प्रगती पुस्तक खासदाराचे : भिवंडी मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019
Total Views |



भिवंडीत भाजपचीच दवंडी!

 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आगरी, कुणबी तर शहरी भागात मुस्लीम समाजाचे मतदान आतापर्यंतच्या निवडणुकीत निर्णायक ठरत आले आहे. त्यामुळेच २०१४ पर्यंत या मतदारसंघात भाजपचा शिरकाव झाला नव्हता. भिवंडीच्या ग्रामीण भागावर राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रभाव तर भिवंडी शहरात काँग्रेसचा वरचष्मा, असे येथील एकंदर राजकीय चित्र होते. परंतु, २०१४ मध्ये स्थानिक लोकनेते कपिल पाटील हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आणि मोदीलाटेत खासदारही झाले. मात्र त्यानंतर त्यांनी अजिबात मागे वळून बघितले नाही. सत्तेचा वापर आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कसा करायचा, हेच कपिल पाटील यांनी दाखवून दिले. त्यामुळेच आज भाजपच्या राज्यातील खात्रीच्या जागांपैकी एक भिवंडीची जागा मानली जाते.

 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शहापूर मतदारसंघ सोडला तर तीन जागी भाजपचे व दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. आता भाजप शिवसेनेची युती झाल्याने कपिल पाटील यांच्यासमोर आव्हानच नाही, अशी परिस्थिती मतदारसंघात आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून माजी खा. सुरेश टावरे यांना उमेदवारी मिळाली आहे. टावरे यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच काँग्रेसमध्ये यादवी सुरू झाली आहे. सोमवारी तर भिवंडीतील नुकत्याच निवडून आलेल्या काँगेसच्या चाळीसहून अधिक नगरसेवकांनी टावरे यांच्याविरोधात उघड बंड केले. “टावरे पक्षद्रोही असून त्यांची उमेदवारी रद्द करा; अन्यथा आम्ही सामूहिक राजीनामा देऊ,”असा इशाराही या भिवंडीत नगरसेवकांनी दिला. काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या या गोंधळामुळे कपिल पाटील यांचा मार्ग सुकर झाला आहे. त्यातच ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भिवंडीतील बंडखोर शिवसैनिकांना वेसण घातल्याने पाटील यांची शिवसेनेबाबतची चिंताही मिटली आहे. पाटील यांचे पारंपरिक विरोधक शिवसेनेचे सभापती सुरेश म्हात्रे यांनाही पालकमंत्र्यांनी गप्प बसविल्याने पाटील विजयाबाबत निश्चिंत झाले आहेत. कुणबी समाजात बर्‍यापैकी प्रभाव असणार्‍या विश्वनाथ पाटील यांना यावेळी काँग्रेसने उमेदवारीच नाकारल्याने ते यावेळी वंचित बहुजन आघाडी, बसप किंवा समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. पण कपिल पाटील यांच्या ताकदीसमोर विश्वनाथ पाटलांचा निभाव लागणे कठीण दिसत आहे.

 

 
 

कपिल पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळवले असून विकासकामांच्या बाबतीत भिवंडी मतदारसंघात खा. पाटील यांनी रतीबच घातला आहे. ‘मतदारसंघातील पाठपुराव्यासाठी ‘वर्षा’वर सर्वाधिक आढळणारे खासदार,’ असे गमतीने पाटील यांचे वर्णन केले जाते. ठाणे- भिवंडी-कल्याण मेट्रो ५, वडपे ते माजिवडा आठपदरी महामार्ग, शहापूर-मुरबाड-कर्जत- खोपोली महामार्ग, बहुचर्चित कल्याण -मुरबाड रेल्वेमार्ग, देशातील सर्वात मोठा यंत्रमाग क्लस्टर, लोजिस्तिक पार्क, ठाकुर्ली खाडी आणि दुर्गाडी किल्ल्यानजीक खाडीवर पूल, रेल्वेची असंख्य छोटी-मोठी कामे या कामांमुळे भिवंडीतील वाड्या-वस्त्यांवर पाटील यांचे नाव गेले आहे. एकंदरीतच भाजप-शिवसेना महायुतीच्या कपिल पाटील यांचा अश्वमेध यावेळी रोखणे काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला जवळजवळ अशक्यच वाटत आहे. त्यामुळे भिवंडीत भाजपचीच दवंडी ऐकायला मिळणार असल्याचा अंदाज राजकीय अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@