वैद्यकीय सेवा देणारे ड्रोन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019   
Total Views |



घाणासारख्या देशात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा सुरू झाली, ही महत्त्वाचीच घटना. ड्रोन सेवेद्वारे किमान वेळात औषधे पोहोचविल्याने रुग्णांच्या आजारांत व आयुष्यात नक्कीच फरक पडेल.


माणसाला कधी कोणता आजार जडेल, हे कोणीही सांगू शकत नाही. फार पूर्वी कधीतरी काही काही आजार हे विशिष्ट वयानंतरच होतात, असेही मानले जात असे. आता मात्र, कोणत्याही वयात अगदी गंभीर म्हटले जाणारे आजार होण्याचे प्रमाणही भरपूर आहे. आजार आला की, त्यावरील उपचारांची, आरोग्य विम्याचीही चर्चा होते. सोबतच कोणत्या डॉक्टरांकडून किंवा कोणत्या रुग्णालयातून उपचार घेतले की, रुग्ण पूर्णपणे बरा होईल, याचाही विचार केला जातो. डॉक्टरमंडळी रुग्ण पूर्णपणे बरा व्हावा म्हणून १०० टक्के प्रयत्न करतच असतात. आताच्या आधुनिक युगात तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, विकासामुळे रुग्णावरील उपचारांसाठी नवनव्या पद्धतींचा, उपकरणांचाही वापर करण्यात येतो. नव्या साधनांमुळे वैद्यकीय सेवाक्षेत्रात आमूलाग्र बदल होताना ड्रोनचा उल्लेख हा बऱ्याचदा होताना दिसतो. ड्रोनच्या साहाय्याने रुग्णाला कशाप्रकारे लवकरात लवकर औषधोपचार पोहोचवता येतील, यासाठी जगातल्या अनेक देशांत चाचणी, प्रयोग सुरू आहेत तर काही ठिकाणी ड्रोनचा प्रत्यक्षात वापरही होत आहे. भारतातही ड्रोनचा वापर करून ग्रामीण, दुर्गम, पर्वतीय प्रदेशात वैद्यकीय सेवा पुरवता येतील का, हे तपासून पाहिले जाते. परंतु, अजूनतरी अशा ठिकाणी पूर्ण शक्तिनिशी ड्रोनचा वापर कोणी केलेला दिसत नाही.

 
शहरांमध्ये कदाचित ड्रोनचा वापर होऊही शकतो. वैद्यकीय क्षेत्रात ड्रोनच्या वापराचे अनेक फायदे सांगितले जातात. म्हणजेच कमी वेळात कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट रुग्णापर्यंत वैद्यकीय मदत घेऊन जाणे सहजशक्य होते, हा सर्वात महत्त्वाचा भाग. जगातील यासंबंधी प्रयोग, अभ्यास, चाचणी, परीक्षण करत असतानाच आफ्रिका खंडातील एका देशाने जगातील सर्वात मोठी ड्रोन वैद्यकीय सेवा केली आहे, त्याचे नाव घाणा. घाणा या देशात जगातली सर्वात मोठी वैद्यकीय ड्रोन सेवा सुरू करण्यात आली असून जवळपास ३ कोटी लोकसंख्येच्या या देशात ड्रोन्सची दररोज ६०० उड्डाणे होतील! सुमारे १ कोटी, २० लाख लोकांना या सेवेचा फायदा होईल अन् या सेवेमार्फत रुग्णांसाठी २ हजार आरोग्य केंद्रात लसी, रक्तपिशव्या आणि जीवरक्षक औषधांचा पुरवठा केला जाईल. घाणाच्या प्रशासनाने ड्रोन सेवेसाठी देशात ४ प्रमुख केंद्रे तयार केली असून प्रत्येक केंद्रामध्ये ३० ड्रोन ठेवलेले आहेत. या सर्वच ड्रोनची निर्मिती कॅलिफोर्नियाच्या रोबोटिक्स कंपनी-जिपलाइनने केली आहे. दरम्यान, ड्रोन सेवेच्या उद्घाटनावेळी घाणाचे राष्ट्रपती अकूफो-अद्दो यांनी सांगितले की, “वैद्यकीय ड्रोन सेवेमुळे देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत जीवरक्षक औषधे पोहोचवली जातील. आता घाणाच्या कोणत्याही व्यक्तीचा केवळ वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने जीव जाणार नाही.” अद्दो यांचे हे म्हणणे नक्कीच खरे म्हटले पाहिजे. कारण बहुतांशवेळा रुग्णाला वेळेवर औषधोपचार मिळाले तर कित्येकांचे प्राण वाचू शकतात, हे बऱ्याच अभ्यासांतूनही स्पष्ट झाले आहे.
 

तथापि, ज्यावेळी प्रस्थापितांऐवजी कोणतीही नवी पद्धती, प्रणाली अस्तित्वात येते, तेव्हा त्याबद्दल टीका-विरोधाची भाषा केलीच जाते. तसाच विरोध इथेही करण्यात आला. टीकाकारांच्या मते देशात सध्या ५५ रुग्णवाहिका आहेत, म्हणूनच पैशांचा उपयोग आरोग्यसेवांच्या (रुग्णवाहिका दवाखाना) उत्कृष्टतेसाठी करायला हवा. दुसरीकडे घाणा मेडिकल असोसिएशनने हा प्रकल्प रद्द करण्याचीही मागणी केली होती. प्रकल्पाच्या आधी त्याची व्यवस्थित चाचणी घेतली जावी, असे त्यांनी म्हटले होते. सोबतच ड्रोन सेवेमुळे आरोग्यक्षेत्रातील समस्या सुटणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र, ज्यावेळी या प्रकल्पाला संसदेत मांडण्यात आले तेव्हा १०२ विरुद्ध ५८ मतांनी तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर सरकारने जिपलाइनशी चार वर्षांसाठी सुमारे ८४ कोटी रुपयांचा करार केला. दरम्यान, जिपलाइनने २०१६ मध्ये पहिल्यांदा रवांडा देशात ड्रोन सेवा सुरू केली होती. तेव्हापासून तिथे आजतागायत १३ हजार वेळा ड्रोनद्वारे जीवरक्षक औषधे देण्यात आली आहेत. यासाठी मोबाईलच्या माध्यमातून जिपलाईनला मेसेज पाठवावा लागतो, त्यानंतर केवळ अर्ध्या तासात सांगितलेली औषधे घरपोच पाठवली जातात आणि ड्रोनमधून एका पॅराशूटद्वारे ते खाली उतरवले जातात. घाणासारख्या देशात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा सुरू झाली, ही महत्त्वाचीच घटना. ड्रोन सेवेद्वारे किमान वेळात औषधे पोहोचविल्याने रुग्णांच्या आजारांत व आयुष्यात नक्कीच फरक पडेल.

 
  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@