी नवा संसार थाटलाय, त्या पवारसाहेबांचे परिणाम राजू शेट्टींवर इतक्या लवकर दिसायला लागतील, असे वाटले नव्हते.


तुकाराम महाराजांचे वरील वचन तंतोतंत पाळावे, असे खासदार राजू शेट्टी यांचे परवाचे विधान आहे. एका विशिष्ट जातीचे लोक सैन्यात जात नाही, आपलीच मुले सैन्यात जातात, हे राजू शेट्टी यांनी मतदारांसमोर बोलताना सांगितले. स्वातंत्र्योत्तर काळात समाजसुधारकांनी ज्या खस्ता खाल्ल्या त्याचे चांगलेच पांग फेडण्याचे काम राजू शेट्टींनी केले. स्वत:च्या मताच्या तुंबड्या भरण्याकरिता त्यांनी एका समाजाचे कर्तृत्व नाकारण्याचे पाप केलेच पण, त्याचबरोबर भारतीय लष्करात आपल्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांची जात तपासून त्यांच्या शौर्य, बलिदान आणि त्यागाचाही अपमान केला. राजू शेट्टींची जात काढण्याचे पाप आम्ही करणार नाही. कारण त्या जातीतून सैन्यात कुणी जाते का, हे तपासण्याचे काम आमचे नाही. आमच्यावर ज्या संघटनेचे संस्कार आहेत, ती आम्हाला तसे करायला शिकवत नाही. ब्राह्मण समाजातले कोणीही सैन्यात जात नाही, हा त्यांचा दावा खोडून काढायचा असेल तर देशासाठी धारातीर्थी पडलेल्या सामान्य तुकडीतल्या सैनिकांपासून ते लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या जाती तपासाव्या लागतील. त्यानंतर अशी यादी देताही येईल. मात्र, सैन्यात अशा निकषांवर प्रवेश मिळवता येत नाही. अशा प्रकारे भीक मागण्याचे उद्योग फक्त मतांसाठीच करता येतात. वाद वाढल्यावर राजू शेट्टींनी माफी मागायचे काम केले खरे, पण ती माफीही सरळ नाही. “सैनिकांना न्याय देण्यासाठी आपण असे विधान केले,” असे राजू शेट्टी यांनी म्हटले. आता सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी एखाद्या जातीवर खोटे आरोप करता येतात, हे आपल्या सगळ्यांना नवीनच आहे. ज्या कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी ही जातीयवादी विधाने केली, तिथला शाहू महाराजांचा प्रवाह वळविण्याचा प्रयत्न जरी त्यांनी कधी मनापासून अभ्यासला असता तरी त्यांच्याकडून असा प्रमाद घडला नसता. पण फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने टोप्या घालणे आणि नंतर त्या फिरविणे असले उद्योग करणाऱ्यांच्या सोबत जाऊन बसल्यानेच त्यांची ही गत झाली आहे.

 

वस्तुत: राजू शेट्टी हे शेतकरी संघटनेतून आलेले. जातीपातीपलीकडे आणि पारंपरिक राजकारणाच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून त्यांच्या पक्षाला सर्वसामान्य शेतकऱ्याने प्रतिसाद दिला. मात्र, आज राजू शेट्टींची अवस्था काय आहे तर आपल्याच पक्षातील एका कार्यकर्त्याला जरा जास्त मान मिळाला म्हणून ते सरळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लाऊन बसले आहेत. सरकार आणि गावगाड्याच्याही राजकारणातून टप्प्याटप्प्याने हद्दपार होणाऱ्या लोकांसोबत जाऊन राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडविणार, हाच मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची भलीमोठी जाण असल्याचे आव आणणारे लोक शहरी नेतृत्वाला रताळी, भुईमूग अशा पिकांवरून प्रश्न विचारतात. ही कंदमुळे कुठे लागतात, असा प्रश्न विचारून हंशा आणि टाळ्या मिळविण्याचे काम ही मंडळी करतात. आता या वरच्या प्रश्नाचे उत्तर राजू शेट्टींनी द्यावे. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने देशभरात शेतकऱ्यांच्या हितासाठी रान उठवले तेव्हा ते कोणत्या जातीचे होते? शरद जोशींना असले राजकीय डावपेच खेळण्यात कधीच रस नव्हता. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढत राहिले. आज राजू शेट्टी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतात. ज्या शरद पवारांचा विरोध करीत ही मंडळी मोठी झाली, त्याच शरद पवारांच्या आघाड्यांत ही मंडळी जाऊन बसली आहेत. त्यामुळे गुण नाही पण वाण तरी लागलाच आहे, असे मानायला जागा आहे. वस्तुत: शेतकऱ्यांच्या नेत्याला जातीपातीशी घेणेदेणे नसावे. पण शरद पवारांना विरोध करता करता शरद पवारांसोबत जाऊन बसल्याचे हे परिणाम आहेत. ऊस क्षेत्राच्या प्रश्नाचा आवाज आपल्यामागे राहावा म्हणून आता राजू शेट्टींची धावपळ आहे. जे शरद जोशींनी त्यांच्या आयुष्यात केले नाही ते शेट्टींनी या महाआघाडी नावाच्या भंपकपणात सहभागी होण्यासाठी केले आहे. “आम्हाला दोन तरी जागा द्या, तीन तरी जागा द्या,” अशी विनवणी करणारे राजू शेट्टी या निमित्ताने पाहायला मिळाले. महाडिक आणि राजू शेट्टी यांच्यासाठी शरद पवारांनी कोल्हापुरात संयुक्त सभा घेतली होती. पंतप्रधानांवर टीका करीत गांधी परिवाराने देशसेवेसाठी आपल्या पाच पिढ्या कशा खपवल्या, हे सांगायला पवारांनी या सभेचा अर्धा वेळ घालविला होता. राजू शेट्टींमध्ये झालेले हे जातीय परिवर्तन त्याच सभेचा परिणाम होता का, हे तपासून पाहिले पाहिजे.

 

या भागातून आलेले बरेच विचारवंत महाराष्ट्राच्या साहित्य, पत्रकारिता आणि बौद्धिक क्षेत्रात नावाजलेले आहेत. राजू शेट्टींनी केलेले विधान इतके जातीयवादी व सैन्यदलातील मंडळींचा अपमान करणारे असूनही यापैकी कुणीही त्यांचा साधा निषेधही केलेला नाही. एरव्ही भाजपच्या कुठल्याही लहानमोठ्या नेत्याने काही विधाने केली की, तुटून पडणारे हे लोक सध्या चिडीचूप आहेत. कारण मोदींचा पराजय करण्याची अपेक्षा ज्या मंडळींकडून ठेवण्याची या मंडळींची अपेक्षा आहे, त्यात राजू शेट्टीदेखील आहेत. आता या एवढ्याशा चिंध्यांनी ते वादळ रोखता येणार नाही, याची कल्पना या मंडळींना नाही असे मुळीच नाही. पण माणूस एकदा द्वेषाच्या कचाट्यात जाऊन अडकला की, तो असाच वागायला लागतो. प्रस्थापित राजकारणाला छेद देऊन स्वत:चे राजकीय स्थान निर्माण करणाऱ्या राजू शेट्टींच्या राजकीय अपकर्षाची ही सुरुवात आहे. हातकणंगल्याची निवडणूक कदाचित ते जिंकतीलही पण, ज्या कारणासाठी ते राजकीय संघर्षाला उतरले त्याची व सोबतच्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकतील का, या प्रश्नांची उत्तरे राजू शेट्टींनाच द्यावी लागतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@