बॅडमिंटनमध्ये भारताचे ‘यथिराज्य’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019   
Total Views |



आशियाई पॅरालिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत देशाला पदक मिळवून देणार्‍या दिव्यांग सुहास लालिनाकेरे यथिराज यांची ही प्रेरणादायी कहाणी...

दर चार वर्षांनी जगभरातल्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांनाही शेकडो प्रकारच्या खेळांचा उत्सव असलेल्या ऑलिम्पिकची प्रतीक्षा असते. परंतु, ऑलिम्पिकमध्ये सामान्य व्यक्तीच भाग घेतात, तिथे दिव्यांग बहुतेकदा सहभागी होत नाहीतच. दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा या ‘पॅरालिम्पिक’ नावाने होतात, जिथे देशोदेशींचे स्पर्धक जिंकण्याच्या ईर्ष्येनेमैदानात उतरतात. हे झाले जागतिक स्पर्धांविषयी. पण, आशियाई देशांतील दिव्यांगांच्याही स्वतंत्र स्पर्धा होतच असतात. तसेच ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिक वा आशियाई क्रीडास्पर्धा जशा वैश्विक स्तरावर खेळवल्या जातात, तशाच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धाही आयोजित करण्यात येतात. आज आपण अशाच एका खेळाडूची आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍याची माहिती करून घेऊ जे दिव्यांग आहेत, पण त्यांनी आशियाई पॅरालिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत देशाला पदक मिळवून दिले. सुहास लालिनाकेरे यथिराज हे त्यांचे नाव.

सुहास लालिनाकेरे यथिराज, २००७च्या उत्तरप्रदेश केडरचे आयएएस अधिकारी असून सध्या प्रयागराजच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत आहेत. तथापि, एक प्रशासकीय अधिकारी असण्याबरोबरच सुहास एक पॅरा-अ‍ॅथलिट-दिव्यांग खेळाडूदेखील आहेत. २ जुलै, १९८३ रोजी कर्नाटकमधील हसन येथे सुहास यांचा जन्म झाला. जन्मल्यापासूनच सुहास लालिनाकेरे यथिराज यांचा एक पाय व्यवस्थितरित्या काम करू शकत नसे. आपल्याकडे कोणी दिव्यांग म्हणून जन्माला आला की, संबंधित व्यक्तीकडे समाज तत्काळ चित्रविचित्र नजरेने पाहतो, काहीबाही बोलतानाही दिसतो. कित्येकदा तर दिव्यांगांच्या सक्षमीकरणाऐवजी सहानुभूती दाखवण्यावरदेखील भर दिला जातो. सुहास यांच्याबाबतीतही थोड्याफार प्रमाणात असे अनुभव येतच होते. परंतु, कुटुंबीयांच्या पाठबळावर सुहास यांनी आपली वाटचाल सुरू केली व ते यशस्वीही झाले. दिव्यांग असणे, हा त्यांच्या आयुष्यासाठी कधीही दुबळेपणा ठरला नाही. उलट आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर सुहास यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली, अस्तित्व निर्माण केले. परिणामी, अधिकारी म्हणून तर उत्तम काम करत आहेत, पण गेल्या कित्येक वर्षांपासून एक बॅडमिंटनपटू म्हणूनही सुहास तिरंग्याची शान वाढवत आले.

 

२०१६ साली चीनची राजधानी बीजिंगमध्ये आशियाई पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सुहास यथिराज यांनी इथे भारताचे प्रतिनिधीत्व केले आणि बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेच्या दरम्यान ते आझमगढचे जिल्हाधिकारी होते. उल्लेखनीय म्हणजे सुहास यथिराज हे पहिलेच भारतीय सनदी अधिकारी होते, ज्यांनी अशा प्रकारची कामगिरी केली. तद्नंतर २०१७ साली तुर्कस्तानमध्ये झालेल्या एकेरी आणि दुहेरी पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक, तसेच याचवर्षी जपानमध्ये झालेल्याएकेरी स्पर्धेत रौप्य आणि दुहेरीत कांस्यपदक, २०१८ साली तुर्कस्तानमध्ये आयोजित पॅरा-बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेत सुहास यांनी रौप्यपदकावर नाव कोरले. सोबतच २०१८ सालीच वाराणसीत झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक आणि याचवर्षी इंडोनेशियात झालेल्या आशियाई स्पर्धेत सुहास यांनी कांस्यपदक मिळवले.

 

आपल्या कामाबद्दल, खेळाबद्दल आणि दिव्यांगतेबद्दल सुहास सांगतात की, “मी स्वतःला कधीही दिव्यांग समजले नाही आणि हा विचार मला माझ्या आई-वडिलांकडूनच मिळाला. घरातही कधी कोणी माझ्याशी विशेष अशी वेगळी वर्तणूक दिली नाही. माझ्या आईवडिलांनी मला माझ्या वर्गात शिकणार्‍या मुलांच्या बरोबरीनेच खेळण्यासाठी प्रेरित केले आणि शाळेत होणार्‍या सगळ्याच धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ दिला. तथापि, बहुसंख्य दिव्यांग वा विशेष मुलांचे आई-वडील असे करत नाहीत. कोणताही टॅबू किंवा मानसिकता घरातूनच सुरू होते, हे जसे खरे, तसेच एक सामान्य आयुष्य जगण्याची ताकदही घरातूनच मिळते. जी मला मिळाली.”

 

सुहास यथिराज यांचे वैशिष्ट्य म्हणजे जागतिकस्तरावरील एकेरी पॅरा-बॅडमिंटन वर्गवारीमध्ये ते सध्या द्वितीय क्रमांकावर आहेत. याव्यतिरिक्त आपली बॅडमिंटनची आवड पूर्ण करतानाच ते व्यावसायिक जबाबदारीही व्यवस्थित निभावत आहेत. एक आयएएस अधिकारी असल्याने सुहास यांच्यावर बर्‍याच जबाबदार्‍या आहेत, कामेही आहेत आणि या सगळ्यासाठीच त्यांना अधिक वेळही द्यावा लागतो. तरीही ही सगळीच कामे करताना ते बॅडमिंटन खेळण्यासाठी थोडाफार तरी वेळ काढतातच. दुसरीकडे आपल्या खेळाच्या सरावाचा आपल्या कामावर परिणाम होऊ नये, म्हणूनही ते सजग असतात. सध्या देशात निवडणुकांचा माहौल आहे, म्हणूनच ते दिव्यांग मतदात्यांची मदत करण्यासाठी एक विशेष मोबाईल अ‍ॅप तयार करत आहेत. कुपोषित बालके आणि गर्भवती महिलांच्या गरजा समजण्यासाठी याआधी सुहास यांनी ‘कुपोषण का दर्पण’ आणि ‘प्रेग्नन्सी दर्पण’सारख्या अ‍ॅपचीदेखील निर्मिती केली आहे.

 

उत्तरप्रदेशमधील शहरांत परिवर्तन व्हावे म्हणून प्रयत्न केल्याबद्दल २०१६ साली त्यांचायश भारती’ पुरस्काराने गौरवदेखील करण्यात आला आहे. सुहास यांच्या आयुष्यावरून, कामावरून आणि खेळावरून हे स्पष्ट होते की, आयुष्याप्रति त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आणि दृढ-संकल्पित आहे. आपल्या कामातून आणि खेळातून देशाचे नाव रोशन करणार्‍या सुहास यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@