बुरखे फाटू लागले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |


ओमर अब्दुल्ला किंवा मेहबूबा मुफ्ती जे बोलत आहेत, त्याची खरी कारणे निराळी आहेत. खुद्द त्यांच्याच भूमीत त्यांचेच फाटणारे बुरखे ही त्यांची खरी अडचण आहे.

 

२०१९ची लोकसभा निवडणूक ही मुळात ‘भाजप विरुद्ध काँग्रेस’ अशी दिसत असली तरी ती तशी नाही. ही लढाई वरवर दोन पक्षांची दिसत असली, तरी ती आहे दोन विचारधारांची. एक आहे देशाभिमानी मंडळींची आणि दुसरी आहे एकाच घराण्याच्या दावणीला बांधलेल्या मंडळींची. या विधानांना पूरक ठरावा, असा घटनाक्रम सध्या आपल्याकडे घडत आहे. जम्मू-काश्मीरच्या बाबतीत ओमर अब्दुल्ला किंवा मेहबूबा मुफ्ती जे बोलल्या, ते याच लढाईच्या निमित्ताने समोर येत असलेले कुरूप वास्तव आहे. या अशा ठिणग्या उडणार आणि अनेकांचे बुरखे असेच फाटत राहणार. या मूर्ख लोकांना आज लक्षात येत नसलेली गोष्ट ही आहे की, ज्याच्यासमोर ते या घोषणा देत आहेत, त्यानेही कधीतरी लाल चौकात येऊन तिरंगा फडकवला आहे.

 

जम्मू-काश्मीरमधलेच राजकारणी आज ज्या प्रकारचे फुत्कार काढत आहेत, त्याची आजची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. समजून घेणे अशासाठी की, या सगळ्याला एक वेगळा आणि नवा आयाम आहे. संदर्भही बदलले आहेत. जम्मू-काश्मीर धुमसते ठेवण्यामागे ज्यांचे अंतस्थ हेतू आहेत. त्यात शेख परिवार, मुफ्ती परिवार, हुरियत आणि अन्य फुटीरवादी नेते मोठ्या प्रमाणावर आहेत, जे गरळ ओकत आहेत, त्याला एक पार्श्वभूमी आहेच. स्वत:च्या अस्तित्वासाठी आज या सगळ्यांना अधिक भडकाऊ आणि अधिक भारतविरोधी होणे आवश्यक आहे. ओमर आज जे बोलले ते आजचे नाही. त्याचे बाबा आणि आजोबा ही पिपाणी वारंवार वाजवित आले आहेत.

 

‘जम्मू-काश्मीरचे प्रथम परिवार’ अशी बिरूदावली मिरविणार्‍या या परिवाराने जम्मू-काश्मीरच्या मूलभूत प्रश्नांना कधी हात घातलाच नाही. मात्र, भारतद्वेषाचे राजकारण पाठीमागून चालूच ठेवले. ओमर जे काल बोलला, ते डॉ. करन सिंह यांनी लगेचच खोडून काढले. महाराजा हरिसिंगांनी जी अट जम्मू-काश्मीरचे विलीनीकरण करताना घातलीच नव्हती, तिची साक्ष काढून आता ओमर मतांचा जोगवा मागत आहेत. डॉ. करनसिंहांनी जे सांगितले, ते देशातील अन्य कुणी म्हटले असते तर मोठाच आगडोंब उसळला असता. जे विलीनीकरण राजा हरिसिंगांनी केले होते, शेख अब्दुल्लांचा त्याच्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता. हे सगळे दस्तावेज आजही लोकांसाठी उपलब्ध आहेत. इंटरनेटवरही ते वाचायला मिळतात. मात्र, आज ही लढाई काश्मीरची नसून मोदीद्वेषाची असल्याने माध्यमातील मोदीद्वेष्ट्यांनी ओमर अब्दुल्लांची विधाने घाऊक पद्धतीने चालविण्याची शपथ घेतली आहे. ३७० वे कलम हटविले गेले तर भारतासोबत जम्मू-काश्मीर राहणार नाही, हे मेहबूबा मुफ्तींचे विधानही याच विचारांच्या मातीत रूजले आहे. कुणाला वाटेल की, ही मंडळी तीच आहेत आणि त्यांच्या विचारातला विखारही तोच आहे.

 

मात्र, गेल्या चार-पाच वर्षांतील स्थिती बदललेली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या काही घटना त्याचेच प्रतीक आहेत. यासिन मलिकसारख्या फुटीरवाद्याला पहिल्यांदाच काही गंभीर गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. मोर्चे, घोषणा यासाठी ही अटक नसून खून, अपहरण अशा गुन्ह्यांत त्याला अटक झाली आहे. या सगळ्या तक्रारी स्थानिक आहेत. मात्र, आजतागायत या मंडळींची गचांडी गांभीर्याने आवळण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. पुलवामा घटनेनंतर सरकारने सर्व फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा काढून टाकली. त्यांच्या संघटनांवरील कारवायांवर बंदी घातली आणि त्यांच्याविरोधातली गंभीर गुन्ह्याचे आरोप सिद्ध करण्याची तयारीही सुरू आहे. त्याच्याविरोधातली गुन्हेही आता जम्मू न्यायालयाकडे वर्गीकृत करण्यात आले आहेत. ही फक्त यासिन मलिकची बाब नाही. सगळ्यांचेच हाल कमीअधिक प्रमाणात असेच आहेत.

 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘काश्मिरियत’च्या नावाखाली ज्या लोकांनी काश्मिरी लोकांचे नेतृत्व करण्याचा भास निर्माण केला, त्यांना आता यांनी स्वत:चे उखळ पांढरे कसे करून घेतले, याचे भान येऊ लागले आहे. भारतीय लष्कराने चालविलेल्या शाळांमध्ये मुलांनी जाऊ नये, यासाठी काश्मिरी जनतेला चेतविणार्‍यांमध्ये पुढे असलेल्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात आणि अत्यंत ऐषोआरामाचे आयुष्य जगत असतात. त्यांची सूचीच्या सूची आता काश्मिरी जनतेच्या हातात पडत आहे. रस्त्यावर येऊन दगड मारणार्‍या काश्मिरी तरुणांच्या चिडचिडीचे एक कारण तेही आहे. जिहादींचा भस्मासूर आता इतका पिसाळला आहे की, बांदीपोरा इथे आतिफ मीर नावाच्या एका लहान मुलाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या विरोधात तिथले सगळे स्थानिक उभे राहिले. फुटीरतावादी नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या हफीजुल्ला मीरची हत्या दहशतवाद्यांनी केली. या सगळ्यातून आज जम्मू-काश्मीरमध्ये एक विचित्र अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 

आज या सगळ्या परिस्थितीवर भारत सरकारने पूर्ण ताबा मिळविला आहे, असे म्हणायला वाव नसला तरी ही वाटचाल त्या दृष्टीने सुरू आहे. बाहेरून जम्मू-काश्मीरमध्ये घडत असलेल्या घटनांवरून तिथे परिस्थिती बिघडतच असल्याचा भास निर्माण होत असला तरी स्थिती मात्र उलट आहे. या बदलत्या काश्मीरमुळे एरव्ही देशात असताना दिल्ली, मुंबईत पंचतारांकित आयुष्य जगणार्‍या किंवा परदेशाात गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍यांवर आपल्या मुलांची व्यवस्था लावणार्‍या या नेत्यांना आता जम्मू-काश्मीरमध्ये येऊन झगडावे लागत आहे. या मंडळींकडून असले राजकीय फुत्कार निघणे नैसर्गिकच आहे. कारण, पर्यायाने आज हा प्रश्न त्यांच्या अस्तित्वाचा झाला आहे. २०१९ ला या देशात कोणाचे सरकार येईल, याचे पडसाद आता देशभर उमटत असले तरीही त्याचा धसका ज्यांनी घेतला आहे, त्यांचे हे आर्त स्वर आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@