प्रगती पुस्तक खासदाराचे : ठाणे मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |


 

 

विचारे की परांजपे? ठाणेकरांचा कौल कुणाला?


राज्यात मतदारसंख्येनुसार सर्वाधिक मोठा आणि शहरीकरण असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे ठाणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हा मतदारसंघ रालोआसाठी हमखास विजयाचा मतदारसंघ झाला आहे. २०१४ च्या लोकसभेच्या रणधुमाळीत राजन विचारे यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एजन्सीने प्रचारात मोदींच्या प्रतिमेला अग्रक्रम देण्याचा सल्लाच दिला होता.

 

पहिले जवळपास ४० दिवस हा सल्ला अव्हेरणाऱ्या विचारे यांनी देशातील हवा पाहून नंतर होर्डिंगपासून पत्रकापर्यंत जागोजागी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या नावाने मत मागितले. परिणामी, विचारे यांना तब्बल सव्वा तीन लाखांचे मताधिक्य प्राप्त झाले. आता यावेळेसही शिवसेना रालोआमध्येच असल्यामुळे राजन विचारे यांच्या चेहऱ्यावर आतापासूनच विजयी मुद्रा पाहायला मिळत आहे. ठाणे मतदारसंघातील ६ विधानसभांपैकी ५ विधानसभा मतदारसंघ युतीच्या ताब्यात आहेत. शहरी मतदार आणि मोदींच्या करिष्म्याचा धसका विरोधी पक्षाने इतका घेतला आहे की, एकेकाळी जवळपास १० वर्षांहून अधिक काळ पालकमंत्रीपद सांभाळलेल्या गणेश नाईक यांना पक्षाने आग्रह केल्यानंतरही ते या मतदारसंघातून आपले चिरंजीव व माजी खा. डॉ. संजीव नाईक यांच्याऐवजी स्वतः लढायला तयार झाले नाहीत. नाईक यांच्या नकारानंतर राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आली. परांजपे हे उच्चशिक्षित असल्याचा आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आपल्या अभ्यासाच्या जीवावर रेल्वेतील अनेक विषयांत उत्तम कामगिरी बजावल्याचा प्रचार पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीकडून केला जात आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या पट्ट्यातील सुशिक्षित उमेदवारांना राष्ट्रवादीने या दोन मुद्द्यांवरून कळकळीचे आवाहन केले आहे. याचा विचारेंच्या मतांच्या टक्केवारीत थोडाफार फरक पडू शकतो. मात्र, परांजपे यांचे सध्याचे ‘राजकीय गुरू’ जितेंद्र आव्हाड यांनीच परांजपे यांना पराजित करण्याचा विडा उचलला असल्याची चर्चा त्यांच्याच पक्षात दबक्या आवाजात सुरू आहे.

 

 
 

सुशिक्षित आणि शहरी मतदार आजही महायुतीच्याच असल्याचे आढळते. असे असताना रोज मोदी, भाजप, संघ परिवार, हिंदुत्वाच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांची ‘वाचाळता’ परांजपे यांच्यासह पक्षाला अडचणीत आणेल, अशी भीती राष्ट्रवादीत व्यक्त होत आहे. आनंद परांजपे हे आपल्या वडिलांच्या व शिवसेनेच्या पुण्याईने दोनदा खासदार झाले. पायाला भिंगरी लावून मतदारसंघातील सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. मात्र रेल्वेतील प्रश्नांवर त्यांची चांगली पकड होती. राजन विचारे यांनीही सोळाव्या लोकसभेत पिटिशन कमिटी, उद्योगाच्या स्थायी समितीत, शहर विकास, बांधकाम आणि शहरी गरिबी निर्मूलनाच्या कमिटीत, मुंबईच्या टेलिफोन सल्लागार समितीत काम केले. तथापि, वाढत्या शहरीकरणामुळे विचारे यांच्या लोकसभा मतदारसंघात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणांची मोठी गरज आहे. रेल्वे मंत्रालयातील ठाणे आणि उपनगरातील इतके विषय प्रलंबित आहेत की, केवळ रेल्वे या विषयात काम करूनही विचारे आपला प्रभाव पाडू शकतात. एकेकाळी आशियातील सर्वात मोठी उद्योग वसाहत असलेली वागळे इस्टेट आणि नवी मुंबई इ. विचारे यांच्याच मतदारसंघात येतात. यात दीर्घकालीन धोरण व उपाययोजना आखण्याचे आव्हान विचारे यांच्यासमोर असेल. आता प्रत्यक्षात ठाणेकर मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@