ताश्कंद फाईल्स’ आणि राजकीय डावपेच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




आधुनिक भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेवर आधारित चित्रपट आहे. या महत्त्वपूर्ण घटनेला तेव्हा व आज देण्यात येत असलेले राजकीय रंग बघता हा चित्रपट केवळ एक ‘कलाकृती’ नसून, यामागे वेगळ्या प्रकारचे ‘राजकारण’ आहे आणि त्याची चर्चा करणे गरजेचे आहे.

 

आजकाल बायोपिकचा जमाना आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक मोठमोठ्या नेत्यांवर, खेळाडूंवर चित्रपट बनत आहेत. क्रिकेटपटू धोनी, अ‍ॅथलेट मिल्खासिंग वगैरे चटकन आठवणारी नावं. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस वगैरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट येऊन गेले. मागच्या वर्षी मराठीत ’...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर,’ ’बालगंधर्व’ वगैरे चिटपट झळकले. याची सुरुवात कदाचित महात्मा गांधींच्या जीवनावर अ‍ॅटनबरा यांनी केलेल्या ’गांधी’ चित्रपटापासून झाली असावी. अर्थात, ’गांधी’च्या आधीसुद्धा व्ही. शांताराम यांनी बनवलेला ’डॉ. कोटणीस की अमर कहानी’ वगैरे चित्रपट येऊन गेले आहेतच.

 

आज हा इतिहास आठवण्याचे कारण म्हणजे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री (१९०४ ते १९६६) यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांवर आधारित चित्रपट ’ताश्कंद फाईल्स’ आणि त्यामागचे राजकारण. सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर अचानक हल्ला केला. जम्मू-काश्मीर भारतापासून जिंकून घेणे हा या हल्ल्याचा हेतू होता. भारताने या हल्ल्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. एवढेच नव्हे, तर लाहोर भागात भारतीय सैन्याने प्रतिहल्ला केला व पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलण्यास सुरुवात केली. यामुळे दक्षिण आशियाच्या राजकारणातील सत्तासमतोल ढळेल, याचा अंदाज आल्यामुळे तेव्हाच्या महासत्ता अमेरिका व सोव्हिएत युनियन यांची धावाधाव सुरू झाली. सोव्हिएत युनियनने पुढाकार घेऊन तेव्हाच्या रशियात (आताचा उझबेकिस्तान) असलेल्या ताश्कंद शहरात भारत व पाकिस्तान यांच्यात तह घडवून आणला. तो दिवस होता १० जानेवारी, १९६६. त्याच रात्री शास्त्रीजींचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

 

आजप्रमाणेच तेव्हासुद्धा शास्त्रीजींचा मृत्यू नैसर्गिक नाही, अशी सार्वत्रिक भावना होती. याबद्दल निरनिराळे प्रवाद अधूनमधून चर्चेत येत होते. आता चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी याबद्दल ‘भरपूर’ संशोधन करून ’ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट म्हणजे शास्त्रीजींच्या जीवनावरचा बायोपिक नव्हे, तर आधुनिक भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेवर आधारित चित्रपट आहे. या महत्त्वपूर्ण घटनेला तेव्हा व आज देण्यात येत असलेले राजकीय रंग बघता हा चित्रपट केवळ एक ‘कलाकृती’ नसून, यामागे वेगळ्या प्रकारचे ‘राजकारण’ आहे आणि त्याची चर्चा करणे गरजेचे आहे.

 

स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले व तब्बल १७ वर्षे पंतप्रधानपदी राहिले. २७ मे, १९६४ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या हयातीतच ’नेहरू नंतर कोण?’ अशी चर्चा सुरू झाली होती. त्या संभाव्य व्यक्तींच्या यादीत शास्त्रीजींचे नावसुद्धा नव्हते. अचानक त्यांना संधी मिळाली व ते ९ जून, १९६४ रोजी पंतप्रधानपदी विराजमान झाले. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केल्यास त्याकाळी शीतयुद्ध जोरात होते. एका बाजूला भांडवलदार देशांचा नेता अमेरिका, तर दुसरीकडे साम्यवादी सोव्हिएत युनियन यांच्यात तीव्र सत्तास्पर्धा होती. अमेरिकेची गुप्तहेर संघटना ‘सीआयए’ व रशियाची गुप्तहेर संघटना ‘केजीबी’ आशिया आणि आफ्रिकेच्या देशांत धुमाकूळ घालत होते. तिसर्‍या जगातील या नवस्वतंत्र देशांना वेगवेगळ्या प्रकारे अंकित करून घेण्यासाठी या गुप्तहेर संघटना सर्व नैतिक-अनैतिक मार्गांचा वापर करत होत्या. आजही यात बदल झालेला नाही. या दोन्ही महासत्तांना भारताची गरज होती. १९४९ साली माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली. चीनसारखा आशियातील सर्वात मोठा देश साम्यवादी झाल्यामुळे भारताला आपल्या कळपात ओढण्यास अमेरिका उत्सुक होता. पण, नेहरूंचा भारत या कोणालाच दाद देत नव्हता.

 

पंडित नेहरूंनी इजिप्तचे कर्नल नासेर, युगोस्लाव्हियाचे मार्शल टिटो वगैरे नेत्यांच्या मदतीने १९६१ युगोस्लाव्हियाची राजधानी बेलग्रेड येथेअलिप्त राष्ट्र परिषद’ स्थापन केली होती. नेहरूंच्या अलिप्ततावादी धोरणामुळे कोणाचेच काही चालले नाही. शेवटी अमेरिकेने १९५५ साली पाकिस्तानला अमेरिकापुरस्कृत ’सेंटो’ करारात सहभागी करून घेतले. यामुळे दक्षिण आशियातील सत्ता समतोल राखण्यासाठी रशियाला व भारताला स्वत:च्या कळपात खेचणे गरजेचे होते. यात अडथळा होता तो लाल बहादुर शास्त्री नामक नेत्याचा. म्हणून ‘केजीबी’ने कटकारस्थाने करून शास्त्रीजींवर ११ जानेवारी, १९६६च्या रात्री विषप्रयोग केला, असा या चित्रपटाचा आरोप आहे.

 

हा चित्रपट हे सर्व तपशीलवार तर दाखवतोच, पण येथेच न थांबता काही गंभीर आरोपही करतो. यातील एक आरोप म्हणजे शास्त्रीजींच्या खुनाचा खरा फायदा त्यांच्या नंतर पंतप्रधानपदी बसलेल्या इंदिरा गांधींना. पुढे त्यांच्याच मदतीने ‘केजीबी’ने भारतात स्वतःचेबस्तान बसवले. एवढेच नव्हे, तर ‘केजीबी’च्या दडपणाखाली इंदिरा गांधींनी १९७६ साली ४२वी घटनादुरूस्ती करून राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत ’समाजवाद’ व ’निधर्मीवाद’ हे दोन शब्द घातले. या मांडणीच्या समर्थनार्थ दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी भरपूर संशोधन केले. मात्र, यासाठी अग्निहोत्रींनी ‘केजीबी’च्या एका निवृत्त अधिकार्‍याने लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेतला आहे. या पुस्तकात ’नंतर आम्ही (म्हणजे केजीबीने) इंदिरा गांधींना कसा भरपूर पैसा पुरवला’ वगैरे उल्लेख आहेत.

 

या संदर्भात तीन गोष्टी ठासून नमूद करणे गरजेचे आहे. एक म्हणजे शास्त्रीजींचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर तो खून होता. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. आता तो नेमका कोणी केला, याबद्दल आजही छातीठोकपणे सांगता येत नाही. मुळात भारत सरकारच्या कागदपत्रांत शास्त्रीजींचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असेच नमूद केलेले आहे. याचा अर्थ असा की, भारत सरकारसुद्धा हे आजही मान्य करायला तयार नाही की तो नैसर्गिक मृत्यू नव्हता. दुसरी बाब म्हणजे, या कटात इंदिरा गांधींचा हात होता, असे ध्वनीत करणे हे धादांत चूक आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर नवी व्यक्ती पंतप्रधानपदी येणे नैसर्गिक होते. तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होण्यास कमालीचे उत्सुक होते. पण, कामराज निजलिंगप्पा, स. का. पाटील वगैरे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मोरारजी देसाईंपेक्षा इंदिरा गांधी जास्त उपयुक्त वाटल्या. काँग्रेसंतर्गत झालेल्या सत्तास्पर्धेतया ज्येष्ठ नेत्यांच्या (यांनाच पुढे ‘सिंडीकेट’ म्हणत) पाठिंब्याच्या आधारावर मोरारजी देसाईंचा पराभव करून इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. याचा अर्थ असा की, शास्त्रीजींचा काटा ‘केजीबी’ने काढला हे मान्य केले तरी, त्यांच्यानंतर इंदिरा गांधींचीच निवड होईल याबद्दल ‘केजीबी’ला खात्री कशाच्या जोरावर वाटत होती? दिग्दर्शक अग्निहोत्री असे तर मानत नाही ना की, त्याकाळी इंदिरा गांधींना पंतप्रधानपदी निवडण्यात काँग्रेसच्या ज्या मूठभर ज्येष्ठ नेत्यांचा हात होता, तेसुद्धा ‘केजीबी’शी संधान साधून होते?

 

तिसरी गोष्ट म्हणजे, हा चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ. देशात १७व्या लोकसभेचे वातावरण आहे. देशद्रोही इंदिरा गांधींचा नातू राहुल गांधींवर कसा काय विश्वास ठेवाल? असा प्रश्न अप्रत्यक्षरीत्या हा चित्रपट विचारतो. म्हणूनच ’ताश्कंद फाईल्स’चा अभ्यास करून बनवला असला तरी, चित्रपटाच्या हेतूबद्दल मनात शंका उपस्थित होतात. परंतु, हे सर्व आक्षेप बाजूला ठेवत हा चित्रपट बघणे गरजेचे आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूबाबतच्या अनेक घटनांबद्दल अजूनही समाधानकारक स्पष्टीकरण मिळालेले नाही. उदाहरणार्थ, त्या दुर्दैवी रात्री त्यांचा स्वयंपाकी का बदलला? त्या रात्री त्यांना दूध कोणी दिले? त्यांचे प्रेत काळेनिळे का पडले होते? शास्त्रीजींचे शवविच्छेदन का केले नव्हते? त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर काही ज्येष्ठ रशियन डॉक्टर्सनी स्वाक्षर्‍या का केल्या नाहीत? वगैरे असंख्य प्रश्न आहेत. नेताजी बोस यांच्या मृत्यूबद्दलचे गूढ जसे आजपर्यंत उकलले नाही, तसेच शास्त्रीजींच्या मृत्यूबद्दलही गूढ आहे. काँग्रेस सरकारने याबाबत एवढी वर्षे मौन बाळगणे एक वेळ समजू शकते. पण, इतर सरकारांनी त्याची चौकशी करणे अपेक्षित होते किंवा ती आगामी काळात होऊन सत्य जनतेसमोर येईल, ही अपेक्षा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@