सुरक्षा असेल तर भाकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019   
Total Views |



भाकरी महत्त्वाची खरी; परंतु मेलेल्या माणसापुढे ती ठेवली तर तिचा काय उपयोग? म्हणून भाकरी खाण्यासाठी जीवंत राहिले पाहिजे आणि जीवंत राहायचे असेल, तर दहशतवाद्यांशी लढले पाहिजे. दहशतवाद्यांशी लढायचे असेल, तर लढणारे सरकार दिल्लीत हवे. रडणारे सरकार आपली प्रेते मोजीत बसते आणि लढणारे सरकार शत्रूला प्रेते मोजायला लावते. या निवडणुकीचा हा एक भावनिक विषय झालेला आहे. पोपट त्याची थट्टा करतो, राहुल गांधी त्याचे पुरावे मागतो, ममता त्याची खिल्ली उडविते. मतदार काही बोलत नाही, पण त्याची शाई मात्र नक्की बोलेल.


लोकसभा निवडणुकांचा प्रचार लवकरच शेवटच्या टप्प्यात प्रवेश करील. भारत विशाल देश आहे आणि जरी भारतात खोलवरची सांस्कृतिक एकता असली तरी, राजकीय एकतेच्या संदर्भात भारतीय जनता एकाच मुद्द्यावर येणे कठीण असते. वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि वेगवेगळ्या प्रादेशिक रचनेत राहणारे लोक सामान्यत: एकसारखाच राजकीय विचार अपवादाने करतात. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्य चळवळीचे वरदान लाभले. त्यामुळे लोकांनी आपआपसात सर्व प्रकारची भिन्नता असतानाही काँग्रेसला निवडून दिले. याच लोकांनी १९७७ साली काँग्रेसचा पराभव केला. १९९१ नंतर काँग्रेसच्या ऱ्हासाला प्रारंभ झाला. २०१४ ला लोकसभेत काँग्रेस फक्त दोन अंकी झाला. या निवडणुकीत काय होईल, याचे अचूक भाकित करणे कोणालाच शक्य नाही. भाजपचे नेते म्हणतात की, “यावेळी मोदींची लाट नसून त्सुनामी आहे.” निवडणूक प्रचाराच्या काळात अशीच भाषणे करावी लागतात. ती खरी ठरली, तर नेता म्हणतो, “मी सांगतच होतो” आणि खोटी ठरली, तर “आम्हाला जनमताचा अंदाज आला नाही,” असे तो म्हणणार. मोदींची लाट आहे, त्सुनामी आहे की ओहोटी आहे, याबद्दल ज्याची जी विचारसरणी त्याची तशी मते होतात. यात स्वत:चा पक्ष भाड्याने देऊन आणि आपले तोंडही भाड्याने देऊन भाषण करण्याऱ्या नेत्याची भविष्यवाणी फार गंभीरपणे घेण्याचे कारण नाही. घडीभर करमणूक करून घ्यावी, थोडे हसावे आणि राजकीय तणावमुक्त व्हावे. असे काही असले तरी, या लोकसभा निवडणुकांनी काही विषय ठळकपणे समोर आणले आहेत. पहिला विषय आणला आहे - मोदी हवेत की नकोत? मोदी नको असतील तर कोण? याचे उत्तर ना काँग्रेसजवळ आहे, ना महागठबंधनाजवळ. म्हणून सगळा प्रचार ‘मोदी नकोत’ या नकारात्मक मुद्द्यावर चाललेला आहे. नकारात्मक मुद्दा भारतीय जनता स्वीकारीत नाही. नकारात्मक मुद्द्याचा अर्थ असा होतो की, तू फार काळा आहेस, तुझे नाक चपटे आहे, तू खुजा आहेस, असे सांगितल्यामुळे मी गोरा होत नाही, मी सरळ नाकाचा होत नाही आणि मी उंचदेखील होत नाही. दुसऱ्याच्या उणिवा काढणे यासारखे सोपे काम दुसरे कोणते नाही. तोंड भाड्याने दिलेला नेता हे काम करीत असतो. विकासाच्या मुद्दा निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा झालेला नाही. निवडणुकांचा प्रमुख मुद्दा पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले, पुलवामाची घटना आणि बालाकोट हवाई हल्ला ही झालेली आहे. या मुद्द्यांवर सकारात्मक बोलण्यासारखे राहुल गांधीकडे काही नाही, शरद पवारांकडे काही नाही, ममता बॅनर्जी आणि मायावती यांच्याकडेही काही नाही. काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुला पाकिस्तानधार्जिणी वक्तव्यं करून ‘आग में घी डाल रहे है’ मुळातच भारतीय जनतेला या दोन्ही नेत्यांविषयी शून्य सहानुभूती आहे. ‘आझादी’च्या भूताने हे माजलेले लोक आहेत आणि त्यांचे कंबरडे मोडून काढले पाहिजे, अशी सर्वांची भावना आहे. हे काम मोदीच करू शकतात, असा लोकांना विश्वास आहे. कारण, या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेणारे ताशेरे कोणताही विरोधी नेता झाडीत नाही. उलट ते त्यांचे समर्थन करतात. ओमर अब्दुला दोन पंतप्रधानाची भाषा करतो. त्याचा कान धरण्याची हिंमत राहुल गांधींमध्ये नाही, शरद पवारांमध्ये नाही आणि पवारांच्या पोपटातही नाही. ही निवडणूक हळूहळू तापत तापत ‘राष्ट्रवाद’ या विषयावर गेलेली आहे. ‘राष्ट्रवाद’ विषय आला की, देशाच्या फाळणीचा विषय येतो. पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरचा विषय येतो. १९६२ सालच्या युद्धात चीनने बळकावलेल्या प्रदेशाचा विषय येतो. चीनला सुरक्षा परिषदेत नेहरूंनी कसे बसविले, याचा विषय येतो. काश्मीरची जखम नेहरूंनी कशी निर्माण केली याचा विषय येतो.१९९० सालापासून देशात पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यांचा विषय येतो आणि हे सगळे विषय तुमच्या-आमच्या सुरक्षित जगण्याशी येऊन भिडतात.

 

भाकरी महत्त्वाची खरी; परंतु मेलेल्या माणसापुढे ती ठेवली तर तिचा काय उपयोग? म्हणून भाकरी खाण्यासाठी जीवंत राहिले पाहिजे आणि जीवंत राहायचे असेल, तर दहशतवाद्यांशी लढले पाहिजे. दहशतवाद्यांशी लढायचे असेल, तर लढणारे सरकार दिल्लीत हवे. रडणारे सरकार आपली प्रेते मोजीत बसते आणि लढणारे सरकार शत्रूला प्रेते मोजायला लावते. या निवडणुकीचा हा एक भावनिक विषय झालेला आहे. पोेपट त्याची थट्टा करतो, राहुल गांधी त्याचे पुरावे मागतो, ममता त्याची खिल्ली उडविते. मतदार काही बोलत नाही, पण त्याची शाई मात्र नक्की बोलेल. राष्ट्रवादाचा विषय आला की, राष्ट्राचा विषय येतो. राष्ट्र म्हणजे एका भूभागावर हजारो वर्षे राहणारे लोक. त्या भूमीविषयी, तिच्यावर राहणाऱ्या लोकांची भावना भूमीला आई मानण्याची असते, म्हणून ‘वंदे मातरम्’ ही भावना ठेवणारा भारतातील जो जनसमूह आहे, त्याला ‘हिंदू’ असे म्हणतात. ‘राष्ट्र’ हा त्याच्या भावनेचा विषय आहे, त्याच्या श्रद्धेचा विषय आहे, ही भूमी त्याला पुण्यभूमी आहे, पितृभूमी आहे, देवभूमी आहे, ऋषिभूमी आहे - सर्व काही आहे. यामुळे हा राष्ट्रवादाचा विषय आजच्या नेहरू-गांधी घराण्याला रुचत नाही. त्यांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसवाल्यांना रुचत नाही. त्यांच्याबरोबर संसार केलेल्या आणि आता वेगळी चूल थाटलेल्या इतर पक्षांना रुचत नाही. कम्युनिस्टांना राष्ट्रवाद तर कडू कारले आहे. म्हणून ही सगळी मंडळी विचार काय करतात, तर निवडणुकांत धर्माच्या आधाराने विभाजन घडवून आणण्यात येत आहे. ‘अली’ आणि ‘बजरंगबली’ ही भाषा विभाजन करणारी आहे. गायीच्या रक्षणाचा विषय विभाजनाचा विषय आहे. अयोध्येतील राम मंदिराचा विषय देशाचे विभाजन घडवून आणणारा आहे. गल्ली-गल्लीतील सगळे ‘अली’ याबाबत एकमतात असतात. देशाची राष्ट्रीय जनता मात्र वेगळ्या एकमतात असते. २०१४ साली याच राष्ट्रीय जनतेने नरेंद्र मोदी आणि भाजपला निर्णायक बहुमत दिले. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशाचे विभाजन होईल, देशात दंगली उसळतील, हुकूमशहा निर्माण होईल, हिटलरशाही निर्माण होईल, असे तेव्हाही भरपूर बोलले गेले. राष्ट्रीय जनतेने ते ऐकले, मनात ठेवले आणि शाईने उत्तर दिले. आता गल्लीबोळातील अलींनी गेले काही वर्षे एक मुद्दा लावून धरला की, मोदी जर पुन्हा सत्तेवर आले तर निवडणुका होणार नाहीत. देशात एकपक्षीय हुकूमशाही निर्माण होईल. राज्यघटना गुंडाळून ठेवली जाईल, नवीन घटना आणली जाईल. स्वातंत्र्य संपेल, सामाजिक गुलामी पुन्हा कायम होईल. मुसलमान आणि ख्रिश्चन यांना दुय्यम नागरिकत्व दिले जाईल. मोठ्या जोमाने हा प्रचार झालेला आहे आणि आताही केला जातो.

 

राष्ट्रीय जनतेवर या प्रचाराचा काही परिणाम होतो का? माझा असा अंदाज आहे की, याचा शून्य परिणाम होतो. आपली मानसिकता कोणाचीही हुकूमशाही न मानण्याची आहे. एका देवाची हुकूमशाही आपण मानत नाही. पुराणातील देवांना मानण्याबरोबर आपल्याला मानवरूपात आलेले साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, ज्ञानदेव, तुकाराम, विवेकानंद आणि गांधीजीदेखील आपल्या देवघरात लागतात. असे ज्याचे मन अतिविशाल आहे, तो हुकूमशाही कशी स्वीकारणार? तो माहीमच्या चर्चमध्ये जाईल, हाजीअलीला जाईल आणि येता येता सिद्धिविनायकाचे दर्शनही करून येईल, अशी ही राष्ट्रीय जनता असल्यामुळे हुकूमशाही म्हणजे काय, हे तिच्या अनुभवात येणे फार कठीण आहे. राहिला प्रश्न राज्यघटनेचा, राज्यघटना कशाशी खातात, हे ज्यांना माहीत नाही, ही मंडळी राज्यघटना गुंडाळून ठेवणार हा आरोप करतात. ती गुंडाळून ठेवायला गादी किंवा चटई आहे का? हेदेखील ज्यांना समजत नाही, ते राज्यघटनेवर कशाला बोलतात? निवडणुका राज्यघटनेप्रमाणे होतात. पंतप्रधानाची निवड राज्यघटनेप्रमाणे होते, राष्ट्रपतीची निवड राज्यघटनेप्रमाणे होते, संसदेचे कायदे राज्यघटनेनुसार होतात. सगळा देश घटनेने बांधलेला आहे, तो इतका घट्ट बांधलेला आहे की, कोणाला कितीही राजकीय यश मिळाले तरी असे शंभरजणसुद्धा त्याचा एक धागादेखील इकडचा तिकडे करू शकत नाहीत. इतकी ही वीण मजबूत आहे. विरोधी पक्षांनी स्वत:ला बळ मिळेल असे मुद्दे उचलायला हवेत. पण, ते उलटे काम करताना दिसतात. साध्वी प्रज्ञासिंह हेमंत करकरेंविषयी काही बोलल्या. तसे त्या नसत्या बोलल्या, तर बरे झाले असते. परंतु, हेमंत करकरे यांनी प्रज्ञासिंह यांना छळले, त्यांचे हाल केले, ‘हिंदू दहशतवादा’चा खोटा आरोप त्यांच्यावर लादला, हे सगळे विषय पुढे आले. विरोधी पक्ष जर शहाणे असतील, तर त्यांनी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचे भांडवल केले नसते. हिंदू दहशतवाद, हेमंत करकरे यांनी केलेला छळ, याबद्दल राष्ट्रीय जनसमुदयाच्या भावना भयंकर तिखट आहेत. त्या जागे करण्याचे काम या सर्व विरोधी नेत्यांनी केले आणि चर्चा ‘हिंदू दहशतवाद’ या विषयावर सुरू झाली. ती या सर्वांना भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाले आणि ते इस्लामी दहशतवाद्यांनी केले. त्यामागे पाकिस्तानचा हात किती? ‘इसिस’चा हात किती? याची माहिती लवकरच बाहेर येईल. श्रीलंका भारताचा शेजारील देश आहे. भारताच्या सांस्कृतिक कुळातील देश आहे. त्याचे दु:ख हे आपले दु:ख आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे जसे त्यांचे शत्रू आहेत, तसे ते आपलेही शत्रू आहेत. आपल्याला सावध राहावे लागेल. हा विषय या निवडणूक प्रचारात यायला सुरुवात झालेली आहे. हे एक मोठे संकट आहे. त्याच्याशी मुकाबला करायचा आहे. कोणात ताकद आहे, याचा निर्णय राष्ट्रीय जनतेला करायचा आहे, तो आपल्या मताची मोहर उमटवून.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@