प्रगती पुस्तक खासदाराचे : मावळ मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |



मावळमधून बारणेंचाच अरुणोदय?

 

पूर्वीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेपासून अस्तित्वात आला. मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून दोन्ही वेळेस इथे शिवसेनेच्या उमेदवारांनी मताधिक्क्य मिळवत विजय खेचून आणला. २००९ साली गजानन बाबर यांनी लोकसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले तर २०१४ साली जनतेने शेकापच्या लक्ष्मण जगताप यांच्याऐवजी श्रीरंग बारणे यांच्यावर विश्वास टाकला. परंतु, आता लक्ष्मण जगताप भाजपमध्ये आल्याने व शिवसेनेची भाजपशी युती झाल्याने जगताप बारणेंसाठी प्रचार करतील. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या रचना अस्तित्वात असलेला मावळ मतदारसंघ आकारानेही प्रचंड मोठा आहे. २२ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मावळ मतदारसंघात पिंपरी-चिंचवड या झपाट्याने शहरीकरण होणाऱ्या तसेच मुंबईजवळील पनवेल महापालिकेचाही समावेश होतो.

 

मतदारसंघात शिवसेनेची संघटन बांधणी उत्तम असून हाकेला तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. परिणामी, इथे दोन्ही वेळेस सेना उमेदवारांना अनुक्रमे तीन लाख, ६४ हजार व पाच लाख, १२ हजार इतक्या विक्रमी मतांनी यश मिळवता आले. गेल्यावेळी खासदार झालेल्या श्रीरंग बारणे यांनाच आताही शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. परंतु, यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा सामना बारणेंना करावा लागेल. शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आणि पवार घराण्यावर श्रद्धा असलेला कार्यकर्ता आपापल्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतील. पण, शिवसेना-भाजपचे झालेले मनोमिलन आणि श्रीरंग बारणेंनी मतदारसंघासह लोकसभेत केलेली कामगिरी पाहता सध्या तरी युतीचे पारडे जड वाटते. तरीही पार्थ पवार रिंगणात उतरल्याने थोरल्या साहेबांसह अजित पवारही मुलाला लोकसभेत पाठविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील, असे दिसते. मावळ मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र दोन्हीकडे निम्मा निम्मा पसरलेला मतदार. या दोन्ही भागांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय पोत निराळा आहे. लोणावळा, तळेगावपासून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा थोडाफार पाया आहे. तर पनवेल व रायगडमधील माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि विद्यमान भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे शिवसेनेला पर्यायाने श्रीरंग बारणे यांना मोठा पाठिंबा मिळेल. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच मावळमध्ये शेतकरी मोर्चावर गोळीबार करण्यात आला होता, त्याच्या जखमाही अजून ताज्याच आहेत.

 

 
 

खा. श्रीरंग बारणे यांची गेल्या पाच वर्षांतली लोकसभेतली उपस्थिती, विचारलेले प्रश्न, चर्चेत घेतलेला भाग आणि महत्त्वाचे म्हणजे घाटाखालील मतदारसंघातले सोडविलेले अनेक प्रश्न त्यांच्यासाठी जमेचे ठरतील. गेल्या कित्येक काळापासून प्रलंबित राहिलेला पाण्याचा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारितील शेतजमिनी पुन्हा शेतकऱ्यांना देण्याचा प्रश्न सोडवल्याने बारणे अधिकच लोकप्रिय ठरले आहेत, तरीही त्यांना पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीप्रश्न सोडवता आलेला नाही. असे असले तरी श्रीरंग बारणे यांचा त्यांच्या एकूणच कामगिरीवरून २०१५, २०१६, २०१७, २०१८ व २०१९ असा सलग पाचवेळा ‘संसद रत्न’ म्हणून सन्मानही करण्यात आला आहे. म्हणूनच ते जनतेच्या हितासाठीच प्रतिनिधीत्व करत असल्याचे ठासून सांगू शकतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@