राजनिवृत्ती आणि राज्यारोहण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019   
Total Views |


 


जपानच्या पडझडीपासून ते त्याच्या ‘फिनिक्स भरारी’पर्यंत या देशात राजेशाहीची भूमिका कायम महत्त्वाची राहिली. मात्र, राजेशाहीची तब्बल २६०० वर्षांची परंपरा असलेल्या या देशात आता राजाने वयोमानापरत्वे निवृत्ती घेतली आहे.


उगवत्या सूर्याचा देश
’ म्हणून सुपरिचित असलेला पूर्वेकडील बेटांचा छोटासा देश जपान. भारतासारख्या सर्वांगीण विविधतेने नटलेल्या देशापेक्षा तब्बल नऊपट आकाराने लहान असला तरीही सांस्कृतिक संपन्नतेने चकित करणारा हा देश. संस्कृतीला सर्वोपरी मानणारा, अणुबॉम्बच्या भीषण हल्ल्यातून सावरलेला, तंत्रज्ञानातून विकासाला गवसणी घालणारा जपान. या देशात प्रारंभीपासूनच राजेशाही प्रबळ राहिली. दुसर्‍या महायुद्धातही जपानने याच राजेशाहीच्या जोरावर रणांगणात उडी घेतली. जपानचेही काही निर्णय हमखास चुकले, तर काही निर्णयांनीच आज जो जपान आपल्यासमोर उभा आहे, त्याची पायाभरणी केली. त्यामुळे जपानच्या पडझडीपासून ते त्याच्या ‘फिनिक्स भरारी’पर्यंत या देशात राजेशाहीची भूमिका कायम महत्त्वाची राहिली. मात्र, राजेशाहीची तब्बल २६०० वर्षांची परंपरा असलेल्या या देशात आता राजाने वयोमानापरत्वे निवृत्ती घेतली आहे.

जपानचे ८५ वर्षीय सम्राट अकिहितो यांचा राजनिवृत्ती सोहळा मोठ्या दिमाखात जपानमध्ये संपन्न झाला आणि बुधवारीच त्यांचे ५९ वर्षीय ज्येष्ठ पुत्र आणि आता जपानचे १२६ वे सम्राट नारुहितो यांचा राज्यारोहण सोहळाही तितक्याच उत्साहात पार पडला. खरंतर २०१६ सालीच अकिहितो यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. २००३ साली त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले होते, तर २०१२ साली त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही पार पडली होती. त्यामुळे वयोमानानुसार राजपाठाची जबाबदारी आपल्याला कितपत नेटाने सांभाळता येईल, याविषयी खुद्द अकिहितोच साशंक होते. पण, अखेरीस त्यांनी राजनिवृत्ती घेत आपले ३० वर्षांचे ‘हैसई पर्व’ अर्थात ‘शांतता पर्व’ समाधानपूर्वक पूर्णत्वास आणले. जपानमध्ये सम्राटांना राजकीय अधिकार नसले तरी त्यांचे स्थान सर्वोच्च मानले जाते. अकिहितो हे जपानच्या इतिहासात २०० वर्षांनंतर निवृत्ती घेणारे दुसरे सम्राट ठरले आहेत. यापूर्वी १८१७ साली कोकाकू या जपानी सम्राटाने राजनिवृत्ती पत्करली होती. विशेष बाब म्हणजे, जपानचे सम्राट स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना जपानी संसदेची परवानगी आवश्यक असते. म्हणून खासकरून अकिहितो यांच्या स्वास्थ्याचा आणि वयाचा विचार करता, त्यांच्या निवृत्तीच्या मागणीनुसार, जपानी संसदेत तसा विशेष कायदा पारित करण्यात आला आणि त्यानंतरच अकिहितो यांचा निवृत्तीचा मार्ग मोकळा झाला.

अकिहितो यांनी जपानच्या राजेशाहीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. सर्वसामान्य घराण्यातील मिचिको यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्यांनी राजघराण्यात एक नवा पायंडाच रचला. सामान्य जनतेशी काहीसे दुरावलेले राजघराणे अकिहितोंच्या आपुलकीपूर्वक धोरणांमुळे, लोकप्रेमामुळे राजेशाहीला आपलंसं समजू लागले. भूकंप, त्सुनामी, पूरपरिस्थिती किंवा देशावरील कुठल्याही संकटसमयी जपानी सम्राटांनी सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला. कुष्ठरोगग्रस्तांची भेट घेऊन तेही जपानचाच एक भाग आहेत, याची मानवतापूर्वक जाणीव त्यांनी करून दिली. एकूणच, अकिहितो हे केवळ राजमहालापुरते नाही, तर जपानी लोकांचे ‘हृदयसम्राट’ ठरले. त्यांच्याविषयी नितांत आदर, अतीव प्रेम असलेल्या जपानी जनतेलाही अकिहितोंच्या निवृत्तीने गहिवरून आलेच. पण, आता नव्या सम्राटांचे ‘रेवा पर्व’ अर्थात ‘ऐक्याचे पर्व’ जपानमध्ये सुरू झाले आहे.

 

सम्राट अकिहितो यापुढे टोकियोच्या राजमहालात दिसणार नाहीत. परदेशी पाहुण्यांचे हसतमुख स्वागत करायलाही ते नसतील. त्यांच्या सही, शिक्क्यांचीसरकारी दस्तावेजांना आता गरज लागणार नाही. अकिहितो आणि त्यांच्या पत्नी आता नवीन महालात आपले निवृत्तीचे जीवन सुरू करतील. अकिहितोंना वाचनाची, संशोधनाची आवड आहे. अकिहितोंचे आगामी आयुष्यही सुख, समाधान आणि स्वास्थ्याच्या सूर्यकिरणांनी प्रकाशमान होवो, ही इच्छा. जपानच्या नवीन सम्राटांकडून जनतेच्या अजूनही फार अपेक्षा आहेत. जपानला एक कॉस्मोपॉलिटन देश म्हणून घडविण्यासाठी ते पुढाकार घेतील, असे जपानी नागरिकांना वाटते. ते खरेही ठरेल, कारण नूतन सम्राट नारुहितो हे संगीतकार आहेत. शिवाय त्यांना ट्रेकिंगचीही प्रचंड आवड. इतकेच नाही तर ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी ‘१८व्या शतकातील थेम्स नदीतील वाहतूक व्यवस्था’ या विषयावरही प्रबंधलेखन केले आहे. त्यामुळे अशा या जिज्ञासू, अभ्यासू नव्या जपानी सम्राटाचे हे नवे पर्वही सुख, शांती, भरभराटीचे जावो, ही सदिच्छा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@