गँगस्टर ते प्रसिद्ध धावपटू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2019   
Total Views |

,

 


कधीकाळी तो मुंबईतील अंडरवर्ल्डचा गँगस्टर होता. आज तो प्रसिद्ध धावपटू आहे. त्याचा हा त्याचा थक्क करणारा प्रवास आजच्या आपल्या ‘माणसं’ या सदरात उलगडणार आहोत.


पुराणात ‘वाल्याचा वाल्मिकी’ झाला, ही कथा आपण अनेकदा ऐकली असेलच किंवा अनेक चित्रपटात वाईट मार्गावर असताना पुन्हा एकदा चांगला मार्ग स्वीकारला, हे पाहिलेही असेल. पण, प्रत्यक्षात मात्र अशा घटना फार कमी पाहायला, ऐकायला मिळतात. राहुल जाधव याची अशीच एक कहाणी. कधीकाळी तो मुंबईतील अंडरवर्ल्डचा गँगस्टर होता. आज तो प्रसिद्ध धावपटू आहे. त्याचा हा त्याचा थक्क करणारा प्रवास आजच्या आपल्या ‘माणसं’ या सदरात उलगडणार आहोत. राहुल जाधव हा डोंबिवलीमधील एका सर्वसामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झाला. शाळेतही तो सर्वसामान्यच होता. राहुलची दहावी झाल्यानंतर त्याला आपण लवकरात लवकर श्रीमंत झालं पाहिजे, असं वाटू लागलं. त्या काळात मुंबईतील मध्यमवर्गातील मुलांची जवळपास हीच मानसिकता होती. कारण, ‘अंडरवर्ल्ड’ नावाचं वादळ मुंबईवर घोंगावत होतं. शिक्षण करत बसलो, तर आपण श्रीमंत होऊ शकत नाही. आपली स्वप्न आपल्याला पूर्ण करता येणार नाहीत. यामुळे त्याने दहावीनंतर शिक्षण सोडून दिले आणि पैसे कमावण्याच्या मार्गांचा शोध सुरू केला. यातच त्याची ओळख गुन्हेगारी विश्वाशी झाली. मोठमोठ्या गुन्हेगारांसाठी तो शुटर म्हणून काम करू लागला, शुटर सोबतच तो खंडणी वसूल करण्यासारखे गुन्हे करू लागला. आपण खूप पैसे कमवून श्रीमंत व्हायचं आहे, हेच त्याच्या डोक्यात होतं. त्याने ‘सत्या’ चित्रपटातील मनोज वाजपेयीची ‘भिकू’ ही व्यक्तिरेखा आदर्श मानली. ’सत्या’तील ‘भिकू’प्रमाणे तो वागू लागला. परिसरातही त्याची ओळख ‘भिकू’ म्हणूनच होऊ लागली. पोलिसांच्या नजरेत आणि गुन्हेगारांच्या यादीत त्याचे नाव झळकू लागले.

 

२००७ साली अखेर त्याला विजय साळगावकरांनी अटक केली. अटक झाली तेव्हा त्याच्यावर ११ विविध गुन्हे दाखल झालेले होते. यात चार गुन्हे हे खून करण्याचा प्रयत्न केल्याचे होते, तर इतर गुन्हे हे खंडणी, गोळीबार केल्याचे होते. यासाठी त्याला चार वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आर्थर रोड तुरुंगात त्याने ही शिक्षा भोगली आणि २०१० मध्ये त्याला जामीन मिळाला. २०१३ साली त्याला सर्व गुन्ह्यांतून मुक्त करण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा नव्याने सर्वसामान्य जीवन जगायचे ठरवले. तो नोकरी शोधू लागला आणि काही दिवसात त्याला एका कंपनीत गुणवत्ता निरीक्षक म्हणून काम मिळाले. सर्व व्यवस्थित चालू असताना २०११ साली एका पत्रकाराची हत्या आणि सिनेअभिनेत्याला धमकीचा फोन आल्यामुळे पोलिसांच्या संशयित नजरा त्याच्यावर पडल्या. यामुळे त्याची नोकरी सुटली आणि तो बेरोजगार झाला. यातून त्याला नैराश्य आले आणि पुन्हा तो व्यसनांच्या आहारी गेला. यातून त्याने बाहेर पडावे, या उद्देशाने कुटुंबीयांनी त्याला पुण्यातील ‘मुक्तांगण पुनर्वसन केंद्रा’त दाखल केले. ‘मुक्तांगण’मध्ये दाखल झाल्यानंतर व्यसनांवर व नैराश्यावर मात करण्यासाठी तो संघर्ष करू लागला. समाजाने आपल्याला नाकारल्याचा राग होताच पण, समाजाने आपल्याला स्वीकारावं यासाठी तो पुन्हा झगडू लागला.

 

‘मुक्तांगण’मध्ये हळूहळू दिवस निघून गेले, यात तो स्वावलंबी झाला. अनेक कामे करू लागल्याने त्याच्यातील अहंकार दूर झाला. या ठिकाणी त्याला हबीबा जेठा मार्गदर्शन करू लागले. रागावर नियंत्रण मिळवण्यास आणि रागाला चांगल्या कामात वळवण्यास त्यांनी त्याला सांगितले. “आयुष्यात एखादे ध्येय ठरवल्याशिवाय वाईट विचारांतून तुला बाहेर पडता येणार नाही,” असा सल्ला त्यांनी त्याला दिला. “मी नोकरी शोधू शकत नाही. शोधली तरी मला कोणी नोकरीवर ठेवणार नाही. दुसरे कोणते ध्येय मी ठेऊ शकतो,” असा प्रश्न राहुलने जेठा यांना विचारला. त्यावर त्यांनी त्याला सांगितले, “तुला काय चांगले जमते?” राहुल काही वेळ शांत राहिला आणि मला धावायचं माहिती आहे, मी धावू शकतो. मी पोलिसांपासून पळालोय, मी लोकांना गोळ्या घातल्यानंतर पळालोय आणि जर तुम्ही मला या केंद्रातून सोडले नाही, तर मी मुंबईला पळून जाईन. यानंतर जेठा यांनी क्षणाचा विलंब न लावता त्याला धावायला सांगितले. हेच तुझ्या आयुष्यातील ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आणि हाच क्षण राहुलच्या आयुष्यात नवा बदल घेऊन आला. यानंतर तो १० किमी पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला आणि ही स्पर्धा ५५ मिनिटांत पार केली आणि आयुष्यात पहिल्यांदाच आपण काहीतरी मिळवलं, याची त्याला जाणीव झाली. आजपर्यंत त्याने अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि अनेक बक्षिसे मिळवली आहेत. मुंबई-दिल्ली, मुंबई-रत्नागिरी, मुंबई-पुणे अशी अनेक लांब पल्ले त्याने आजपर्यंत धावून पार केले, तर महिन्यातून एकदा तो मुंबई-पुणे हे अंतर पार करतो. धावणे ही त्याची ‘पॅशन’ बनली आहे. नवीन ओळख तयार करून आकाशाला गवसणी घालण्यासाठी आणि कधीच न थांबण्यासाठी आज तो धावत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@