राधाकृष्ण विखे पाटलांचा काँग्रेसवरच हल्लाबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019
Total Views |



लोणी : लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणच्या जागेवरून विखे पाटील, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय मतभेदावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आज मौन सोडले. यावेळी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. विरोधीपक्ष नेते पदाचा काँग्रेसने राजीनामा मंजूर केल्यानंतर विखे पाटलांनी लोणी येथे पत्रकार परिषद घेऊन मौन सोडले. यावेळी त्यांनी स्वपक्षातील नेते व राष्ट्रवादीच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अद्याप कोणतीही राजकीय भूमिका घेतली नसल्याचे स्पष्ट केले.

 

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणच्या जागेवरून विखे पाटील, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले होते. या जागेवर विखे पाटलांचा मुलगा डॉ. सुजय विखे हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला होता. यावरून सुजय यांनी ही जागा भाजपकडून लढवल्याने विखे पाटील, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. या सर्व प्रकारांवरून विखे पाटीलांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे पाठवला होता. यानंतर काँग्रेसने विखे पाटीलांचा राजीनामा स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

 

विखे पाटीलांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना, नगरमधून डॉ. सुजय विखे याला उमेदवारी देण्याऐवजी शरद पवार यांच्याकडून आमच्या वडिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले गेले. त्यामुळे खेद वाटल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वपक्षातील नेत्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, नगरची जागा काँग्रेसला सोडा म्हणून मी वैयक्तिक आणि पक्षातर्फे शरद पवार यांना विनंती केली होती. मात्र, आमच्याच पक्षातील काही नेते यामध्ये खोडा घालत होते. दरम्यान, काँग्रेस पक्षाची शिस्तभंगासंबंधीची नोटीस मिळाली नसल्याने राजकीय भूमिका अद्याप ठरलेली नाही. निवडणूक झाल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दोन्ही बाजूंनी कोंडी झाल्याने राजकीय आत्महत्या करतो की काय अशी वेळ आली होती. अडचणीच्या काळात माझा पक्ष माझ्या पाठीशी राहिला नाही त्यामुळे मी माझ्या मुलाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता असे विखे पाटीलांनी यावेळी सांगितले. गेल्या साडेचार वर्षांत पक्षाने दिलेली विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी मी यथाशक्ती पार पाडली असल्याचे सांगत या काळात आपण जनतेचे अनेक प्रश्न मांडल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान,एकंदरीत राजकीय घडामोडी पाहून १५ मार्चलाच राहूल गांधी यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता विखे पाटील कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@