‘नासा’चा कांगावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2019
Total Views |


 


‘मिशन शक्ती’बाबत अमेरिकेची अंतराळ संस्था असलेल्या ‘नासा’चे प्रमुख काय म्हणतात यापेक्षा ते असे का म्हणतात, हे समजून घ्यायला हवे.


हा महिना गाजला तो भारताच्यामिशन शक्ती’ मुळे. भारतात त्याचे दोन परिणाम जाणवले. एक होता या देशाच्या उज्ज्वल वाटचालीचे सहप्रवासी म्हणून आनंद व्यक्त करणाऱ्या नागरिकांचा, तर दुसरा होता डोळ्यासमोर लगेचची निवडणूक प्रतिक्रिया देणाऱ्यांचा. देशाच्या पंतप्रधानांनी ‘मिशन शक्ती’ चा परिचय संपूर्ण देशाला करून दिला आणि देशभरात आनंदाची एक लहर अनुभवायला मिळाली. राहुल गांधींसारख्या नकारघंटावाल्यांनी डीआरडीओचे अभिनंदन करून ‘मिशन शक्ती’चे राजकीय श्रेय पंतप्रधानांना न देण्याचा मनाचा कोतेपणा दाखविला. मात्र, देशभरात जो काही संदेश जायचा होता तो गेलाच. पण, आता मुद्दा आला आहे, तो निराळाच...

 

अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’चे प्रशासक जिम ब्रायडेनस्टाइन यांनी आता अंतराळातील कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. हा प्रश्न त्यांनी कुठल्याही अधिकृत व्यासपीठावरून उपस्थित केलेला नाही. आपल्याच कर्मचाऱ्यांसमोर बोलताना त्यांनी ही चिंता व्यक्त केली आणि ‘नासा’सारख्या ख्यातनाम संस्थेतून ती बाहेर आली आणि जगभर पसरली. ‘नासा’च्या प्रशासक पदावर काम करणारी व्यक्ती आपल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधते आणि त्याचा बोभाटा जगभर होतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. ‘अंतराळातला कचरा’ ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नक्कीच नाही. मात्र, त्यापेक्षा गंभीर पाश्चिमात्त्य राष्ट्रांच्या आश्रयाखाली चालणाऱ्या ‘नासा’सारख्या संस्थांमधल्या डोक्यातल्या कचऱ्याचा आहे. हा मुद्दा वंशवादाचा आहेच, पण सत्तेच्या वर्चस्ववादाचासुद्धा आहे. “भारताने केलेले ‘मिशन शक्ती’ हा भयानक प्रकार असून या चाचणीमुळे ४०० तुकडे अंतराळात तरंगत असून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आदळण्याची शक्यता ४४ टक्के इतकी आहे,” असा दावा हे जिम महाशय करतात. जिम ब्रायडेनस्टाईन की प्रख्यात विनोदी अभिनेता जिम कॅरी असा प्रश्न पडावा, अशी ही विधाने आहेत. उपग्रहनाशक क्षेपणास्त्र प्रणाली असणारा भारत हा एकमेव देश नाही. अमेरिका, चीन आणि रशिया यांनी असे प्रयोग करूनच आपले तिथले अस्तित्व सिद्ध केले आहे. ब्रायडेनस्टाईन यांना नेमके आजच हे बोलावेसे का वाटले, हा मोठाच प्रश्न आहे. भारताने ब्रायडेनस्टाईन यांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भारताने जो तर्क मांडला आहे, तो वास्तवाला धरून आहे. अंतराळात अशा प्रकारचा कचरा यापूर्वीच भरपूर प्रमाणात आहे. प्रत्येक उपग्रह सोडताना अशा प्रकारे कचरा निर्माण होतच असतो. अशा प्रकारचा कचरा कमीत कमी व्हावा म्हणून विचार करता येऊ शकतो, तसेच त्यासाठी प्रयत्नसुद्धा करता येऊ शकतात. मात्र, आपल्याकडे पायाभूत सुविधांना विरोध करणाऱ्या अतिरेकी पर्यावरणवाद्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातलाच हा प्रकार आहे. यात दोन मुद्दे आहेत.

 

एक म्हणजे अमेरिका, चीन आणि रशिया यासारख्या बड्या राष्ट्रांनी जेव्हा अशा चाचण्या केल्या तेव्हा ही मंडळी काय करीत होती? त्याचा कचरा कोणाच्याही का लक्षात आला नाही? आज भारताने अशा प्रकारच्या चाचण्या केल्यानंतरच ‘नासा’मधील मंडळींना जाग का आली आहे? या प्रश्नांची उत्तरे ‘नासा’ किंवा ‘नासा’ची मालकी स्वत:जवळ ठेवणारी अमेरिका कधीच देणार नाही. आसनहोवर राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सुरू झालेल्या ‘नासा’वर अनेक आरोप आहेतच. इंटरनेटवर त्यातील पानेच्या पाने आपल्याला वाचायला मिळू शकतात. चिनी वैज्ञानिकांनीही ‘नासा’वर हेरगिरीचा आरोप केला होता. प्रगत उपग्रहप्रणाली, त्यांचा विकास, त्यासाठी चालणारे प्रयोग हे मानवजातीच्या हितासाठी आहेत, असा समज जगभर असला तरी अमेरिकेसारख्या देशांनी आपल्या उपग्रहांचा वापर हेरगिरीसाठी केल्याची उदाहरणे आहेत. राहुल गांधी व त्यांच्यावर आस लावून बसलेल्या मंडळींच्या डोक्यात प्रकाश पडो अथवा न पडो पण ‘मिशन शक्ती’ ने जगभरातील शक्तींना भारताकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला कसे बाध्य केले आहे, त्याचेच प्रतीक म्हणून ‘नासा’च्या या प्रतिक्रियेकडे पाहावे लागेल. एखाद्या विषयाच्याविरोधात रान उठविण्याची म्हणून एक अमेरिकन खास पद्धत आहे. मानवता, जागतिक शांतता, पर्यावरणाची चिंता यासारख्या जागतिक मूल्यांची पोपटपंची करून समोरच्या देेशाला निरनिराळ्या पेचात कसे अडकवायचे, हे अमेरिकेकडूनच शिकण्यासारखे आहे. ‘नासा’ जो खेळ आज खेळत आहे, तो अशाच डावपेचांचा भाग आहे. या सगळ्याला वर्चस्ववादाचा वासही आहे. जग ज्या क्षेत्रात आमची मक्तेदारी मानते, त्यात तुम्ही कसे शिरलात, असा एक उद्दाम भावही यामागे दडलेला आहे.

 

‘नासा’ व यासारख्या संस्था, त्यामध्ये चालणारे संशोधन ही विकसित देशाची देण आहे. त्याचा जगाला उपयोग झाला नाही, असे मुळीच नाही. कृषी, हवामानातील बदल या सगळ्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे. विकसित राष्ट्रांनी या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर लष्करी कारणांसाठीदेखील करून घेतला व त्यात स्वत:ची मक्तेदारीदेखील निर्माण केली. ‘नासा’सारख्या बलाढ्य संस्थेला बाजूला ठेऊन डीआरडीओने या मंडळींच्या नकळत पाडलेला उपग्रह हे या मंडळींचे खरे दुखणे आहे. अशी दीर्घ पल्ला गाठणारी क्षेपणास्त्रे ही केवळ उपग्रह पाडण्यासाठीच वापरली जातात, असे नाही. भारताने उपग्रह तंत्रज्ञानाच्या बाबतीतले स्वत:चे स्थान तर पक्के केलेच, पण त्याचबरोबर भारताची प्रगती ज्यांच्या डोळ्यात खुपते त्यांनाही एक रोखठोक संदेश दिला. महासत्ता आणि त्याची अरेरावी माजविणाऱ्यांसमोर एक एक करून असे पेच निर्माण होत आहेत. बदलत्या जागतिक व आर्थिक परिस्थितीनुसार अधिक लोकसंख्या असलेली राष्ट्रे बाजारपेठा म्हणून विकसित होत आहेत. त्यांची क्रयशक्ती या तथाकथित महासत्तांमधील लोकसंख्येच्या तुलनेत वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. ब्रिटनसमोर ब्रेग्झिटसारख्या तर अमेरिकेसमोर स्वत:च्या अमेरिकन नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे प्रश्न आहेत. ज्या अन्य आशियायी राष्ट्रांकडे यापूर्वी युरोपीयन राष्ट्रे सहानुभूतीने पाहायची, ती राष्ट्रे आता स्वत:च्या हिकमतीने पुढे सरकत आहेत. भारतासारखी राष्ट्रे त्यांना यात आपल्या प्रवासातले सहप्रवासी वाटतात. अमेरिकेसारख्या राष्ट्रांची अंतस्थ हेतू बाळगण्याची वृत्ती किंवा चीनचा विस्तारवाद यापेक्षा भारत या अशियायी राष्ट्रांना अधिक मैत्रीपूर्ण वाटतो. सहजपणे न दिसणाऱ्या अनेक गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणात घडत असतात. ‘नासा’च्या प्रमुखाच्या विधानांमागे दडलेले राजकारण हे एवढे मोठे आणि गुंतागुतीचे आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@