प्रगती पुस्तक खासदाराचे : मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ

    05-Apr-2019
Total Views |


 


चढती कमान कायम राखण्याचे आव्हान

 
महानायक अमिताभ बच्चन ते रोजगाराच्या संधी शोधत येऊन स्थिरावणाऱ्या अन्य राज्यांतील नागरिक असा बहुविध मतदार असलेले लोकसभा क्षेत्र म्हणजे उत्तर मध्य मुंबई मतदार संघ. मोदीलाटेचा फारसा अंदाज नसताना विद्यमान खा. पूनम महाजन यांनी पक्षातून फारशी कुणीही लढण्यासाठी उत्सुक नसलेली जागा लढविली आणि जिंकलीसुद्धा.
 

देशभरात मोदीलाटेचा प्रभाव सिद्ध करणाऱ्या ज्या काही लोकसभेच्या जागा सांगितल्या गेल्या, त्यात ‘उत्तर मध्य’चे नाव घेतले जाते. एकेकाळी सुनील दत्त यांनी बांधून काढलेला हा मतदारसंघ आजही भाजपसाठी अपारंपरिक मतदारांचाच आहे. एका कर्तृत्ववान पित्याचा वारसा केवळ नावापुरता न मिरवता पूनम महाजन यांनी स्वत:चे राजकीय कर्तृत्व व वकूबही सिद्ध केला. खासदारकी जिंकल्यानंतर पक्ष संघटनेत महत्त्वाचे, प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे म्हणून मानले जाणारे भाजयुमोचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. वय, वकूब या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील उगवत्या नेतृत्वामध्ये पूनम महाजन यांचा समावेश होतो. पर्यायाने देशभरातील माध्यमांचे व राजकीय पंडितांचे या मतदारसंघातील घडीमोडींवर लक्ष असेल.

 

 
 

खासदार म्हणून दररोज सकाळी कार्यालयात येऊन बसणे, लोकांच्या संपर्कात राहाणे, गेली अनेक वर्षे रखडलेली कामे मार्गी लावणे या गोष्टी खासदार महाजन यांच्या जमेच्या बाजू आहेतच. कलेक्टर जमिनींवरचा प्रीमियम कमी करून या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणे,विमानतळानजीकच्या जमिनींवरील लोकांचे पुनर्वसन करणे अशा अनेक गोष्टी यासाठी सांगता येतील. आमदारांच्या द़ृष्टीने शिवसेनाबहुल असलेला हा मतदार संघ भाजप-शिवसेना युती व ठाकरे कुटुंबीयांसाठी असलेल्या जवळच्या संबंधामुळे महाजन यांच्यासाठी सोपा वाटत असला तरी अपारंपरिक मतदाराला पुन्हा मतदान करायला लावणे, हेच महाजन यांच्यासाठीचे आव्हान असेल. प्रिया दत्त यांनी माघार घेऊन पुन्हा लढण्याची केलेली घोषणा त्यांच्या स्वत:च्या मतदाराला किती भावली, हे निकालाच्याच दिवशी लक्षात येईल. मुस्लीम व ख्रिस्ती मतदारांची एकगठ्ठा मते हे प्रिया दत्त यांचे बलस्थान होते. मधल्या पाच वर्षांत फारशा कुठेही न फिरकलेल्या दत्त यांना हीच मते पुन्हा मिळतील, याची शक्यता कमीच आहे. प्रकाश आंबेडकर व ओवेसी यावेळी कोण उमेदवार देतात यावरूनही या मतदार संघातील घडामोडी ठरतील.

 

गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी उभ्या राहिलेल्या बूथ स्तरापर्यंतच्या संघटनेमुळे ही निवडणूक महाजन यांच्यासाठी तुलनेने सुलभ असली तरी त्यांच्यासमोर आव्हान असेल, ते त्यांच्या २०१९ नंतरच्या राजकीय कारकिर्दीचेच. चांगल्या संख्याबळाने लोकसभेत पुन्हा एकदा प्रवेश करणे पूनम महाजनांसाठी नव्या जबाबदाऱ्यांची नांदी ठरू शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.