संवेदनशील खटल्यांचा युक्तिवादकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019   
Total Views |


 


न्यायदेवतेची सेवा करणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन तोच वसा पुढे नेणारे, देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडत अनेकांना खडी फोडण्यास पाठविणारे नाशिकमधील असामान्य कर्तृत्व म्हणजे सरकारी वकील अजय मिसर. त्यांच्या कर्तृत्वामुळे गुन्हेशाबितीकरण दरात आजमितीस नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याच कार्यकर्तृत्वाचा परामर्श घेणारा हा लेखप्रपंच.

 

सामाजिक व्यवस्था सुरळीत असावी व अन्याय होणाऱ्या घटकास न्याय मिळावा, यासाठी सामाजिक व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्या काळात न्यायव्यवस्थेची निर्मिती झाली. आजच्या आधुनिक युगातदेखील सामान्य नागरिकांचा सर्वाधिक विश्वास असतो, तो याच न्यायव्यवस्थेवर. न्यायालयात काळा कोट आणि पांढरा सदरा घालून कार्यमग्न असणारा वकील हाकाळ्याचे पांढरे करणारा घटक’ नसून शुभ्र चारित्र्याचा, कोणत्याही पाशात न अडकणारा आणि केवळ तथ्यावर आपली भूमिका मांडणारा एक विश्वासार्ह व्यक्ती असतो. वकिलाची हीच भूमिका न्यायव्यवस्थेत महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच सामाजिक अशांतता पसरविणाऱ्या अनेक घटकांना आजन्म तुरुंगवास देणारे आणि अनेकांना त्यांच्या दुष्कृत्यांमुळे यमसदनी धाडणारे नाशिक येथील सरकारी वकील अजय मिसर हे खऱ्या अर्थाने कर्तृत्वान वकील ठरतात. त्यांच्या कुटुंबात तीन पिढ्यांची वकिली जरी नांदत असली तरी, वटवृक्षाच्या छायेत राहूनही त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख आपल्या कर्तृत्वाने नाशिकच्याच नव्हे, तर राज्याच्या न्यायवर्तुळात निर्माण केली आहे. त्यांचे आजोबा व वडील हे व्यवसायाने वकील होते. तसेच, त्यांचे काका भास्करराव मिसर हे राज्याचे पोलीस महासंचालक होते. त्यामुळे कायद्याचे बाळकडू अजय मिसर यांना बालवयापासूनच लाभले. मात्र, असे असले तरी प्राप्त असणाऱ्या वातावरणात आपला असा स्वत:चा फुलोरा निर्माण करण्यासाठी अजय मिसर यांनी अनेकविध कष्ट केले. लहान वयातच अंगावर काळा कोट परिधान करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्या या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी मुंबई येथील सरकारी विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे, अजय मिसर यांचे वडील व आजोबा यांची न्यायाधीशपदी निवड झाली होती. मात्र, त्यांनी वकिली व्यवसायास प्राधान्य दिले. सन 2000 मध्ये अजय मिसर यांचीदेखील न्यायाधीशपदी निवड झाली होती. मात्र, अभ्यासूवृतीने प्रकट होण्याची तळमळ आणि तथ्यांवर आधारित खटला मांडण्याची आवड, यामुळे त्यांनीदेखील वकिलीला प्राधान्य दिले.

 

वकिली व्यवसायात पदार्पण केल्यावर म्हणजे 1994 ते 2000 या काळात त्यांनी नाशिक व पिंपळगाव बसवंत येथील न्यायालयात आपले वकिलीचे कौशल्य दाखविले. या काळात त्यांनी या दोन्ही न्यायालयात आपल्या अशिलांची बाजू अतिशय भक्कमपणे मांडली. त्यांचे न्यायालयातील विवेचन ऐकण्यासाठी अनेकविध वकील हजर असतात. मिसर यांचा युक्तिवाद आजही येथील नवोदित वकिलांसाठी न्यायव्यवस्थेतील कार्याचा प्रात्यक्षिकाचा अभ्यासक्रम असल्याचे वकिलांच्या वर्तुळात बोलले जाते. यातूनच त्यांचे कर्तृत्व खऱ्या अर्थाने सिद्ध होते. त्यांचे वकिलीमधील कौशल्य लक्षात घेऊन व त्यांचा एकंदरीत आवाका पाहता, मिसर यांचे ‘मिसाईल’ हे मोठ्या गुन्हेगारांवर पडावे व त्यांना शिक्षा व्हावी, या हेतूने शासनामार्फत त्यांची सन 2000 मध्ये साहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे काम करताना सरकारची बाजू न्यायालयात ठामपणे मांडणारे आणि पोलीस यंत्रणेने चतुर्भुज केलेले आरोपी हे कोणत्याही स्थितीत सुटू नये, यासाठी सरकारला विद्वत्तापूर्ण आणि अभ्यासू अशा सरकारी वकिलाची असणारी गरज मिसर यांच्यामुळे पूर्ण झाली असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. मिसर यांनी 25 वर्षांतील एकूण वकिली व्यवसायाच्या कार्यकाळात तब्बल 19 वर्षं सरकारी वकील म्हणून आपली कारकीर्द पार पाडली आहे. यावरून त्यांच्यावर असणारा सरकारचा दृढ विश्वास अधोरेखित होतो.

 

यशाचा मूलमंत्र

प्रामाणिकपणे कार्य केल्यास यश नक्कीच प्राप्त होते. वकिली व्यवसाय हा बौद्धिक मेहनतीचा व्यवसाय आहे. त्यामुळे या क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्यांनी याची तयारी ठेवावयास हवी. या व्यवसायात गृहपाठ हा अत्यंत महत्त्वाचा असून, येणारे खटल्याचे प्रकरण समजून घेणे व ते व्यवस्थित वाचणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. तीन तास बोलता येईल इतकी प्रभावी तयारी असली की, न्यायालयात 10 मिनिटे प्रभावी युक्तिवाद करता येतो. त्यामुळे खटल्याची संपूर्ण माहिती आणि आणि इतिहास यांचे ज्ञान या क्षेत्रात आवश्यक असते. 

 

सरकारी वकील म्हणून कार्य करताना मिसर यांच्या अंगीभूत असणाऱ्या कर्तृत्वाला हेरून त्यांच्याकडे अनेक संवेदनशील खटले दाखल होऊ लागले. बहुचर्चित असा आणि ज्यात थेट भारतीय सैन्याचे अधिकारी समाविष्ट आहेत, असा संशय असलेल्या ‘मालेगाव बॉम्बस्फोट’ खटल्यात सरकारी पक्षातर्फे बाजू मांडणारे वकील होते ते अजय मिसर. तसेच, नाशिक रोड परिसरातील बेलत गव्हाण येथे सन 2008 मध्ये सातोटे कुटुंबाच्या खून खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यामध्ये अजय मिसर यांचा युक्तिवाद हा बहुमोल ठरला. पोलीस स्थानकात दाखल होणाऱ्या खटल्यांत मिळणारे यश व त्या माध्यमातून गुन्हेगारांना होणारी शिक्षा यांची दखल उच्च तपासयंत्रांनी घेतली नसती तरच नवल. अशा प्रकारच्या विविध खटल्यांतील मिसर यांचा डंका आता केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता राज्यभर वाजू लागला होता. त्यामुळे आता त्यांच्या कर्तृत्वाला आयाम प्राप्त करून देणारे राज्याच्या गुन्हेशाबितीकरण विरोधी पथकाचे व केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे खटले त्यांच्याकडे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

 
 
जिल्ह्यापुरते मर्यादित असणाऱ्या मिसर यांच्या कर्तृत्वाची दखल आता मुंबई येथील गुन्हे शाखेनेदेखील घेतली आहे. जगातील द्वितीय क्रमांकाचे पोलीस दल म्हणून ओळख असणाऱ्या ‘मुंबई पोलीस दला’सदेखील आता न्यायालयात मिसर यांच्या युक्तिवादाची निकड भासू लागली आहे. तसेच, दहशतवादविरोधी पथकाचे खटले लढताना मिसर यांनी आजवर ‘लष्कर-ए-तोयबा’सारख्या अतिरेकी संघटनेच्या खटल्यांमध्येदेखील आपले योगदान दिले आहे. तसेच, मुंबईमधील रवी पुजारी टोळीशी संबंधित खटल्यातदेखील त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांचे खटलेदेखील मिसर यांनी यशस्वीरीत्या चालविले आहे. त्याचप्रमाणे विशेष सरकारी वकील म्हणून आजमितीस ‘अबू जिंदाल खटला,’ ‘हिमायत बेग खटला,’ ‘शेख लाला खटला,’ ‘वर्धन घोडे खून खटला’ अहमदनगर, नाशिक, ठाणे, मुंबई येथील गँगस्टार्सचे ‘मोका’अंतर्गत दाखल खटले यांचे कामदेखील मिसर सांभाळत आहेत. 2016 पासून नाशिक जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्य करताना मिसर यांनी गुन्हेशाबितीकरण दर हा 7.8 पासून 58 टक्क्यांपर्यंत नेला आहे. त्यामुळे आजमितीस गुन्हेशाबितीकरणात नाशिक जिल्हा पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे. आजवर विविध खटल्यांत काम करताना मिसर यांना अनेक धमक्या आल्या. मात्र, खंबीर कुटुंब, वडील व काका यांचे मार्गदर्शन आणि अंगीभूत असणारे निर्भयत्व यांच्या बळावर न्यायदेवतेची सेवा मिसर करत आहे आणि यापुढेही करत राहतील. समाजात कायदा व सुव्यवस्था नांदावी, कायद्याचा वचक असावा, या प्रामाणिक उद्देशाने वकिली व्यवसायातील हा अर्जुन हा ‘अजय’ राहावा हा न्यायदेवतेचा आशीर्वाद आहे, असे त्यांचे कर्तृत्व पाहून मनस्वी वाटते. आजवर मिसर यांच्या प्रभावी व पुरावेधिष्ठित युक्तिवादामुळे 200 च्यावर आरोपींना जन्मठेप व 15 च्या आसपास आरोपींना फाशी सुनाविण्यात आली आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@