लोकशाहीची गळचेपी होते म्हणणार्‍यांचे थोबाड फोडले पाहिजे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |

 

विक्रम गोखले यांचा संताप

मुंबई : लोकशाहीची गळचेपी होते आहे, असे म्हणणार्‍यांचे थोबाड फोडले पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टीवर जाऊन मजा करणारे आणि मतदानाकडे पाठ फिरवणारे लोक या देशाचे पहिले शत्रू आहेत,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होण्याची गरज आहे,” अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईतील विलेपार्ले येथे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

देशात सातत्याने लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीची गळचेपी होते आहे असे बोलले जाते त्यावर तुमचे मत काय? असे विचारले असता, “कोण असे म्हणते त्यांना माझ्यासमोर आणा! मी आत्ता माझे मत मांडतो आहे. येथे प्रत्येकजण मत मांडू शकतो, यांना मतदान करा किंवा करू नका हे सांगू शकतो, अशावेळी गळचेपी होते आहे, अशी ओरड करणारी माणसे आहेत कोण? त्यांना माझ्यासमोर आणा,” असे आव्हानच विक्रम गोखले यांनी दिले. इतकेच नाही, तर लोकशाहीची गळचेपी होते, असे म्हणणार्‍यांना थोबडावून काढले पाहिजे, असेही मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात लोकसभेसाठी जे मतदान झाले, त्याचा चौथा टप्पा काल होता. मुंबईसह अनेक भागांमध्ये मतदान झाले. मतदानासाठी लोकांनी बाहेर पडलेच पाहिजे. पाच वर्षांनी एकदा आपल्याला ही संधी मिळते. आपल्यावर कोणी राज्य करावे, हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि तो अधिकार आपण बजावलाच पाहिजे,” असे आग्रही मत विक्रम गोखलेंनी व्यक्त केले.

एवढेच नाही, तर प्यायचे पाणी फेकून देणे हा देखील एक मोठा गुन्हा आहे असे मी मानतो. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला आहे. माझ्याकडे आलेल्या माणसालाही मी विचारतो किती पाणी पिणार ते सांगा? अर्धा ग्लास, पाऊण ग्लास. ते संपवा, असेही मी बजावतो. कारण, उरलेले पाणी फेकून देणे हा गुन्हा आहे, असे मी मानतो. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी मिळत नाही, अशावेळी पाणी जपून वापरणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असेही विक्रम गोखलेंनी म्हटले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@