अनुपस्थित तरी उत्तीर्ण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019   
Total Views |


मुंबई विद्यापीठाचे गुण पडताळणीमध्ये होणारे गोंधळ, निकालात दिरंगाई असे विविध कारनामे समोर आले आहेत. आता त्यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे, परीक्षेला उपस्थित न राहताही उत्तीर्ण होण्याची. कल्याणमधील एका शिक्षणशास्त्र महाविद्यालयात परीक्षेला न बसताच एक विद्यार्थिनी परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. एका राजकीय नेत्याच्या सचिवाच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालातील घोळानंतर उघड झालेल्या या गैरप्रकारामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील सावळा गोंधळ समोर आला होता. आता कल्याण येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात परीक्षेला न बसताच विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याचे विद्यापीठ अधिसभा सदस्य मिलिंद साटम यांनी दाखवून दिले. एका शाळेतील शिक्षिका कल्याण येथील महाविद्यालयात बी.एड पदवीचे शिक्षण घेत होत्या. या विद्यार्थिनीने शिक्षणशास्त्र पदवीची परीक्षा दिली नव्हती. विद्यापीठाची शिक्षणशास्त्र पदवीची परीक्षा गेल्या वर्षी २३ ते २8 मे, २०१8 यादरम्यान होती. याच कालावधीत म्हणजे २१ ते २७ मे दरम्यान ही विद्यार्थिनी काश्मीर येथे सहलीला गेल्याचे उघड झाले. तरीही परीक्षेला मात्र या विद्यार्थिनीची हजेरीही लागली आणि ती ‘ब’ श्रेणीत उत्तीर्णही झाली. दुसरीकडे प्राध्यापक मूल्यांकनाच्या कामात चालढकल करत असल्याने विद्यापीठाचे निकाल रखडत आहेत. गेल्या वर्षी मार्च २०१8 मध्ये १२०० प्राध्यापकांनी १० किंवा त्यापेक्षाही कमी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन केले होते. दुसरीकडे आता एका प्राध्यापकांना पाच हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासण्याची वेळ येत आहे. एका राजकीय नेत्याच्या सचिवाचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल एका दिवसात जाहीर झाल्याचे समोर आले होते. याबाबत वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्याचप्रमाणे मूळ निकाल आणि पुनर्मूल्यांकनाचा निकाल यामध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक फरक पडला आहे. ‘नियमानुसार विद्यार्थ्यांचा निकाल वाढल्यानंतर त्याचे नियमकांकडून मूल्यांकन होणे गरजेचे होते. या प्रकाराची चौकशी करण्यात येईल,’ असे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठात एक ना एक कारनामे समोर येत असतात. त्याची चौकशी होईल अन् कारवाई करण्यात येईल, असे सांगितले जाते. पण काही घटना सोडल्या, तर कारवाई होताना दिसत नाही. आता तरी विद्यापीठाने याप्रकरणी ठोस कारवाई करावी. तसेच असे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या!’

 

तरीही पालिका धडा घेईना!

 

मुंबईत २9 ऑगस्ट, २०१७ रोजी झालेल्या अतिवृष्टीत रस्त्यावर पाणी साचल्यामुळे गाडीमधून उतरून चालत असताना मॅनहोलमध्ये पडून प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलुंड येथे मॅनहोलमध्ये पडून नीलिमा पुराणिक या गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटना घडल्यानंतरही पालिकेने काहीच धडा घेतल्याचे दिसत नाही. मुंबईत मॅनहोलमध्ये पडण्याचे प्रकार अद्याप सुरूच असून शुक्रवारी एका खासगी कंपनीत फंड मॅनेजर म्हणून काम करणारे समीर अरोरा हे लोअर परळ येथील फिनिक्स मॉल येथून चालत जात असताना मॅनहोलमध्ये पडले. अरोरा हे मॅनहोलमध्ये छातीपर्यंत बुडाले होते. मात्र, अथक प्रयत्न करून ते बाहेर पडले. या दुर्घटनेत अरोरा यांना शरीरावर काही ठिकाणी खरचटले असून त्यांनी प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणून इंजेक्शन घेतले आहे. त्यांच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरनी स्पष्ट केले. सन २०१७च्या पावसाळ्यात लोअर परळ येथील दीपक चित्रपटगृहाजवळच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून मुंबई रुग्णालयाचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने उघड्या मॅनहोलवर जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला. १ कोटी, २० लाख रुपये खर्चून आतापर्यंत तेराशेहून अधिक उघड्या मॅनहोलवर जाळ्या बसवल्या आहेत. असे असले तरीही आज मुंबईत कित्येक मॅनहोल्स उघडीच आहेत. बर्‍याचदा अशा दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन उपाययोजनांचा आव आणते. दुर्घटनेप्रकरणी एखाद्या अधिकार्‍यावर कारवाई केली जाते. तसेच उपाययोजनांची घोषणा केली जाते. पण, काही काळानंतर प्रशासनाला आपल्याच घोषणांचा विसर पडतो अन कामही मंदावते. एवढेच नव्हे, तर काही काळानंतर ते बंदच होते. पुन्हा एखादी दुर्घटना घडेपर्यंत तो विषय बासनात गुंडाळला जातो. सुदैवाने अरोरा यांचे प्राण वाचले. तसेच मॅनहोल आणि भूमिगत गटारांची स्वच्छता करण्यासाठी माणसांचा वापर करणे हे अमानवी असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे. तरीसुद्धा मुंबईत मॅनहोलमध्ये उतरून सफाई करताना सहा कामगारांचा आतील विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. अशा घटना पुन्हा घडूच नये किंवा अशी वेळच कोणावर येऊ नये म्हणून महापालिकेने उपाययोजना सुरू कराव्यात, अन्यथा उघड्यावरील मॅनहोलवर तातडीने झाकणे बसवावीत. नाहीतर अशा दुर्घटना घडतच राहतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@