खासदार कपिल पाटील यांचे संकल्पपत्र जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019
Total Views |



भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा संकल्पपत्र जाहीर झाला आहे. भिवंडी-कल्याणवासीयांना दर्जेदार सरकारी उपचार मिळण्यासाठी `एम्स' रुग्णालय, टेक्सटाईल पार्क, यंत्रमागधारकांना वीजपुरवठ्यात २७ एचपीऐवजी ५० एचपीपर्यंत अनुदान, मेट्रो व रेल्वे प्रकल्प वेळेत होण्यासाठी पाठपुरावा, सर्व लोकल १५ डब्यांच्या, नवी रेल्वे स्थानके, लोकल प्रवाशांसाठी अधिकाधिक सुविधा आदींचा समावेश या संकल्पपत्रात करण्यात आला आहे.

 

आगामी पाच वर्षांत भिवंडी मतदारसंघाला नवे रुप देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती यावेळी खासदार कपिल पाटील यांनी दिली. कल्याण व भिवंडी शहरात दर्जेदार सार्वजनिक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी एम्स रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. केंद्र सरकारचे तीन मतदारसंघांसाठी एम्स रुग्णालय देण्याचे धोरण आहे. त्यादृष्टीने भिवंडीत `एम्स'साठी पाठपुरावा केला जाईल. भिवंडीत टेक्सटाईल पार्क, यंत्रमागधारकांना वीजपुरवठ्यात दिलासा देण्यासाठी वीज अनुदानाची मर्यादा २७ एचपीऐवजी ५० एचपीपर्यंत वाढविली जाईल, असे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले.

 

भिवंडी तालूका, समृद्धी-वडोदरा महामार्गावर तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी लॉजिस्टीक पार्क, कापड उद्योगासाठी ट्रेडींग सेंटर, कौशल्य विकास केंद्र व रोजगार मार्गदर्शन केंद्र, यूपीएससी-एमपीएससीसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आदी उभारण्यात येईल. त्यातून मतदारसंघातील नव्या पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. रोजगाराबरोबरच वाहतूकीच्या सुविधांना संकल्पपत्रात प्राधान्य दिले आहे. मेट्रो, जलवाहतूकीची कामे वेळेत करण्याबरोबरच वाहतूककोंडी दूर करण्यासाठी आराखडा केला जाईल. या आराखड्यानुसार उपाययोजना केल्या जातील. बदलापूरपर्यंत मेट्रोचा डीपीआर मंजूर करुन काम वेगाने करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन संकल्पपत्रात देण्यात आले आहे.

 

बदलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे महिला विशेष लोकल, कर्जत व कसाऱ्यापर्यंत सर्व १५ डब्यांच्या लोकल, सावरोली (शहापूर), चामटोली, गुरवली आणि पिंपळास येथे नवीन रेल्वे स्टेशन, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे वेळेत कामे, विमानतळाच्या धर्तीवर कल्याण रेल्वे स्टेशनचा विकास, कल्याण-नाशिक लोकल, रेल्वे स्टेशनवर पुरेशा सुविधा आदींना प्राधान्य देण्यात येईल, असे खासदार पाटील यांनी सांगितले. भिवंडीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे लोकलसेवा सुरू करण्याचे काम करण्यासाठीही उच्चस्तरीय पाठपुरावा केला जाणार आहे.

 

पंतप्रधान योजनेतून घरे, `एमएमआरडीए'च्या हद्दीत वाडा तालुक्याचा समावेश, `एमएमआरडीए' विभागाप्रमाणे भिवंडी मतदारसंघात जमिनीसाठी निर्देशांक, अविकसित भागात एमआयडीसी, एकात्मिक परिवहन सेवा, आधुनिक दर्जाची बसस्थानके, सिद्धगड, माळशेज घाट आणि माहूली किल्ला परिसरात सुरक्षित पर्यटनवाढीसाठी प्रयत्न आदी कामे करण्याचे आश्वासन संकल्पपत्रात देण्यात आले आहे.

 

शेतकरी, मध्यमवर्गीयांच्या गरजांना प्राधान्य : कपिल पाटील

 

भिवंडी मतदारसंघात शहरी व ग्रामीण भाग असून, संकल्पपत्रात चाकरमानी, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांच्या गरजांचा समावेश करण्यात आला. चाकरमान्यांसाठी रेल्वे, शेतकऱ्यांना भातसा धरणातून पाणी व पिकाला पाणी देण्यासाठी छोटी धरणे, इको सेन्सेटीव्ह झोन व वन विभागाच्या ३५ सेक्शनमधून दिलासा, मध्यमवर्गीयांसाठी पाईपमधून घरगुती गॅसचा पुरवठा, ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्यसेवा आदींना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@