व्हाईट मॅन्स बर्डन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका यांच्या ताब्यात आजही असे कित्येक प्रदेश आहे की, जिथे त्यांची प्रत्यक्ष सत्ता चालते. यातील फ्रान्सच्या ताब्यातला फ्रेंच गयाना हा मोठा भूप्रदेश सोडला, तर बाकी सगळी अगदी छोटी-छोटी बेटं आहेत.


एकेकाळी जे साम्राज्य वैभव, शक्ती समृद्धी यांचं लक्षण होतं, तेच साम्राज्य आता गळ्यातलं लोढणं बनत चाललं आहे, अशी लक्षणं आहेत. आश्चर्य वाटेल पण, अगदी आज, एकविसाव्या शतकातही ब्रिटन, फ्रान्स, डेन्मार्क, पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड आणि नॉर्वे हे युरोपीय देश साम्राज्य बाळगून आहेत. एवढंच कशाला, साम्राज्यवादाची कट्टर विरोधक अमेरिकासुद्धा एकंदर १४ प्रदेशांवर हुकमत ठेवून आहे. गेली काही वर्ष ग्वान्तानामो हे प्रकरण बरेच गाजत आहे. अमेरिकन सैन्याचा ग्वान्तानामो या ठिकाणी नाविक तळ आहे. तिथे इराकी कैद्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आले, असा अमेरिकेतल्याच मानवाधिकार संरक्षणवाल्यांचा दावा आहे. हे ग्वान्तानामो बे कॅरेबियन समुद्रातलं क्यूबा या देशाच्या दक्षिण किनाऱ्यावरचं एक बंदर आहे. अमेरिका त्या ठिकाणावरचा आपला हक्क सोडायला अजिबात तयार नाही. ब्रिटन ही ‘समुद्रस्वामिनी’ आहे आणि ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही. म्हणजे जगाच्या सर्व खंडांमध्ये ठिकठिकाणी ब्रिटनचे साम्राज्य असल्यामुळे, साम्राज्याच्या एखाद्या भागात रात्र असली तरी, कुठेतरी दुसरीकडे सूर्य तळपत असतोच, असं एकेकाळी इंग्रज लोक मोठ्या गर्वाने म्हणत असत आणि खरोखर तशीच वस्तुस्थिती होती. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन पार खिळखिळे झालं. त्यामुळे त्याला आपल्या साम्राज्याचे विसर्जन करावेच लागले. पण, तरीसुद्धा आजही ब्रिटनच्या ताब्यात त्याच्या मुख्य भूमीपासून दूरदूर असलेले असे एकंदर १८ प्रदेश आहेत. स्पेन सात प्रदेशांवर, नॉर्वे सहा प्रदेशांवर, तर डेन्मार्क, पोर्तुगाल आणि हॉलंड प्रत्येकी दोन प्रदेशांवर हुकमत ठेवून आहेत. आणि खरोखरच साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, अशी स्थिती आज फ्रान्सची आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया ही खंडे आणि पूर्व पॅसिफिक, पश्चिम पॅसिफिक, उत्तर अटलांटिक आणि हिंदी महासागर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात एकंदर २१ प्रदेशांवर फ्रान्सची हुकमत चालते. जर्मनी आणि स्पेन हे फ्रान्सचे युरोपातले शेजारी. पण, त्यांच्यापेक्षाही क्षेत्रफळाने मोठी अशी फ्रान्सची सरहद्द दक्षिण अमेरिकेत आहे. म्हणजे फ्रान्स-जर्मनी किंवा फ्रान्स-स्पेन यांच्या सरहद्दींपेक्षा ब्राझिल-फ्रेंच गयाना यांची सरहद्द मोठी आहे. फ्रेंच गयाना ही आजही फ्रान्सची वसाहत आहे.

 

आधुनिक इतिहासानुसार, म्हणजेच पाश्चिमात्य संकल्पनेनुसार, जगाच्या इतिहासातलं पहिलं मोठं साम्राज्य म्हणजे ग्रीक सम्राट अलेक्झांडरचं. ते युरोपपासून भारतापर्यंत पसरलं होतं. तत्कालीन युरोपियन इतिहासकारांच्या मते, जग हे एवढंच असल्यामुळे अलेक्झांडरला ‘जगज्जेता’ म्हटलं जातं. त्यानंतरचं मोठं साम्राज्य रोमन लोकांचं. त्यांनीही युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडांमधला फार मोठा भाग व्यापला होता. मग हूण लोकांचा अटिला, मंगोलांचा चंगेझखान वगैरेंनी प्रचंड भूप्रदेश पादाक्रांत केला होता. पण, ती साम्राज्यं अल्पजीवी ठरली. त्यांच्याही आधी ख्रिश्चन या संप्रदायाचे साम्राज्य . जगभर पसरविण्याच्या महत्त्वाकांक्षेने पोप मंडळींना झपाटलं होतं. हे फक्त धार्मिक साम्राज्य नव्हतं. ‘धार्मिक ’आणि ‘राजकीय’ अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. पण, ती पूर्णपणे सफल कधीच झाली नाही. इसवी सनाच्या सातव्या शतकात इस्लाम संप्रदायाचा उदय झाला. अल्पावधीत इस्लामांचं म्हणजे अरबांचं साम्राज्य आशिया, आफ्रिका आणि युरोप यांच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर पसरलं. जसा ख्रिश्नांचा पोप, तसा इस्लामचा खलिफा. इस्लामी धर्म आणि राजकारण दोन्हींची सर्व सत्ता एकट्या खलिफाच्याच हाती एकवटलेली असली पाहिजे, असा खलिफा लोकांचा हट्ट होता. काही शतकांच्या काळात तुर्क लोकांनी इस्लामी धर्म, राजकारण आणि खलिफाची गादी हे सगळंच अरबांच्या हातातून हिसकावून घेतलं. तुर्काचं साम्राज्य हे तत्कालीन जगाच्या विशाल भूभागावर पसरलं. पुढे कित्येक शतकं ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्यातले सततचे संघर्ष हे युरोपिय राजे, सरदार व तुर्क खलिफा यांच्यातले होते.

 

१५-१६व्या शतकापासून युरोप खंडात रिनायसान्स-पुनरुज्जीवन घडू लागलं. स्पेन, फ्रान्स ही मोठी राष्ट्रं तर पुढारू लागलीच. पण, डेन्मार्क, ब्रिटन, हॉलंड, इटली ही किरकोळ राष्ट्रंही विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करू लागली. त्या आधारावर नौकानयनाच्या नव्या साधनांद्वारे जगातले नवे भूप्रदेश शोधून काढू लागली. व्यापार आणि धर्मप्रसार यांच्या नव्या वाटा शोधू लागली. स्पेनचा राजा फर्डिनंड आणि राणी इझाबेला यांच्या मदतीने इटालियन दर्यावर्दी कोलंबस याने अटलांटिक समुद्र ओलांडला. त्याचं राजा-राणीच्या मदतीने पोर्तुगीज दर्यावर्दी वास्कू-द-गामा (प्रचलित नाव : वास्को-द-गामा) याने भारताकडे जाणारा नवा मार्ग शोधून काढला. या संशोधकाच्या बरोबर किंवा मागोमाग सर्वच युरोपीय देशातल्या दर्यावर्दींनी, व्यापाऱ्यांनी, सैनिकांनी, धर्मप्रसारकांनी आशिया, आफ्रिका आणि नव्या अमेरिका खंडातील असंख्य ठिकाणी प्रवास केला. त्यांची उद्दिष्टं बहुआयामी होती. नवा भूप्रदेश शोधून काढायचा किंवा जुनाच भूप्रदेश असला तरी, तिथे प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित करायचे. म्हणजे, भौगोलिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य झाली. मग हळूहळू राजकीय व धार्मिक हालचाली सुरू करायच्या. मिळेल तो मिळेल तितका जमिनीचा तुकडा. हाताखाली घालत राहायचं. एकदा ताब्यात मिळालेली जमीन प्राण गेला तरी, सोडायची नाही. त्या भूप्रदेशातल्या मिळतील तेवढ्या लोकांना प्रलोभनं दाखवून, गोड बोलून, फसवून किंवा जबरदस्तीने ख्रिश्चन बनवायचं अन् होतील त्यांच्या जमल्यास कत्तली करायच्या, त्यांना लुटायचं, त्यांच्या जमीन लुबाडायच्या आणि त्या त्या भूप्रदेशांना आपल्या वसाहती बनवून त्याचं शोषण करत राहायचं. आधुनिक संकल्पनेनुसार यालाच ‘साम्राज्य’ म्हणतात. या संकल्पनेनुसार, स्पेनने दक्षिण अमेरिकतली माया, इंका, अ‍ॅझटेक इ. लोकांची राज्य उद्ध्वस्त केली. प्रचंड बाटवाबाटवी केली आणि या लोकांनी पिढ्यान्पिढ्या साठवलेलं सोनं, जहाज भरभरून स्पेनला नेलं. आजही दक्षिण अमेरिकन देशांवर स्पेनचा दाट ठसा आहे. उत्तर अमेरिकेत फ्रेंच आणि ब्रिटिशांनी स्थानिक रेड इंडियन लोकांच्या कत्तली उडवून आपल्या वसाहती स्थापन केल्या. पण गंमत अशी झाली की, १००-१५० वर्ष अमेरिकेत राहिलेल्या वसाहतीतल्या लोकांना ब्रिटन आपलं आर्थिक शोषण करतोय, हे कळू लागलं. यातून अमेरिकेत क्रांती झाली आणि अमेरिका स्वतंत्र देश झाला. आफ्रिकेत आणि आशियात मात्र ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल, हॉलंड यांची साम्राज्यं चांगली भरभराटत होती. अमेरिका हातची गेल्यामुळे हवालदिल झालेल्या ब्रिटनवर दैवाने मेहेरनजर केली. नंतरच्या साधारण ५० वर्षांत ब्रिटनच्या घशात भारत ही सुवर्णभूमी पडली. त्यामुळे फ्रान्सला फार वाईट वाटलं. पण, अन्यत्र फ्रान्सच्या वसाहती होत्याच आणि तिथल्या लोकांना फ्रान्स व्यवस्थित पिळून काढत होता.

 

भारताची तर ब्रिटनने जी पिळवणूक चालवली होती, तिला काही तोडच नाही. प्रथम दादाभाई नौरोजी आणि नंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी, ब्रिटनने दरसाल किती करोड रुपये भारतातून इंग्लंडला पाठवले, याची आकडेवारीच दिलेली आहे. फक्त इंग्रजाचे कौशल्य हे की, आपण मुसलमान सुलतानांप्रमाणे लूट करतो आहोत, असं त्यांनी भारतीयांना काय किंवा कोणत्याच वसाहतीतील नागरिकांना भासू दिलं नाही. या अशिक्षित, अडाणी, असंस्कृत लोकांना शिकवून सुसंस्कृत, आधुनिक बनवण्यासाठीच आम्ही इथे राज्य करीत आहोत, एकदा हे लोक सुधारले की, आम्ही हा देश सोडूनं जाऊ, असा उत्कृष्ट कांगावा इंग्रज सतत करत राहिले. त्यांची मायावी मोहिनी इतकी जबरदस्त आहे की, भारतातल्या गलिच्छ राजकारणाला विटलेले अनेक लोक ‘यापेक्षा इंग्रजांचे राज्य बरं होतं’ असे उद्गार काढू लागले. एका कथित लोकप्रिय नेत्याने तर काही वर्षांपूर्वी भारताचा कारभार चालवण्याचं कंत्राट ईस्ट इंडिया कंपनीला द्या, असे वाह्यात आणि आततायी उद्गार काढल्याचं वृत्त तत्कालीन माध्यमांनी दिलं होतं. ही परिस्थिती दुसऱ्या महायुद्धाने पालटली. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी हे साम्राज्यवादी देश खिळखिळे झाले. त्यांना आपल्या साम्राज्याचे विसर्जन करावंच लागलं. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या नव्या महासत्ता उदयाला आल्या. त्यांनी विशेषतः रशियाने साम्राज्य उभारलं, पण नव्या काळात एखाद्या भूप्रदेशावर थेट अंमल गाजवणं, ही साम्राज्याची संकल्पनाच बदलली. असं थेट कारभार करणं खर्चिक बाब बनली. त्यापेक्षा त्या देशाच्या सत्ताधाऱ्यांना आपल्या अंकित ठेवून, त्या देशातली हवी ती संपत्ती मिळवत राहणं हे कमी खर्चाचं आणि म्हणून सोयीचं ठरलं. आणि तरीही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका यांच्या ताब्यात आजही असे कित्येक प्रदेश आहे की, जिथे त्यांची प्रत्यक्ष सत्ता चालते. यातील फ्रान्सच्या ताब्यातला फ्रेंच गयाना हा मोठा भूप्रदेश सोडला, तर बाकी सगळी अगदी छोटी-छोटी बेटं आहेत. अमेरिकेच्या ताब्यातील १४ भूप्रदेशांपैकी सात बेटं इतकी छोटी आहेत की, तिथे मूळची मानवी वस्ती नाहीच. स्पेनच्या ताब्यातलं सेऊटा हे ठिकाण आफ्रिकेच्या म्हणजे मोरोक्को देशाच्या किनाऱ्यावर आहे. आजूबाजूच्या आफ्रिकन देशांमधले हजारो लोक पायी चालत सेऊटामध्ये येतात आणि स्पेनचं नागरिकत्व स्वीकारण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. तीच स्थिती फ्रान्सच्या ताब्यातल्या मेयोट या बेटाची आहे. हे बेट मोझांबिक आणि मादागास्कर यांच्यामध्ये आहे. असंख्य लोक विशेषतः गरोदर स्त्रिया वाट्टेल ते करून मेयोटमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. कारण, मेयोटमध्ये बाळंत झालेल्या बाईच्या बाळाला आपोआपच फ्रान्सचं नागरिकत्व मिळतं. स्पेन आणि फ्रान्समधले राजकारणी या प्रकारांमुळे चिंतेत आहेत. तिथले शहाणे लोक त्यांना साम्राज्याचं हे खर्चीक ओझं टाकून द्यायला सांगत आहेत. पण, राजकारणी लोक एकदा हाताखाली घातलेली जमीन सोडायला तयार नाहीत.

 

दिनूचं बिल

 

पाश्चिमात्य लोक प्रत्येक गोष्ट पैशाच्या हिशोबातच मोजतात. आपण, मुलं ही देवाघरची फुलं मानतो. देवाने दिलेली देणगी मानून मुलांवर वात्सल्याचा वर्षाव करतो. मुलांसाठी कसलाही त्याग करायला मागे-पुढे पाहत नाही. पाश्चिमात्य लोकही मुलांवर प्रेम करतात, पण या प्रेमाची किंमत किती, याचा हिशोब करण्यात काही गैर आहे असं त्यांना वाटत नाही. अलीकडेच ब्रिटनमधल्या एका सामाजिक अध्ययन संस्थेने, मुलांना वाढवायला पालकांना साधारण किती खर्च येतो, याचे सर्वेक्षण केलं. त्यात असं आढळलं की, एका मुलाला त्याच्या वा तिच्या वयाच्या २१व्या वर्षापर्यंत वाढवण्यासाठी पालकांना दर दिवसाला सुमारे २३.५० पौंड (१ पौंड = सुमारे ८० रुपये) एवढा खर्च येतो. यात त्यांनी अन्न, कपडे, औषधपाणी, शिक्षण, पाळणाघर, वेळोवेळी लागणाच्या विविध वस्तू अशा किमती धरलेल्या आहेत. सर्वेक्षण करणाऱ्यांना असेही पालक आढळले की, मुलांना योग्य ते ते सर्व उपलब्ध करून देता यावं म्हणून त्यांनी आपल्या वैयक्तिक योजना बाजूला ठेवल्या. म्हणजेच मुलांबद्दलचं प्रेम ही भावना तिथेही आहे. किंबहुना, ती सार्वत्रिक अशी मानवी भावना आहे. मग पालकांनी मुलांबद्दल वाटणारं प्रेम, त्यांच्यासाठी ते करीत असलेला त्याग यांची किंमत कशी करणार? पुन्हा त्या त्यागाची प्रतवारी कशी लावणार? एखादी आई मुलाला शिकवता यावं म्हणून स्वत:च्या नोकरीतली बढती नाकारते, याची किंमत कशी ठरवणार? आणि एखादी आई मुलाला वाढवण्यासाठी उपाशी राहते, याची किंमत कशी करणार? आचार्य अत्र्यांची ‘दिनूचं बिल’ ही कथा अनुवादित करून या सर्वेक्षणवाल्यांना कुणीतरी वाचायला द्यायला पाहिजे. आईची कामं करणारा दिनू, त्या कामांसाठी आईला आपलं बिल सादर करतो. मग आई दिनूला तिचं, बिल देते. त्यात वेगवेगळ्या मुद्द्यांसमोर ‘काही नाही’ असं लिहिलेलं असतं. एकूण बिलाची रक्कम असते काही नाही.’ मुलांना वाढविण्यासाठी भारतीय आई-वडील फक्त प्रेम खर्च करतात. दुसरं काही नाही. काहीच नाही!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@