प्रगतीपुस्तक खासदाराचे : दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |


 


संघ युतीचा गड कायम राहणार ?

 

मुंबईतला मध्यवर्ती मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा दक्षिण-मध्य मुंबई हा शिवसेनेसाठी महत्वाचा गड आहे. येथील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत शिवसेना-भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद या मतदारसंघात मोठी आहे. १९९१ पासून फक्त एकदाच २००९ मध्ये काँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांनी इथे काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. उर्वरित ६ निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपला गड कायम राखला आहे. शिवाय दादर टर्मिनस, आशियातली सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी, मूळ मुंबईकरांच्या मध्य मुंबईतल्या वसाहती यामुळे हा मतदारसंघ कायमच चर्चेत राहिला आहे. इथल्या मराठी मतांचं पारडं कुणाच्या बाजूने झुकणार, यावर इथले निकाल अवलंबून असतात.

 

 
 

२०१४ मध्ये काँग्रेसचे विद्यमान खा. एकनाथ गायकवाड यांचा मोदीलाटेत राहुल शेवाळेंनी पराभव केला. ते मुंबई महानगरपालिकेतून थेट संसदेत गेले. पण तरी जवळपास अडीच लाख मते घेऊन एकनाथ गायकवाडांनी कडवी टक्कर दिली होती. त्यामुळेच यंदा फक्त मराठी मतांच्या जोरावर हा मतदारसंघ राखणे शेवाळेंसमोर मोठे आव्हान असणार आहे. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास, दादर रेल्वेस्थानकावरच्या सोयीसुविधा, कोळीवाड्यांच्या विकासाचा पाठपुरावा अशा काही दाव्यांच्या आधारावर निवडून येण्याची खात्री राहुल शेवाळे व्यक्त करत आहेत. पण हेच दावे खोडून काढत जनसंपर्काच्या आधारावर एकनाथ गायकवाडांनीही मोहीम उघडली आहे. मात्र धारावीत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विद्यमान आ. वर्षा गायकवाड व त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांच्या विरोधात मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एकनाथ गायकवाड यांच्या उमेदवारीला डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उघडपणे विरोध केला आहे. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेना पहिल्या क्रमांकावर होती. या भागात शिवसेनेचे १७ नगरसेवक तर भाजपचे सात नगरसेवक आहेत. या सर्व नगरसेवकांची कामे व खासदार म्हणून राहुल शेवाळे यांनी केलेल्या कामांच्या जोरावर शिवसेना दक्षिण-मध्य मुंबईत पुन्हा बाजी मारेल, अशी शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@