प्रगतीपुस्तक खासदाराचे : उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |



 


गड शिवसेनेचा तरी आव्हानही तितकेच मोठे!

 

मुंबईतील उत्तर भारतीय बहुल असलेला उत्तर-पश्चिम मतदार संघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, एकेकाळी मनसेच्या शालिनी ठाकरे यांच्याविरोधात विद्यमान खा. गजानन कीर्तिकर यांना मतविभागणीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१४ मधील मोदीलाटेमुळे त्यांनाही फायदा झाला पण, २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वीचे चित्र पाहता युतीविरोधात उभ्या केलेल्या आघाडीमुळे पुन्हा गड कायम राखण्याचे आव्हान कीर्तिकरांसमोर असणार आहे.

 

मुंबईतील उत्तर भारतीय बहुल विभाग म्हणून एकेकाळी काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ असलेला हा गड हळूहळू शिवसेनेच्या ताब्यात गेला. युतीमुळे महापालिका, विधानसभा आणि लोकसभेवर भगवा फडकवण्यात यश मिळवले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, जोगेश्वरी-अंधेरीतील झोपडपट्ट्या, कोळीवाड्यांचे प्रश्न, रेल्वे स्थानकांतील पायाभूत सुविधा, झपाट्याने वाढत चाललेली लोकवस्ती यांच्यासह इतर पक्षवार मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरतात. युतीच्या जागावाटपात कायमच शिवसेनेकडे गेलेल्या या मतदारसंघाचा अंदाज म्हणावा तितका भाजपला येऊ शकला नाही. पुन्हा तिकीट मिळावे यासाठी कीर्तिकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार मोर्चेबांधणी करत जनसंपर्क मजबूत करण्यास सुरुवात केली होती. मात्र, कामत यांच्या निधनानंतर या जागेवर आता संजय निरुपम यांना तिकीट देण्यात आले आहे. मोदी लाटेवेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांनी गुरुदास कामत यांचा १ लाख, ८३ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. उत्तर भारतीय बहुल मतदारसंघ असूनही या ठिकाणी मनसेच्या मतदारांचेही आव्हान आहे. मनसेविरोधामुळे विद्यमान खासदारांना पराभव पत्करावा लागला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मनसेची मते वळवण्यात यश आले होते, तर ११ हजार मतदारांनी ’नोटा’चा वापर केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र आल्यानंतरही उत्तर भारतीय मतांचे विभाजन होण्याचे आवाहन आघाडीसमोर आहे. बहुजन समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष आदी पक्षही या ठिकाणी उमेदवार उभा करत असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभाजनाचे नुकसान आघाडीचेच होते.

  
 

भाजप-शिवसेना युतीद्वारे एकत्र असली तरीही स्थानिक कार्यकर्त्यांमधील वादाला नेहमीच तोंड फुटत असते. विकासकामांवरून नगरसेवकांमध्येही वाद उफाळल्याचेही याच मतदार संघातून पाहायला मिळाले. धारावीनंतर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी असलेल्या या मतदार संघात काँग्रेसही आपली ताकद पूर्णपणे पणाला लावणार आहे. गुरुदास कामत यांच्यानंतर या मतदार संघावर संपूर्ण वर्चस्व मिळवण्यासाठी आणि पुन्हा जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार, हे निश्चित. त्यामुळे बालेकिल्ला असूनही गड राखणे हे आव्हान मानले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@