बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |



 

भाजप महाराष्ट्रच्या  ट्विटर हॅंडलवरील व्यंगचित्र 


सामान्य माणसांमधूनच राजकारणी पुढे येतात. त्यामुळे सामान्यांचे गुणदोष राजकारण्यांमध्ये असतातच. मनस्वी, लहरी, हेकेखोर, हट्टी, माजोरडेपणा हे अवगुण कमीअधिक प्रमाणात सर्व माणसांमध्ये आढळतात. पण, या अवगुणांचा अतिरेक झाल्यास ते कोणासाठीही हानिकारकच असते. हे येथे आठवण्याचे कारण म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची टोकाची भाजपविरोधी आंधळी राजकीय भूमिका होय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे असलेल्या राज ठाकरे यांनी गेली तीन दशके आपल्या प्रभावी वक्तृत्वाने मराठी तरुणाईवर गारुड केले. सुरुवातीला शिवसेनेसाठी, त्याचबरोबर नंतर युतीसाठीही त्यांनी अनेक भाषणे करून लोकांकडे मते मागितली आहेत. त्यानंतर गेली १४ वर्षं ते मनसेसाठी भाषणबाजी करत आहेत. पण, आता मात्र परिस्थितीत एवढा मोठा बदल झालाय की, ते आता स्वतःच्या पक्षाला बाजूला ठेवून चक्क काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी मते मागणार आहेत. काँग्रेस किती भ्रष्ट, जातीयवादी व दांभिक आहे, त्याचबरोबर काँग्रेसने भारतीय राजकारण कसे नासवलेय, हे सांगण्यासाठीच त्यांची आतापर्यंतची भाषणे खरं तर खर्ची पडली होती. आता मात्र ते काँग्रेस देशासाठी कशी आवश्यक आहे, यासाठी आपले वक्तृत्व पणाला लावणार आहेत. या विसंगतीमुळेच राज ठाकरे यांचे मनसैनिकच बुचकळ्यात पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. २००९ व २०१४ साली मनसेने लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकांमध्ये त्यांना मतेही चांगली पडली होती. पण, यावेळी त्यांनी एकही जागा न लढविण्याची अतर्क्य भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनसेची ताकद आता बरीच कमी झाली असली तरी आजही मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक पट्ट्यात राज यांच्या भाषणांनी संमोहित झालेले लाखो मतदार आहेत. असे असताना निवडणूक लढवायची संधी देऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यायचे सोडून दुसऱ्याच पक्षांच्या दावणीला बांधण्याचे काम राज यांच्याकडून होताना दिसते. राज यांच्या ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ या पद्धतीच्या राजकारणाचा फटका भविष्यात त्याना बसेल, हे नक्की.

 

मनसैनिकांचा डीएनए काँग्रेसविरोधी


महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राज ठाकरेंनी स्थापन केलेल्या पक्षात जे कार्यकर्ते कार्यरत आहेत
, त्यांचा डीएनए मुळात काँग्रेसविरोधी आहे. मनसैनिकांमधील काही मूळचे शिवसैनिक, तर नवीन पिढी आक्रमक राजकारण करणारी आहे. ‘पुरोगामी राजकारणा’च्या नावाखाली प्रत्यक्षात ‘प्रतिगामी राजकारण’ करणार्‍या दांभिक काँग्रेसी राजकीय शैलीचा मनसैनिकांना तिटकारा आहे. मनसैनिकांच्या अशा जडणघडणीमुळे ते या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा कसा आणि कितपत प्रचार करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ही लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी मनसे काँग्रेस आघाडीत जाणार, अशी वदंता होती. राष्ट्रवादी म्हणे यासाठी आग्रही होती. पण, नंतर कुठे काय फिसकटले, हे समोर आले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांना मनसे स्थापन केली त्यावेळीच प्रत्येक निवडणूक लढविण्याची सूचना केली होती. पण, आता राज हे पवारांच्या अतिशय जवळ असूनही पवारांनी त्यांना तशी का सूचना केली नाही, हे समजायला मार्ग नाही. एकतर त्यांची सूचना राज यांनी अव्हेरली असावी किंवा पवार यांनी तसे सांगितलेच नसावे. कल्याण लोकसभा मतदारसंघात २०१४ साली मनसेच्या राजू पाटील या उमेदवाराने दीड लाखांच्या आसपास मते घेतली होती. यावेळीही पाटील यांनी लोकसभा लढविण्याची पूर्ण तयारी केली होती, असे समजते. परंतु पक्षादेश न मिळाल्याने पाटील यांना स्वस्थ बसावे लागले. यावेळी जर मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस आघाडीची साथ मिळाली असती, तर कदाचित ही लढत अधिक रंजक ठरली असती.परंतु, ती संधी घालवून राज आता काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्याचे नियोजन करत आहेत. मोदीविरोध हे सध्या राज यांच्या राजकारणाचे मुख्य धोरण आहे. परंतु, असे एककल्ली राजकारण राज यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. कारण, एका व्यक्तीला विरोध किती करायचा, यालाही मर्यादा आहेत. राजकीय टीकेपुरता हा विरोध एकवेळ समजून घेता आला असता परंतु, आंधळा विरोध हा राज यांनाच ‘कुर्‍हाडीचा दांडा गोत्यास काळ’ ठरण्याची शक्यता आहे.

 
- शाम देऊलकर 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@