तृणमूल कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीनंतरही पश्चिम बंगालमध्ये ७६ टक्के मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे रुपांतर रणक्षेत्रात झाल्याचे दिसते. इथे याआधी चार टप्प्यातील मतदान झाले असले तरी, असा एकही टप्पा नाही, ज्यात हिंसाचार झालेला नाही. सोमवारी चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या आठ जागांवर ७६.४७ टक्के मतदान झाले. बंगाली नागरिकांनी मोठ्या उत्साहात सर्वत्र मतदानासाठी हजेरी लावली. मात्र, तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी यावेळी पाहायला मिळाली.

 

आसनसोल आणि वीरभूम येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. पुढे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते इरेला पेटल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. परिणामी, इथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शांतीपूर येथील तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या घरातून देशी बॉम्ब हस्तगत करण्यात आले. दरम्यान, आसनसोलमधील कितीतरी मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षाबलेही तैनात नव्हती. इथे आधी सुरक्षाबलांना तैनात केले होते. परंतु, रविवारी रात्री त्यांना हटवून तिथे महिला पोलिसांची नियुक्ती केल्याचेही म्हटले जात आहे. दुसरीकडे वीरभूम जिल्ह्यात तर काही लोकांनी इव्हीएम केंद्रच पळवून नेले. तिथेही दोन्ही बाजूंमध्ये चांगलाच झगडा उडाला. भाजप कार्यकर्त्यांनी, केंद्रीय सुरक्षाबले तैनात केल्यानंतरही त्यांना का हटवले, असा प्रश्न करत सुरक्षाबलाना पुन्हा तैनात करण्याची मागणी केली. त्यामुळे तिथे मतदानही थांबवले गेले.

 

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीबाबत वीरभूममधील गावकर्‍यांनी सांगितले की, तृणमूलचे कार्यकर्ते भाजपला मतदान केले, तर परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकी देत होते. दरम्यान, तृणमूलच्या दडपशाहीनंतर महिलांनी घराबाहेर पडून मतदान केले. पोलिसांनीही इथे पोहोचून परिसराला घेरले व नागरिकांना पिटाळले.

बाबुल सुप्रियो यांच्या गाडीवर हल्ला

 

आसनसोल मतदारसंघात इव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचे म्हणत तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. हा प्रकार कळल्यानंतर केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांना प्रक्षुब्ध जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. जमावाने सुप्रियो यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. पोलिसांनी लाठीमार सुरू केल्याने मतदारांनीही काठ्या घेऊन पोलिसांच्या दिशेने चाल केली. त्यामुळे या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.





“मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घाबरल्या आहेत. त्यामुळेच मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप यावेळी सुप्रियो यांनी केला. दरम्यान, बाबुल सुप्रियो यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. दुसरीकडे पश्चिम बंगालमधील तृणमूल कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीविरोधात भाजपने आज केंद्रीय निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने यावेळी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची तक्रार केली व कारवाई करण्याची मागणी केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@