मुंबई : मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची कहाणी सांगणारे ‘दहा बाय दहा’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलाकार या नाटकात दिसणार आहेत. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला प्रयोग शनिवारी, ६ एप्रिल ला पार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे प्रयोग होणार आहेत. हे नाटक अष्टविनायक प्रकाशित असून निर्मिती स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि.ने केली आहे.
‘दहा बाय दहा’ च्या घरात हसत खेळत जगणाऱ्या या कुटुंबाला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावे लागते, त्यानंतर काय होते? यावर आधारित हे नाटक आहे. यात अभिनेते विजय पाटकर, प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे व विदिशा म्हसकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अनिकेत पाटील यांनी केले आहे, तर नाटकाचे लेखन संजय जमखंडी आणि वैभव सानप यांनी केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat