पाखरं ठेवत नाहीत आपल्या मरणाचे पुरावे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2019
Total Views |

व्हॉटस् अॅप हे आता धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, असं झालेलं आहे. त्यावर खूप चर्चा करण्यात काही अर्थ नाही, पण काही पोस्टस् खूप चांगल्या असतात. त्यावर चर्चा करावी आणि गांभीर्याने विचार करावा, असेच काहीसे असते. मागच्या आठवड्यात अशीच एक पोस्ट आली. नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद कुणीसा मला पाठवला. अलीकडे पांढरपेशांच्या संवेदनांमध्ये निसर्ग आणि पर्यावरण हमखास दाखल झालेले हळवे विषय आहेत. आम्ही याबाबत कसे जागरूक आहोत, माहीतगार आहोत, हे दाखविण्याचीही अहमहमिका असते. मात्र, माणसाच्या डोक्यातले पर्यावरण हे त्याच्या परिवेशातले आहे. त्याच्या गरजांच्या पातळ्यांवरच फिरणारे आहे. पाखरांच्या जगण्याचा अन् मरणाचा विचार करण्याइतके हळवेपण आमच्या पर्यावरणीय जाणिवांत नाही.
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती... हे गाणे अनेकदा ऐकलेले आहे. पाखरांच्या केवळ स्मृतीच असतात. त्यांचे अवशेष काही नसतात. त्यांची घरटीही त्या त्या वेळची गरज म्हणून असतात. आपले असे काही ते ठेवून जात नाहीत. ठेवूनच जात असतील, तर आपल्या प्रजातीची पुढची पिढी निसर्गाला देऊनच ते जात असतात. केतन िंपपळापुरे हा कधीचा माझा सहकारी. तसा हळवा कवी. आंबेडकरी कार्यकर्ता. अगदी निष्ठावंत असा कार्यकर्ता. त्याच्या संघटनेसाठी काया झिजविलीच त्याने. त्याच्या काही कविता खूप खोलवरच्या आहेत. ‘पाखरं ठेवून जात नाहीत त्यांच्या मरणाच्या वार्ता...’ अशी काहीशी ओळ त्याच्या कवितेत वाचलेली. पाखरांच्या मरणाचा विचार केतननं केलेला होता. त्या वेळी ती ओळ वाचल्यानंतरची संध्याकाळ फार कातर करून गेली होती. एकट्यातच खूप विचार करत राहिलो होतो. पाखरांच्या मरणाच्या वार्ता कधीच कुणाला कळत नाहीत. त्यांच्या मरणाचे सोहळेही नसतात. तसे मरणाचे अन् जगण्याचेही सोहळे केवळ माणसंच करतात. त्याचं भांडवलंही करतात. प्राणी जितके सहज जन्माला येतात तितकेच सहज मरूनही जातात. मरणाच्या सहाच तासांत कुठल्याशा माश्या येतात आणि त्या अंडी घालतात. त्याच्या अळ्या होतात आणि मृत प्राण्याच्या शरीराचे विघटन होत सारीचं तत्त्व मातीत मिसळतात... पाखरांचे असे झालेले कधी पाहिलेले नाही. या पोस्टमध्ये तेच आहे. नैसर्गिक मरण आलेल्या पक्ष्याचे कलेवर पाहिले आहे का कधी तुम्ही, असा थेट सवालच विचारण्यात आला आहे. भांडताना, मारामार्या करताना बघितलंय; पण आजपर्यंत कधी एका पक्ष्यालाही झाडाखाली मरून पडलाय किंवा अजून कुठे आमच्या कॉलनीच्या परिसरात मृतावस्थेत पडलाय, असे बघितले नाही. अपघाताने, शिकार केल्याने मेलेली पाखरं किंवा त्यांचे अवशेष दिसले आहेत, मात्र नैसर्गिक मृत्यू आल्याने झाडाखाली पडलेले पक्ष्याचे कलेवर कुणी बघितल्याचे सांगणारा कुणी नाही. भूत आहे, असे अनेक जण मानतात, मात्र भूत पाहिल्याचे सांगणारा कुणी नाही. तसेच हेही.
मग पक्षी काय अमर असतात का? की त्यांना नैसर्गिक मरण येतच नाही? साधवानीच्या या लेखात त्यांनी मग पाखरांच्या मरणाचा घेतेलेला शोध मांडला आहे. कधीकाळी केतन पिंपळापुरेच्या कवितेने पडलेला प्रश्न पुन्हा माझ्या समोर येऊन उभा झाला. साधवानीने तेच केले. त्याने गुगलवर शोधले या प्रश्नाचे उत्तर. काही पुस्तकेही वाचली. तर्कशुद्ध आणि बुद्धीला पटेल असे उत्तर मात्र सापडले नाही. या प्रवासात मग अनेकांच्या हाती जे लागते तेच साधवानीच्या हातीही लागले. ‘डाइंग पॅटर्न ऑफ बर्डस्,’ हा लेख त्यांच्याही हाती सापडला. हा कॉर्क बिशप ल्युसी यांचा लेख आहे. त्या लेखात कॉर्क यांनी मांडलेल्या थीअरीवर नेहमीच वादळी चर्चा होते. बिशप ल्युसीने मात्र सर्वांनाच असे आव्हान दिलंय की, कुणीही जगात नैसर्गिक मृत झालेला पक्षी पुरावा म्हणून दाखवावा. आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीही स्वीकारलेले नाही, हेही तितकेच खरे आहे. लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दिलीय, एकीकडे नैसर्गिक कारण, दुसरीकडे शिकार, अपघात, मुद्दाम पक्षिहत्या अशी वेगळी कारणे. परंतु, मजेची गोष्ट अशी की आजपर्यंत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करू शकले नाहीय.
ही पोस्ट आल्यावर या विषयाशी संबंधित माझ्या अनेक मित्रांशी मी चर्चा केली. पक्षिशास्त्रज्ञसुद्धा याबाबतीत ठोस सांगू शकत नाहीत. दरवर्षी पक्ष्यांची गणना केली जाते. त्यावरून हे पक्षी कमी झाले िंकवा आतातर कावळे-चिमण्या राहिल्याच नाहीत, असे सामान्य माणसेही म्हणतात. त्यात दमही असतो. आता कावळे िंकवा चिमण्या म्हणजे काही माणसांचे खाद्य नाही. मध्यप्रदेश, छत्तीसगढच्या दुर्गम भागात आदिवासी कावळेही मारून खातात, असा एक संदर्भ एका मित्राशी चर्चा करताना सापडला; पण त्यावरून कावळे संपलेत जगातले, असे होत नाही. पाखरांची संख्या कमी होते याचा अर्थ ते मरतात, त्यांनाही नैसर्गिक मरण आहे, हे सिद्ध होतेच. मग त्याचे शव का दिसत नाही?
 
 
 
या बिशप ल्युसींचे मधमाश्यांच्या जीवनक्रमावरचे संशोधन जगन्मान्य आहे. ते सांगतात, मधमाश्या मृत्यू समीप आला की खूप उंचावरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेऊन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरश: नैसर्गिक विघटन होते आणि त्या नष्ट होऊन जातात. यावरून बिशप म्हणतात की, पक्ष्यांनासुद्धा मधमाश्यांप्रमाणे अंतःप्रेरणेचे एक इंद्रिय असावे जे त्यांना जाणीव करून देते की, आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जीवनकाल संपत आलाय. ही जाणीव होताच पक्षी आकाशात स्वत:ला उंच उंच घेऊन जातात आणि जोपर्यंत त्यांचे विघटन होत नाही तोपर्यंत ते वरती वरतीच चढत जातात... बिशपच्या या थीअरीवर वादळी चर्चा होत राहिली आहे. आताच्या या पोस्टनंतरही ती झाली. मात्र, ही थीअरी अमान्य करण्याचे शास्त्रशुद्ध असे कारण अद्यापतरी कुणाकडे नाही.
 
 
 
आता अनेकांशी चर्चेत केवळ तर्कच मांडण्यात आले. पक्ष्यांची हाडे पोकळ असतात. वजनाला ते हलके असतात. त्यामुळे ते मेले की इतर सजीवांच्या तुलनेत त्यांचे विटघन व्हायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे नैसर्गिक मरण आलेल्या पक्ष्यांची कलेवरे दिसत नाहीत... आता हे कारण तर्काच्या आधारावर तसे पुष्ट वाटते, मात्र मग बुद्धीला प्रश्न पडतात आणि मग या तर्कात वाटला तितका दम नाही, हे लक्षात येते.
मग विचार आणखी पुढे धावायला लागतात. झाडांनाही संवेदना असतात, झाडांमध्ये संवाद असतात, हे सिद्ध झाले आहे. एका ठरावीक अंतरातील झाडांमध्ये संवाद होत असतो, त्यांच्या मुळांवरील फंगसच्या माध्यमातून हा संवाद होतो, असे सिद्ध झाले आहे. झाडांच्या संवेदनांच्या बाबत तर खूपकाही प्रयोगही करून झाले आहेत. पक्ष्यांच्या बाबतही तसे आहे. त्यांचे आणि निसर्गातील इतर सजीवांचे एकत्व आहे. रावण सीतेचे हरण करत असताना तिला वाचवायला आलेला जटायू नावाचा पक्षी ही केवळ कविकल्पना आहे का? वनवासी मानवांचे अन् पाखरांचे एकत्व असते. शोकविव्हळ प्रभू रामचंद्राने वृक्षांना मिठ्या मारल्याचे वर्णन आहे. माझा एक मित्र आहे यादव तरटे. वन आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातला कार्यकर्ता आहे. तो म्हणाला की, अनेकदा मी जंगलात गेलो की, झाडांना कवटाळतो आणि ऊर्जा मागतो आणि मला ती मिळाल्याचे, थकवा गेल्याची अनुभूती येते... प्रभू रामचंद्रांनी अशीच ऊर्जा, सांत्वना वृक्षांकडून मिळविली असेल का? वनवास ही शिक्षा होती की त्यांनी तज्ज्ञ जाणतेपणाने स्वीकारलेली ती अवस्था होती? हल्लीचे युग संवादाचे आहे. त्यात मानवाने प्रचंड प्रगती केली आहे. मात्र, निसर्गाशी संवाद साधण्याचे कौशल्य मात्र आम्ही गमावून बसलो आहोत का? मोक्षाची कल्पना मानवी आहे, असे वाटत होते आजवर. पाखरांच्या या मरणाच्या थीअरीने त्यांच्या आयुष्याच्या संकल्पना मानवापेक्षाही दिगंत अशाच आहेत, असे वाटत राहिले. माणसाला अद्याप जीवनही नीट कळलेले नाही, पाखरं मात्र मरणही आकळून पलीकडे गेली आहेत. देह नश्वर आहे, हे केवळ आम्ही म्हणतो. मरण म्हणजे केवळ देह नष्ट होतो, अशीही पोपटपंची आम्ही करतो. पाखरं मात्र वातावरणाच्या उच्च दाबाच्या पातळीवर जाऊन मुक्त होतात. त्यांच्या पार्थिवाचे विघटन करून टाकतात अन् अनंतात विलीन होतात. मोक्ष आणखी दुसरा काय असतो?
 
 
 
 
स्क्रोल केले आणि मग रणबीर कपूर या अभिनेत्याची चलचित्रफीत दिसली. त्याचे वडील, प्रख्यात अभिनेते ऋषी कपूर हे सध्या न्यू यार्कला उपचार घेत आहेत. भ्रम आणि भासाच्या अवस्थेत ते वावरत असावेत. ते विचारतात, ‘‘मुझे कोई काम देगा क्या? बहोत अच्छा रोल करना है मुझे...’’ पाखरांच्या मुक्तीवरून कलावंतांच्या मोक्षापर्यंत क्षणात पोहोचलो... एक नवे चिंतन सुरू झाले. कदाचित पुढच्या भागात बोलू त्यावर!
@@AUTHORINFO_V1@@