बांदिवडेकर आणि साध्वी प्रज्ञा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

नवीनचंद बांदिवडेकर हे नाव विसरून गेलो आपण. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. ज्या वेळी यांचे नाव कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून घोषित झाले होते, त्या वेळी महाराष्ट्रात किती गदारोळ माजला होता! बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी संबंध आहेत आणि असे असताना कॉंग्रेससारखा सेक्युलर पक्ष त्यांना उमेदवारी कशी काय देतो, असले संतप्त प्रश्न त्या वेळी विचारण्यात आले होते. प्रकरण राहुल गांधी यांच्यापर्यंत गेले. शेवटी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षाचीच एक चौकशी समिती नेमली आणि बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी काही संबंध आहेत का, याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या समितीने काय अहवाल दिला तो काही जाहीर झाला नाही. परंतु, बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम राहिली आणि आतातर त्या मतदारसंघात मतदानही आटोपले आहे.
राज्यातील हिंदुद्वेषी, सेक्युलर बुद्धिवंतांचा ठाम विश्वास आहे की, दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचा हात आहे. त्यामुळे अशा या संस्थेशी संबंधित बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवरून समस्त सेक्युलरी जमात अस्वस्थ झाली होती. स्वातंत्र्यापासून ज्या पक्षाला आपण बौद्धिक कचरा पुरवत आलो आहे, तो पक्ष असा कसा वागत आहे, याचा एक दु:खतप्त भाव या सर्वांच्या चेहर्यावर होता. कॉंग्रेस पक्ष असा वागू लागला, तर मग कॉंग्रेस आणि भाजपात फरकच काय राहिला? आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? इत्यादी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. राज्यातील मीडिया, वैचारिक व साहित्यक्षेत्रावर अजूनही याच सेक्युलरी वामपंथी लोकांचा दबदबा असल्याने क्षुद्रादिक्षुद्र सेक्युलर लोकांच्याही प्रतिक्रियांना ठळकपणे प्रसारित करण्यात आले. आपल्या या दबावामुळे कॉंग्रेस पक्ष 24 तासांच्या आत बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द करून त्याऐवजी सेक्युलरी रंगात रंगलेली व्यक्ती उमेदवार म्हणून देणार, असेही अभिमानाने सांगण्यात आले. परंतु, तसे काहीही झाले नाही. इतका धडधडीत अपमान झाला असताना, या मंडळींनी आता कुठल्या पक्षाला मतदान केले ते कळू शकले नाही. कॉंग्रेसलाच केले असणार. जाणार कुठे? कदाचित कॉंग्रेसने या मंडळींना, त्यांच्यावर केलेल्या आर्थिक उपकारांची आठवण करून दिली असणार. नाहीतर ही मंडळी ‘मोडेन पण वाकणार नाही’ या परंपरेतली असते, म्हणतात.
आपल्या महाराष्ट्रातील सर्व सेक्युलरी, वामपंथी, अंधश्रद्धा निर्मूलनादी मंडळींचे शिरोमणी म्हणून माननीय कुमार केतकर ख्यात आहेत. ते आता कॉंग्रेसच्या कृपेने राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. कितीतरी वर्षांपासून ते या आशेने इकडून-तिकडे जात-येत होते. पण, त्यांना कुणी खासदार करीत नव्हते. शेवटी एवढ्यातच त्यांचे घोडे गंगेत न्हाले. असे म्हणतात की, आजकाल राहुल गांधींची भाषणे ते लिहून देतात. एवढेच नाही, तर विरोधकांवर जहाल हल्ले करण्यासाठी संदर्भ, मुद्दे इत्यादींचा पुरवठाही ते करत असतात. म्हणजे कॉंग्रेसच्या हायकमांडमध्ये त्यांचे बर्यापैकी वजन असावे, असे मानायला हरकत नाही. असे असतानाही, बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द होत नाही. याला काय म्हणावे? बांदिवडेकरांवरून या सेक्युलरी मंडळींनी किती आकाश-पाताळ एक केले होते! पण, काहीही फायदा झाला नाही. कुमार केतकरांकडून फार आशा होती. ते तरी कॉंग्रेस हायकमांडला काही सुबुद्धी देतील. पण, आकाश आणि पाताळ एक झालेच नाही. आकाश आपल्या जागी राहिले अन् पाताळ आपल्या जागी. यानंतर या बडबोल्या सेक्युलर मंडळींची अशी काही दातखिळी बसली की, अजूनही ती उघडली गेली नाही. निखिल वागळे तर बांदिवडेकरप्रकरणी एक शब्दही बोलत नाही आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवालेही चूप आहेत. दाभोळकरांचे पुत्र, पुत्री यांचाही कुठे निषेधाचा सूर ऐकू येत नाही. कुणी, कुणी बोलायला तयार नाही. फार म्हणजे फारच विचित्र वाटत आहे. पण साध्वी प्रज्ञासिंहबद्दल...
विचारायलाच नको. किती आगपाखड सुरू आहे! तिला दहशतवादी ठरवूनही टाकले आहे. आता जर ती निवडून आली, तर भारतीय संसददेखील दहशतवादाचा अड्डा बनेल, इत्यादी अकलेचे तारेही तोडून झाले. साध्वीने उमेदवारी अर्जही भरला आहे. तरीही या मंडळींचे आग ओकणे बंद तर सोडाच, कमीही झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे ठाम समर्थन केले आहे. कुठेही लपवाछपवी नाही की जर-तरची भाषा नाही. सोनिया गांधींच्या कॉंग्रेस सरकारने हिंदू दहशतवाद ही संकल्पना जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच समोर आणली आणि हजारो वर्षांपासून सहिष्णुतेचे एक प्रतीक म्हणून वाखाणल्या गेलेल्या हिंदू समाजावर एक अपमानास्पद लांछन लावण्यात आले. हिंदू मानस दुखावले गेले होते. हिंदू समाजाच्या मनात खोलवर झालेल्या या जखमेवर उतारा म्हणून साध्वी प्रज्ञिंसह यांना भाजपाने त्या पक्षाच्या अत्यंत सुरक्षित अशा जागेवरून उमेदवारी दिली आहे. हिंदूंनी घेतलेला हा एकप्रकारे बदला आहे, अशी भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. एखादा पक्ष आपल्या उमेदवाराच्या मागे इतका ठामपणे उभा राहिला असतानाही, या सेक्युलरी मंडळींची आगपाखड काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. तिकडे बंदिवडेकरांबाबत कॉंग्रेस पक्षाने ‘तळ्यात-मळ्यात’चा खेळ चालविला असताना आणि चौकशी समितीचे नाटक उभे करून सरतेशेवटी बांदिवडेकरांनाच उमेदवारी कायम ठेवली असताना, त्याविरुद्ध मात्र ही मंडळी एक अक्षरही तोंडावाटे काढत नाही. वामपंथी, सेक्युलर मंडळी अत्यंत असहिष्णू तसेच अत्यंत जातीयवादी असतात, हे माहीत होते. परंतु, ती इतकी ताटाखालची मांजरे असतील याची कल्पना नव्हती. साहित्यकार, बुद्धिवंत, विचारवंत, रॅशनलिस्ट म्हणून ज्यांना आम्ही डोक्यावर घेतले, ती इतकी उथळ आणि लाचार निघावीत, याचे फार वाईट वाटते.
ते बी. जी. कोळसे पाटील कुठे गेलेत? आता कुठेच बोलत नाहीत? कोरेगाव भीमा प्रकरणाच्या वेळी नको नको तिथे ही व्यक्ती अत्यंत विषारी फूत्कार सोडत होती. तीपण सध्या कुठे दिसत नाही. या माणसाची वक्तव्ये बघितली की प्रश्न पडतो, न्यायाधीशपदी असताना या माणसाने खरेच निष्पक्ष निर्णय दिले असतील का? ज्याच्या मनात दुसर्या समाजाविषयी इतके विष काठोकाठ भरले आहे, तो माणूस निष्पक्षपणे न्यायदान कसे काय करत असेल? म्हणून या माणसाने न्यायाधीश म्हणून दिलेले सर्व निर्णय एकदा तपासून बघायला हवे.
 
 
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरेंबाबत जे विधान केले, त्यावरूनही या लोकांनी आपापली छाती पिटली. पण एकही जण, तर्काला धरून बोलला नाही. हेमंत करकरे यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आले आहे. अशोकचक्र हा शांतिकाळातील सर्वोच्च भारतीय लष्करी सन्मान आहे. हेमंत करकरे देशासाठी निश्चितच शहीद झाले. ज्या करकरेंनी साध्वी प्रज्ञासिंह यांना अमानुष मारहाण केली, तिला लुळीपांगळी करून टाकली आणि तरीही तिच्याविरुद्ध एक आरोपही गोळा करता आला नाही, त्या करकरेंबद्दल जर ती साध्वी तळतळाटापोटी काही बोलत असेल, तर सर्व सेक्युलरांनी तिच्यावर इतके तुटून पडावे? काश्मिरी अतिरेकी आणि नक्षल्यांच्या मानवाधिकारापायी भारत सरकारशी सतत झटे घेणार्या या लोकांना, प्रज्ञासिंह हीदेखील एक मानव आहे आणि त्यातही एक महिला आहे, याचा कसा काय विसर पडतो? ती साध्वी आहे म्हणून तिला मानवाधिकार नाही का? या सेक्युलर मंडळींचा हा असा दोगलेपणा नवीनचंद्र बांदिवडेकर व साध्वी प्रज्ञा यांच्या निमित्त पुन्हा एकदा उघड झालेला आहे. या दोगल्या लोकांना चांगलाच धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे वाटते.
@@AUTHORINFO_V1@@