माणुसकीचे नंदनवन माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर, जुन्नर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019   
Total Views |



समाजातील दुर्बल, गरीब, वंचित मतिमंद मुलांसाठी काम करण्याच्या उद्देशाने २०१२ मध्ये ‘माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’ची स्थापना विकास घोगरे यांनी केली. या सेंटरमध्ये २२ मतिमंद मुले शिकत आहेत, तर १४ जणं निवासी शिक्षण घेत आहेत.

 

भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा

शाहिरांच्या देशा कर्त्या-मर्दांच्या देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा...

 

आज महाराष्ट्र दिन... महाराष्ट्राच्या पावन मातीत त्याग, निष्ठा आणि जिद्द यांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळे समाजबांधवांच्या हितासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणारे सेवाभावी लोक आणि संस्था इथे कमी नाहीत. स्वत: दु:खाचे चटके खाऊन त्या धगीने इतरांना सावली देणार्‍या संस्थांपैकी एक संस्था जुन्नरची ‘माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’ ही आहे. या संस्थेचे नावच ‘माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’ आहे. याचाच मराठी अनुवाद ‘माझे कार्य केंद्र’ असे ढोबळमानाने होऊ शकतोे. पण, या संस्थेचे संस्थापक विकास सांगतात, “संस्थेच्या नावातील ‘माय’ शब्दाचा अर्थ ‘माझे’ नसून त्या शब्दाचा अर्थ ‘आई’असा आहे. ‘आईच्या कार्याचे केंद्र’ असा संस्थेच्या नावाचा मूळ अर्थ आहे.” विकास घोगरे हे ‘माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’चे संस्थापक असले तरी, त्यांचे म्हणणे असे की, ही संस्था नाही तर घर आहे. या घरामध्ये २२ जणं माझे कुटुंबीय आहेत. विकास यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. कारण, या २२ मुलांसाठी दोन्ही वेळचे जेवण आणि नाश्ता विकास यांची आई आणि पत्नी बनवते. तसेच पत्नी अश्विनी ही २२ मुलांची आईच्या मायेने काळजी तर घेतेच. शिवाय, त्यांना शिकवतेही. अश्विनी यांनीही मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचे प्रशिक्षण घेतले आहे. विकास यांची मुलगी मुलांना गाणी-गोष्टी आणि नृत्य शिकवते. एकंदर पूर्ण कुटुंब २२ विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे.

 

विकास यांच्या आयुष्याच्या प्रवासातून संस्थेचे जीवन उलगडले तर जाणवते की, दु:खाची अनुभूती घेतलेला माणूस दुसर्‍याच्या दु:खाची तीव्रता समजू शकतो. विकास यांना आधी दोन भाऊ. आपल्याला एक मुलगी असावी, असे विकास यांच्या आईला वाटे. पण तिसर्‍या वेळीही मुलगाच झाला. आईने वयाच्या पाच वर्षापर्यंत विकास यांना मुलीसारखे वाढवले. त्यामुळे विकास यांची देहबोली मुलींसारखीच झाली. आईला घरकामात ते मदत करू लागले. भांडी घासणे, धुणी धुणे, स्वयंपाक बनवण्यास मदत करणे इ. रूपवान विकास यांच्या वागण्या-बोलण्यात मुलींसारखी छटा येऊ लागली. यात विकास यांचा काही दोष नव्हताच. कारण, शरीराने ते पूर्णत: मुलगाच होते. पण आजूबाजूच्या घडणावळीने त्यांच्या बोलण्या-चालण्यात मुलींच्या वागण्या-बोलण्याच्या छटा आल्या होत्या. त्यांच्या वडिलांनी ‘सातवीनंतर शिकून काय करणार’ म्हणून शिक्षण सोडण्याचा आग्रह धरला. मात्र, मामाने घरी कामाला हातभार लागेल म्हणून विकासला स्वत:सोबत नेले. तेथेही घरकाम वगैरे ते करू लागले. पुढे पुन्हा स्वत:च्या घरी परत आले. तिथे छोटी-मोठी कामे करून, आईसोबत शेजमजुरी करत बारावीपर्यंत शिकले. पण बारावीला ते अनुत्तीर्ण झाले. एकंदर सर्वच परिस्थितीने ते खचले. याच नैराश्यात ते गाव सोडून मुंबईला पळून आले. एका नातेवाईकाच्या आसर्‍याला राहिले. दुसर्‍याच दिवशी त्यांना मुंबईमध्ये घरकाम करण्याची नोकरीही मिळाली. तिथेच राहायचे आणि घरकाम करायचे. पुढे मुंबईमध्ये सात वर्षे ते घरगडी म्हणूनच काम करत होते. किशोर वय संपले होते. या काळात ते डीटीपी, मराठी टायपिंग शिकले. फावल्या वेळात पत्रकार म्हणून काम करू लागले. नृत्याची आवड होती. त्याचेही शिक्षण घेतले. सात वेळा बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर ते बारावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर मानशास्त्रज्ञ विषयात पदवी संपादन करून, डी.एस.ई. फॉर मेन्टली रिटार्डेड, बी.एड, एम.एस.डब्ल्यू या शिक्षणासोबतच एन.सी.सी., भरतनाट्यम, लोककला प्रशिक्षण, चित्रकला प्रशिक्षण घेतले.

 

त्यातच त्यांची एका स्त्रीशी ओळख झाली. ती सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या हुद्द्यावर होती. त्या स्त्रीचा मुलगा मतिमंद होता. तिने विकास यांना विचारले, “माझ्या मुलाला सांभाळण्याचे काम करशील का?” यासंबंधीचे प्रशिक्षण देण्याचीही तिने व्यवस्था केली. या प्रशिक्षणाचे शुल्क जास्त होते. मात्र, तीन-चार महिन्यातच या स्त्रीने प्रशिक्षण शुल्क देण्याचे नाकारले. दरम्यान, विकास यांना मतिमंदत्व म्हणजे काय? या मुलांचे जगणे कसे असते?याची माहिती झाली होती. या दरम्यान, मतिमंद मुलांशी ओळखही झाली होती. त्यांचे जगणे आणि जीवंत असूनही जीवंत नसणे हे विकासच्या मनाला चिरून गेले. आपल्या आयुष्याचे दु:ख या मुलांच्या जगण्यापलीकडे काहीच नाही, अशी जाणीव त्यांना झाली. त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण करायचे ठरवले. पण शुल्क कसे भरणार? विकास रात्री ‘लावणी शो’मध्ये लावणी करू लागले. दिवसा प्रशिक्षण घेऊ लागले. या दरम्यान त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. पण, त्यांनी जिद्द सोडली नाही. जगण्याच्या सीमारेषेवर रेंगाळणार्‍या या निष्पाप बालकांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले. त्यामुळेच त्यांनी ‘माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’ सुरू केले.

 

हे काम सुरू करायचेच या तळमळीने विकास यांनी स्वत:वर पहिल्यांदा परिश्रम घेतले. स्वत:चे वागणे-बोलणे पूर्णत: बदलले. एक कणखर जिद्दी तरुण अशा प्रतिमेत ते संपूर्णत: परावर्तित झाले. प्रशिक्षण कालावधीत या क्षेत्रात काम करणार्या लोकांशी उत्तम संपर्क आल्यामुळे या अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचे काम सुयोग्य पद्धतीने सुरू झाले. तसेच हे सेंटर सुरू करण्याआधी विकास यांनी मुलांसाठी काम करणार्या अनेक संस्थांमध्ये कामही केले. विजय जाधव यांच्या ‘समतोल’ या संस्थेमध्ये काम करतानाचा अनुभव त्यांना फारच मोलाचा ठरला. पुढे पत्नी मिळाली तीही अशीच सेवाभावी वृत्तीची. दोघांच्या समविचाराने ‘माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’चे काम व्यवस्थित सुरू आहे. आर्थिक कमतरता आहेच पण, समाजातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या थेट सहकार्याने ती थोडी भरून निघते.

 

सध्या संस्थेत एकूण २२ मतिमंद बांधव लाभ घेत आहेत. त्यात १४ निवासी बांधव आहेत. संस्थेच्या माध्यमातून खालील उपक्रम राबविण्यात येत आहेत.

- हिम्मत : या प्रकल्पामध्ये ० ते ६ वयोगटातील मुलांसाठी विविध थेरपीज विनामूल्य दिल्या जातात.

- फुलपाखरू शैक्षणिक उपक्रम : यामध्ये ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते.

- स्वावलंबन - ‘व्यवसायपूर्व प्रशिक्षण केंद्र’ यामध्ये १८ वर्षांपासून पुढील मुलांकडून त्याच्या कुवतीनुसार शोभेच्या विविध वस्तू बनवून घेतल्या जातात व त्यांची प्रदर्शनांंतून विक्री केली जाते. यातून मिळणार्‍या मोबदल्यात मुलांच्या नावावर काही रक्कम बचत म्हणून ठेवली जाते.

- नंदनवन वसतिगृह : आयुष्याच्या उतरत्या वयात प्रत्येक पालकाला भेडसावणारी समस्या म्हणजे ते गेल्यानंतर त्यांच्या पाल्याचे काय होणार? म्हणून वय वर्षे १८ पासून पुढील केवळ मुलांसाठी निवासाची सोय केली आहे.

- बळीराजा शेती प्रकल्प - यामध्ये मुलांकडून सेेंद्रिय पद्धतीने शेती करून घेतली जाते.

- रंग माझा वेगळा : दिव्यांग कलाकारांना आपली कला सादर करता यावी म्हणून त्यांच्यासाठी ऑर्केस्ट्रा तयार केला आहे.

 

पुढील काळात गरीब गरजू अशा १०० हून अधिक मतिमंद, दिव्यांग बांधवांकरिता पुनर्वसन, सर्वांगीण विकास, सुसज्ज सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विकास प्रयत्न करीत आहेत. सद्यस्थितीत ‘नंदनवन’ला मासिक अंदाजे ७० हजार रुपये खर्च येतो. ही रक्कम उभी करण्यास खूप मेहनत घ्यावी लागत आहे. यामुळे साधरणत: मासिक ७० हजार रुपये मुदत ठेवीतून मिळण्याकरिता शाश्वत निधी उभारणी करणे गरजेचे आहे. याकरिता वार्षिक नंदनवन पालकत्व, भोजन निधी योजना, वाढदिवस भेट आदी योजना राबवित आहोत.रुपाली सचिन बोकरिया यांनी १० गुंठे जमीन विनामूल्य दिली आहे. सध्या बांधमासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील विवेकशील दानशूर व्यक्तींच्या श्रम-बुद्धी-सेवा-सहयोग याची नितांत गरज आहे.

 

विकास यांनी समाजाला आवाहन केले आहे की, जुन्नरच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरकपारीत विसावलेल्या ‘माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’ला एकदा तरी भेट द्या, मार्गदर्शन करा, सूचना द्या आणि सहकार्य करा. विकास घोगरे या तरुणाची जिद्द वाखण्यासारखी आहे. जुन्नरला मतिमंद विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढण्याची आणि कसेही करून ते वसतिगृह व्यवस्थित चालवण्याचा त्याचा संघर्ष आणि प्रयत्न पाहिला की वाटते, या महाराष्ट्राच्या भूमीत काहीच अशक्य नाही. निदान तशी प्रेरणा ठेवणारे ‘माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’ राबवणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत तरी या उज्ज्वल देशा, मंगल देशाची थोरवी अबाधितच राहणार आहे.

 

९५९४९६९६३८

माय अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर,

विकास घोगरे-७९७२४४४०८९

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@