प्रगतीपुस्तक खासदाराचे : दक्षिण मुंबई मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |


 


दक्षिण मुंबई हा मुंबईतील अत्यंत उच्चशिक्षित, उच्चभ्रू परिसर मानला जातो. एकेकाळी हा बहुतांश मराठमोळा परिसर होता. कालौघात मराठी टक्का घटला मात्र, तरीही विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत मराठी टक्काच शिवसेना-भाजप उमेदवारांना विजयी करीत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात मुस्लिमांची मते निर्णायक ठरत होती. लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता दक्षिण मुंबई मतदारसंघावर काँग्रेसनेच वर्चस्व राखले आहे. काँग्रेसचे मुरली देवरा चार वेळा, तर मिलिंद देवरा दोन वेळा याच मतदारसंघातून लोकसभेवर गेले. त्यामुळे हा देवरा कुटुंबाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाई. भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांचा विजय हा एक अपवाद होता.

 

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने इथे अरविंद सावंत यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराकडून मिलिंद देवरा यांचा पराभव केला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून शिवसेनेकडे गेला. मोडकळीस आलेल्या चाळी, अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याने भरलेल्या घरगल्ल्या, तुंबणारी गटारे अशा अनेक समस्यांनी आज येथील रहिवासी त्रस्त आहेत. या भागात पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहत आहेत. चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे आसपासच्या चाळींचा पाणीपुरवठा आटला असून मलनिस्सारण यंत्रणांवर ताण आला आहे. या मतदारसंघाचा मुख्य प्रश्न म्हणजे विकास. सागरी हद्द नियंत्रण कायद्यामुळे या विभागातील शेकडो इमारतींचा विकास रखडला असून असंख्य रहिवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत.

 


 
 

दक्षिण मुंबई मतदारसंघात कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी आणि वरळी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी कुलाबा भाजप, मुंबादेवी काँग्रेस आणि भायखळ्यात एमआयएम, मलबार हिलमध्ये भाजप तर वरळी आणि शिवडीमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. दक्षिण मुंबईतील चिराबाजार, गिरगाव, खेतवाडी, ग्रॅँट रोड, मुंबई सेंट्रल, लालबाग, शिवडी या भागात शिवसेनेचा दबदबा आहे. काही ठिकाणी मनसेने शिवसेनेला खिंडार पाडले होते मात्र, मनसेचा जोर आता ओसरला आहे. गेल्यावेळी पराभूत झालेले मिलिंद देवरा यांनाच काँग्रेसने या मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे. परंतु, देवरा यांचा येथे म्हणावा तसा जनसंपर्क आता राहिलेला नाही. महायुतीने विद्यमान खा. अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील गुजराती, राजस्थानी आणि मुस्लीम समाजाच्या पाठिंब्यावर देवरा परिवाराने लोकसभा गाठली. मात्र २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडे आकर्षित होत मराठी मतांसह गुजराती, राजस्थानी मतदारांनी महायुतीला कौल दिला होता. यंदा वंचित बहुजन आघाडीही मैदानात उतरणार आहे. त्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरविंद सावंत यांचा मार्ग बराच सुकर झाल्याचे दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@