देशाचे आणि आपले भवितव्य घडविण्याची संधी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2019
Total Views |


 

कोणीही निवडून आला तरी आपल्या आयुष्यात काय फरक पडणार?, ही मानसिकता बाळगणाऱ्यांचीही बरीच मोठी संख्या आहे. दरवेळच्या मतदानानंतर घसरलेला मतटक्का याच मानसिकतेचा परिपाक असतो. पण ही मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, कारण तुमच्या एका मताने लोकशाहीचे आणि पुढल्या पिढीचे भवितव्य घडणार असते. म्हणूनच मतदान करा, तसेच बिनकामाच्या नोटा पर्यायाकडे वळण्यापेक्षा, गेल्या पाच वर्षांप्रमाणेच पुढली पाच वर्षेही विचारधारा प्रमाण मानणाऱ्यांकडे, राष्ट्रहित सर्वोपरी मानणाऱ्यांकडे देश सोपवणेच योग्य! कारण राष्ट्र टिकले तरच आपणही टिकू! म्हणूनच मतदान करा, मताधिकाराचा वापर करा!


भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सध्या सुरू असून आज चौथ्या टप्प्यातील मतदान होईल. मुंबई-महाराष्ट्रासह देशातल्या ९ राज्यांच्या ७१ लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश असून सुमारे १२.७९ कोटी मतदार अनेक दिग्गजांचे भवितव्य इव्हीएम यंत्रात बंद करतील. मतदान म्हटले की, ते का करावे? कोणाला करावे आणि कोणाला करू नये? हे प्रश्न नेहमीचेच. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रापुरता विचार करता कृष्णकुंजातल्या पोपटाने बारामतीच्या काकांच्या इशाऱ्यावर ‘मिठू मिठू’ करत शेंडाबुडखा नसलेल्या मुद्द्यावर ‘न’कलेचे प्रयोग सादर केले. मोदी-शाहंची जोडी हे राष्ट्रीय संकट असल्याचा शरद पवारांचा डायलॉग आपल्या तोंडातून सारखासारखा घोळवत भाजपला मतदान करू नका, या आवाहनाच्या साथीने हा कलाकार व्हिडिओचे खेळ करत भण्याभण्या फिरत राहिला. परंतु, ज्याने लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या पक्षाकडून उमेदवार उभे करण्याचीच हिंमत दाखवली नाही, त्याचा भंपकपणा ऐकून नेमके कोण आपले मत फिरवणार? तर नाहीच. कारण राज ठाकरेंची किंमत किती, हे गेल्या विधानसभा निवडणुकीपासून नंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकांतही मतदारांनी दाखवून दिलेच आहे. म्हणूनच नोटाबंदीमुळे दुकान बंद झालेल्या राज ठाकरेंनी भाजपविरोधाचा कितीही धुरळा उडविण्याचा इव्हेंट केलेला असला तरी सरतेशेवटी त्याचे फलित शून्यच असणार! सोबतच महाराष्ट्रात चार-दोन सभा घेऊन संपूर्ण देशभरातील मोदी-शाहंच्या भाजपची लाट थोपविण्याचा हा उद्योग म्हणजे विशाल सागराच्या लाटेला किनाऱ्यावर खिळे ठोकून रोखण्यासारखाच होता. शिवाय भाजपने राज ठाकरेंच्या असंबंद्ध आरोपांवर केलेल्या ‘व्हिडिओ स्ट्राईक’ ने तर मनसे अध्यक्षांसह ‘आमचे साहेब यंव-आमचे साहेब त्यंव’ म्हणत उड्या मारणाऱ्या मंद सैनिकांचाही पुरता तमाशा झाला.

 

दुसरीकडे मतदान का करावे आणि कोणाला करावे, हा काही काही जणांना एक गहन प्रश्न वाटत असला तरी त्याचे उत्तर अतिशय सोपे असल्याचे दिसते. तुम्हाला- देशाला प्रगतिपथावर घेऊन जाणारा पंतप्रधान हवा की, केवळ घराण्याचे हित पाहणारा? भारतीयत्वाची वज्रमूठ साकारणारा की, जातीपातीचे राजकारण करणारा? जनतेला स्वावलंबी करण्यासाठी झटणारा की, दीड-दमडीसाठीही लाचार करू पाहणारा? रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हा म्हणणारा की, रोजगार नेमके कशाला म्हणतात हेही माहीत नसणारा? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी परिश्रम घेणारा की, ज्याचा शेतकऱ्यांना कसलाही फायदा होत नाही, त्या कर्जमाफीचा धोशा लावणारा? पाच वर्षांत नऊ कोटींहून अधिक शौचालयांची बांधणी करण्यासाठी पुढाकार घेणारा की, लाल किल्ल्यावरील स्वच्छतेविषयक भाषणाची खिल्ली उडवणारा? देशातल्या प्रत्येक गावात वीज नेणारा की, वर्षानुवर्षे सत्ता भोगूनही जनतेला अंधारात ठेवणारा? गरिबालाही बँक व्यवहारांत सामावून घेणारा की, त्यांना बँकिंगपासून दूर ठेवणारा? भ्रष्टाचारावर हल्लाबोल करणारा की, सत्तेत येताच तीन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाणाऱ्यांचा सरदार असणारा? अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणारा की, एक रुपयांतले १५ पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात, असे म्हणणाऱ्यांचा वारसा सांगणारा? संवैधानिक संस्थांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा की, आपल्या गोटातल्या स्वयंसेवी संस्था, कथित विचारवंत-बुद्धीजीवींचा वापर करून निरनिराळ्या मार्गाने या संस्थांनाच आपल्या हातातले बाहुले समजणारा? जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटविणारा की, ही कलमे जैसे थे ठेवणारा? एका देशात एकच पंतप्रधान हवा असे म्हणणारा की, दोन पंतप्रधानांची भाषा करणाऱ्यांना पाठिंबा देणारा? देशद्रोह्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध असणारा की, देशद्रोहाचे कलमच रद्द करण्याचा मनसुबा बाळगणारा? सैन्यदलांना विशेष अधिकार देणारा अफस्पा कायदा कायम राखणारा की, हा कायदाच नको म्हणणारा? धर्मांध जिहाद्यांना घरात घुसून मारणारा की, देशाला धर्मांध इस्लामी दहशतवाद-नक्षलवादापेक्षा हिंदू दहशतवादाचा धोका जास्त असल्याचे बरळणारा? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करणारा की, त्यांची टवाळी करणारा?, हे प्रश्न विचारून पाहा. तुमची सद्सद्विवेकबुद्धी तुम्हाला नक्कीच उजव्या बाजूला उभ्या असलेल्या खमक्या व्यक्तीचीच निवड करायला लावेल. डाव्या बाजूला असलेल्या व्यक्तीची विचारधारा पाहून तुमचा तिळपापडही होईल, त्याला धडा शिकवावासेही वाटेल, पण कसे? तर हीच ती संधी-मतदानाची! सर्व प्रकारच्या राष्ट्रविघातक, समाजविघातक शक्तींवर तुटून पडण्याची! केवळ एका बटणाच्या शस्त्राने देशाला लुटून खाणाऱ्यांना, टुकडे-टुकडे गँगला पाठिंबा देणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याची! ‘परम वैभवं नेतु मेतत स्वराष्ट्रम्’ साठी अवघे जीवन वेचणाऱ्याला निवडण्याची! हीच ती वेळ! केवळ पाच वर्षांतून एकदा येणारी, देशाची दशा आणि दिशा ठरविणारी! म्हणूनच मतदान विचारपूर्व करा, दिशाभूल करणाऱ्यांच्या प्रचाराला बळी पडू नका! गल्लीसाठी नव्हे तर दिल्लीचे तख्त सांभाळण्यासाठी मजबूत नेतृत्वाला मतदान करा!

 

मतदानासंबंधी आणखीही काही मुद्दे आहेत, ज्यावर लिहिणे, बोलणे अत्यावश्यक! मतदान हा १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाचाच अधिकार असला तरी त्याचा वापर कसा करायचा, ही जबाबदारीही संबंधित व्यक्तीचीच असते. यंदा तर आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या मताधिकाराचा वापर करणाऱ्या मतदारांची संख्याही प्रचंड आहे. नुकतीच अमेरिकेतल्या २०० कंपन्यांनी चीनऐवजी भारतात उत्पादन केंद्र सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. हे कशामुळे शक्य झाले असेल? तर गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घेतलेल्या विकासाभिमुख, औद्योगिकतेला चालना देणाऱ्या निर्णयांमुळेच ना? नवमतदारांनी याचा विचार नक्कीच करावा. सोबतच मतदार म्हणून आपापल्या मतदारसंघातील उमेदवाराची वैयक्तिक कामगिरी तपासणे जितके महत्त्वाचे, तितकेच वा त्याहूनही अधिक त्याच्या पक्षाची विचारधारा, प्राधान्याचे मुद्दे हेदेखील पाहायला हवे. गेल्यावेळी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? आपल्या अपेक्षांची पूर्ती झाली का? लोकोपयोगी, जीवनावश्यक वस्तूंचा अखंडित पुरवठा केला का? रस्ते, रेल्वे, मेट्रो आदी पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले का? हेदेखील महत्त्वाचेच प्रश्न. २०१४ च्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकणारी अनेक आश्वासने दिली होती, ज्यात वर उल्लेखलेल्या मुद्द्यांचाही समावेश होतो. विशेष म्हणजे विद्यमान केंद्र सरकारने सत्तेत येण्याआधी दिलेल्या आश्वासनांना सत्यात उतरविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. म्हणूनच मोदी सरकारच्या आश्वासनपूर्तीची सरासरी सुमारे ८९ टक्क्यांएवढी असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले. याचाच अर्थ हे सरकार केवळ बोलघेवडेपणा करून थांबले नाही तर आपली जबाबदारी, आपले जनतेप्रतिचे उत्तरदायित्व समजून-उमजून त्या दिशेने प्रत्यक्ष कृतीही केली. कृषी क्षेत्र, विज्ञान आणि संरक्षण क्षेत्र, कौशल्य आणि सामाजिक विकास, अर्थविषयक, महिलाविषयक, पर्यावरण आणि ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण, व्यापार आणि उद्योग, प्रशासन, अल्पसंख्यविषयक अशा सर्वच क्षेत्रांत विद्यमान केंद्र सरकारने दमदार कामे केली. या कामांमुळे अर्थातच कोट्यवधी लोकांचे जीवनमान उंचावले, आयुष्यात स्थैर्य आले तर भारताची जगभरात प्रतिष्ठा वाढली. तरीही मोदी सरकारविरोधात भलत्यासलत्या कंड्या पिकविणाऱ्यांची देशात अजिबात कमतरता नाही. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सरकारला कसे कोंडीत पकडता येईल, यावरच ही मंडळी माथेफोड करत असतात. मोदीद्वेषापायी हे लोक कोणत्याही थराला जातात. जो व्यक्ती देशाचे भले करतोय, त्याच्याकडून आमचे हितसंबंध जपले जात नाहीत, म्हणून त्यांची आदळआपट सुरू असते.

 

इव्हीएमविरोधातला या लोकांचा कांगावादेखील यातलाच एक प्रकार. पूर्वीच्या काळी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका झाल्या की, मतपेट्यांची पळवापळवी करणे, हेराफेरी करणे, असले उद्योग होत असत. पण त्यालाच आता चाप लागल्याने विरोधांतील पक्ष आणि त्यांचे नेते इव्हीएमविरोधात गळा काढताना दिसतात. परंतु, देशातल्या निवडणुकांत वापरली जाणारी इव्हीएम यंत्रे हॅक करता येत नाही, तसे तंत्रज्ञानही उपलब्ध नाही, त्याचाही या बिनडोकांना पत्ता नसतो. एकविसाव्या शतकात वावरत असतानाही कालबाह्य झालेल्या मागण्या जे करतात, त्यांना नवयुगातल्या जनतेने का निवडून द्यावे? हा प्रश्न त्यामुळेच उद्भवतो. आता या तंत्रज्ञानविरोधी, निवडणूक आयोगावर विश्वास नसलेल्या, निवडणूक पद्धतीवर आक्षेप घेणाऱ्यांना मत द्यायचे का? याचाही मतदारांनी विचार केला पाहिजे. सोबतच चांगले राज्यकर्ते निवडून यावे, ही सर्वांचीच अपेक्षा असते, अन् त्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एक एक मतदेखील महत्त्वाचे आहे. कोणीही निवडून आला तरी आपल्या आयुष्यात काय फरक पडणार?, ही मानसिकता बाळगणाऱ्यांचीही बरीच मोठी संख्या आहे. दरवेळच्या मतदानानंतर घसरलेला मतटक्का याच मानसिकतेचा परिपाक असतो. पण ही मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, कारण तुमच्या एका मताने लोकशाहीचे आणि पुढल्या पिढीचे भवितव्य घडणार असते. म्हणूनच मतदान करा, तसेच बिनकामाच्या नोटा पर्यायाकडे वळण्यापेक्षा, गेल्या पाच वर्षांप्रमाणेच पुढली पाच वर्षेही विचारधारा प्रमाण मानणाऱ्यांकडे, राष्ट्रहित सर्वोपरी मानणाऱ्यांकडे देश सोपवणेच योग्य! कारण राष्ट्र टिकले तरच आपणही टिकू! म्हणूनच मतदान करा, मताधिकाराचा वापर करा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@