वडाची साल पिंपळाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019
Total Views |


 


राजकारणात कोणीही काहीही फुकट करीत नाही. राज ठाकरेही फुकट करीत नाहीत. मुद्दा आहे तो त्यांच्याकडून भ्रमनिरास झालेल्या मराठी माणसांचा आणि त्यांच्या स्वत:च्या कार्यकर्त्यांचा.


महाराष्ट्राच्या माध्यमात धुमाकूळ घालून सध्या आपले प्रस्थ वाढविलेल्या राज ठाकरेंचा बुरखा फाडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले ते बरेच केले. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याचा आव आणून राज ठाकरेंनी मनसे काढली. पुणे, नाशिक, मुंबई या ठिकाणी सत्ता किंवा सत्ताधाऱ्यांना वचक ठेवता येतील इतके लोकप्रतिनिधी गोळा केले आणि नंतर स्वत:च्या हाताने या सगळ्याची मातीदेखील गेली. आपल्या गंभीर आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने एके काळी मराठी माणसाचे मन जिंकलेल्या राज ठाकरेंची झालेली पडझड वेगळी मांडण्याचे कारण नाही. ते का घडले, याचे विश्लेषण सर्वच माध्यमांनी वारंवार केले आहे. आडनाव, व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा आणि मथळा मिळविण्याचे कसब यामुळे राज ठाकरे आजही माध्यमांना प्रियच आहेत. इंटरनेटवरून बातम्या मिळण्याचे प्रमाण वाढल्याने वृत्तवाहिन्यांकडे प्रेक्षक खेचण्याचे मोठे आव्हान आहे. राज ठाकरेंनी या संकटात वाहिन्यांची मदत केली. राजकारणातील अस्पृश्यता संपविण्याचे आव्हान यापूर्वी अनेकांनी केले होते. मात्र, राज ठाकरेंनी ते वेगळ्या प्रकारे संपविले. कधी ते मोदींचे गुण गात होते, तर ते आता राहुल गांधींना संधी देऊन पाहा, असे सांगायला लागले. २०१४ ला तर शिवसेना की राज ठाकरे असा प्रश्न भाजपसमोर होता पण, २०१४ ला उद्धव ठाकरेंनी ६४ आमदार निवडून आणत तो निकालात काढला. आपण युतीचे साथीदार होऊ, असा विश्वास राज ठाकरेंना तेव्हाही होता. मात्र, स्वत:च्या पडत्या आकड्यांनीच राज ठाकरेंना या स्पर्धेतून दूर फेकले. मग अपेक्षाभंग झालेल्या नायकाप्रमाणे राज ठाकरेंचा प्रवास सुरू झाला. उत्तम वक्ता तर ते होतेच. मोदींसमवेतच्या वैयक्तिक अपेक्षाभंगाची त्याला फोडणी मिळाली. मग कधी नव्हे, अशा शरद पवारांसोबतच्या भेटींच्या चर्चा रंगू लागल्या. खरे तर राज ठाकरे हे माध्यमातलेच व्यक्तिमत्त्व. सादरीकरण, सोहळे याबाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकत नव्हते. सभेत संगणकावरून सादरीकरण करण्याच्या त्यांच्या नव्या अंदाजाची चर्चाही खूप झाली. महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट सादर करण्यासाठी त्यांनी त्याचा सरावही केला होता पण, त्याचा उपयोग आज झाला. गेली चार वर्षे राज ठाकरेंचा पक्ष कोमात गेल्यासारखा आहे. आता प्रश्न असा की, अशा पक्षाचे कार्यकर्ते साहेबांच्या सभांसाठी खर्च उभा करतात कसा? इतक्या मोठ्या सभा भरविण्यासाठी लागणारी ताकद मनसे आणते कुठून ? तर या प्रश्नाचे उत्तर स्वच्छ आहे.

 

२०१४ पासून या देशात दोन राजकीय प्रवाह निर्माण झाले आहेत. एक आहे मोदींच्या बाजूचा, तर दुसरा आहे मोदींच्या विरोधातला. मोदींच्या बाजूने जे आहेत त्यांचा प्रश्न फारसा अवघड नाही. कारण, त्यांच्यासमोर मोदींसारखे खणखणीत नाणे उपलब्ध आहेत. भाजपने जेव्हा वाजपेयींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पेश केले होते तेव्हा त्यांना विशेषण लावले जायचे, ‘जाँचा, परखाँ, खरा.’ मोदी गेल्या पाच वर्षात आणि त्याच्या आधीपासून आपल्या देशातील भंपक लोकांच्या आगीत इतके तावून सुलाखून निघाले आहेत की, ते पोलादाप्रमाणे घट्ट झाले आहेत. दुसऱ्या बाजूला जे आहेत त्यांची स्थिती भयंकर आहे. मोदींकडे विश्वासाहर्ता आहे पण, यांच्याकडे काहीच नाही. राहुल गांधींसारखा बालिश माणूस चालवून घेण्याशिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय नाही, असे असताना महाराष्ट्रात या सगळ्या विरोधकांना राज ठाकरे गवसले आणि त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. सोशल मीडियाची कट-पेस्ट टिम उभी राहिली आणि वडाची साल पिंपळाला लावून राज ठाकरेंचे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूही झाले. माध्यमात त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. ज्यासाठी केला होता अट्टाहास, तो त्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध झाला. कधी काळी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न उराशी बाळगून राजकारणात उतरलेले राज ठाकरे आता पुरते जाणून आहेत की, त्यांना अशी संधी काही मिळणार नाही. मात्र, लोकांचे लक्ष, माध्यमांमध्ये स्थान हे सगळे त्यांना मिळाले. राजकारणात कोणीही काहीही फुकट करीत नाही. राज ठाकरेही फुकट करीत नाहीत. मुद्दा आहे तो त्यांच्याकडून भ्रमनिरास झालेल्या मराठी माणसांचा आणि त्यांच्या स्वत:च्या कार्यकर्त्यांचा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@