प्रगती पुस्तक खासदाराचे : नाशिक मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |


 


संधी विक्रम घडविण्याची...

 

उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे गो. ह. देशपांडे व आण्णासाहेब कवडे यांचा अपवाद वगळता इतर कोणताही खासदार नाशिककर नागरिकांनी दुसऱ्यांदा निवडून दिलेला नाही. यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध निवडून देणारा मतदारसंघ म्हणून देखील हा मतदारसंघ ओळखला जातो. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आणि विद्यमान खा. हेमंत गोडसे यांना या मतदारसंघातून विक्रम घडविण्याची संधी प्राप्त झाली आहे आणि हीच संधी हेदेखील त्यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत ‘बाहुबली’ म्हणून समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांचा १ लाख, ८७ हजार, ३३६ मतांनी पराभव केला होता.

 

२०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कार्यकाळात हेमंत गोडसे यांनी अनेक भरीव कामांचे योगदान या मतदारसंघाला दिले असल्याचे दिसून येते. यात मुख्यत्वे स्वा. सावरकर स्मारकाचे नूतनीकरण, इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचा प्रारंभ, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त तालुक्यांचा प्रश्न मिटविण्यासाठी केलेले कार्य, कृषी टर्मिनल्सना मंजुरी प्राप्त करून घेणे, नाशिक ते मुंबई लोकल सेवा, मुकणे धरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठीचे कार्य, देशातील पहिली टेलीमेडिसिन सेवा नाशिकमध्ये सुरू करणे अशा जनसामान्यांशी थेट संबंधित असणाऱ्या कामांचा उल्लेख करता येईल. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा सत्तेच्या सारीपाटावर कायमच झुलत राहिला आहे. १९५२ ते २०१४ या काळात पार पडलेल्या निवडणुकांत पाच वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, एकदा अनुसूचित जाती महासंघ, भाजप, तीन वेळा शिवसेना, दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाशिककर नागरिकांनी संसदेत पाठविले आहेत.


 
 

२०१४ च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचे तगडे आव्हान गोडसे यांच्यासमोर होते. त्यावेळी मोदीलाटेचा काही प्रमाणात फायदादेखील गोडसे यांना झाला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आजही नाशिकमध्ये आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. याचा फायदा गोडसे यांना होण्याचीदेखील शक्यता आहे. सन २००९ च्या निवडणुकीत समीर भुजबळ व हेमंत गोडसे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी समीर भुजबळ यांनी अवघ्या २२ हजार, ३२ मतांनी हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. तसाच सामना यावेळच्या निवडणुकीत रंगणार आहे. समीर भुजबळ यांच्या पाठीशी असणारी काका छगन भुजबळ यांची साथ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी जवळीक साधणारा ग्रामीण भागातील मतदार, समता परिषदेचे नाशिकमध्ये असणारे प्राबल्य यांचे आव्हान या निवडणुकीत गोडसे यांच्यासमोर असेल. केलेली लोकोपयोगी कार्ये आणि केंद्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन व्हावे, ही नाशिककरांची असणारी मनीषा याचा फायदा गोडसे यांना होण्याची शक्यता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@