दिल्लीत चुरशीच्या तिरंगी लढती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |

 
 
 
दिल्लीतील, लोकसभेच्या सात जागांसाठी 12 मे रोेजी होणार्या निवडणुकीत भाजपा, कॉंग्रेस आणि आप अशी चुरशीची तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आप आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाली असती, तर त्याचा फटका निश्चितपणे भाजपाला बसला असता, त्यामुळे या दोन पक्षांतील आघाडीच्या घडामोडींकडे भाजपाचे लक्ष लागले होते. मात्र, शेवटी या दोन पक्षांत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर भाजपाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
कॉंग्रेस आणि आप यांच्यात आघाडी होणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. त्या दृष्टीने या दोन पक्षांमध्ये चर्चाही सुरू झाली होती. कॉंग्रेससोबत आघाडी व्हावी यासाठी आप जास्त उत्सुक होती. सुरुवातीला आपसोबत आघाडी करायला कॉंग्रेस तयार नव्हती, मात्र शेवटी कॉंग्रेसने आपसोबत आघाडी करायची तयारी दर्शवली. मात्र, आघाडी करायची असेल तर कसे वागू नये, याचा आदर्श कॉंग्रेस आणि आप यांनी घालून दिला आहे. या दोन पक्षांनी आघाडीसाठी एवढा घोळ घातला की, त्यामुळे सर्वच जण कंटाळून गेले होते. आप आणि कॉंग्रेस यांना समविचारी पक्ष मानता येणार नाही, त्यामुळे या दोन पक्षांत आघाडी झाली असती तरी ती आघाडी नैसर्गिक मानता आली नसती. कारण या दोन पक्षांची विचारधारा कधीच एक राहिली नाही. मुळात कॉंग्रेसविरोधी मानसिकतेतूनच आपचा जन्म झाला. फक्त कॉंग्रेसविरोधी मानसिकताच नाही, तर कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराशी लढा देत आपने आपले राजकारण सुरू केले होते. त्यामुळे या दोन पक्षांनी राजकीय अपरिहार्यता म्हणून आघाडीची चर्चा सुरू केली असली, तरी तिला जनतेचा पाठिंबा मिळणे कठीण होते.
 
 
 
आपल्या सुरुवातीच्या काळात आपने कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर कठोर हल्ला चढवला होता. त्यामुळे कॉंग्रेसलाही आपशी आघाडी करणे सोपे नव्हते. भाजपाविरोध हा एकमेव मुद्दा सोडला, तर या दोन पक्षांत काहीच समान नव्हते. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या समान दुव्यावर या दोन पक्षांत आघाडीची चर्चा सुरू झाली होती. गंमत म्हणजे आपशी आघाडी होणार नाही असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्यावरही; तसेच आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल यांनीही अशीच भूमिका घेतल्यावरही, आप आणि कॉंग्रेस यांच्यातील आघाडीचे भिजतघोंगडे संपत नव्हते. त्यामुळे हो हो नाही नाहीचे अनेक प्रयोग या आघाडीच्या नाटकात झाले.
कॉंग्रेस आणि आप यांच्यात आघाडी व्हावी, यासाठी या दोन्ही पक्षांवर बाह्य दबाव होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोन पक्षांत आघाडी व्हावी म्हणून पाण्यात देव टाकून बसले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नाही म्हटल्यावरही या दोन पक्षांना पुन्हा चर्चा सुरू करावी लागत होती. यातून या दोन्ही पक्षांचे बाहेर हसे होत होते.
मुळात आघाडीवरून आपमध्ये एकसूत्रता होती, पण त्यांची वागणूक आघाडी धर्माला जागणारी नव्हती. एकीकडे आप कॉंग्रेसशी आघाडीची चर्चा करत होती, तर दुसरीकडे आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा त्याने आधीच करून टाकली होती. त्यामुळे आपच्या उमेदवारांनी आपला प्रचारही सुरू केला होता. आपच्या वागण्यात आघाडीबाबतची विसंगती जास्त जाणवत होती. त्या तुलनेत कॉंग्रेसमध्ये आघाडीवरून सुरुवातीपासूच एकवाक्यता नव्हती. माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश कॉंगे्रस अध्यक्ष शीला दीक्षित यांचा आपसोबतच्या आघाडीला ठाम विरोध होता. दुसरीकडे, प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी पी. सी. चाको तसेच माजी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अजय माकन यांची आपसोबत आघाडी व्हावी, अशी भूमिका होती. त्यामुळे सुरुवातीला राहुल गांधी यांची पूर्ण ताकद दोन गटांतील मतभेद मिटवण्यातच गेली.
कॉंग्रेसमध्ये आघाडीवरून भिजत घोंगडे असतानाच, आपने दिल्लीसोबत हरयाणा आणि पंजाबमध्येही कॉंग्रेसने आघाडी करावी, असा आग्रह धरला. मुळात आघाडीवरून या दोन पक्षांनी जेवढ्या कोलांटउड्या घेतल्या, तेवढ्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात खचीतच कुणी घेतल्या असतील.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत आप, कॉंग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत झाली होती. परिणामी, भाजपाने दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्या वेळी आप आणि कॉंग्रेस यांच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज भाजपाच्या उमेदवारांपेक्षा जास्त होती. त्यामुळे यावेळी आप आणि कॉंग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली असती, तर भाजपाला निवडणूक सोपी राहिली नसती.
दुसरीकडे, तिरंगी लढतीत आपण भाजपसमोर टिकू शकत नाही, याची कॉंग्रेस आणि आप यांच्या नेत्यांनाही जाणीव आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि अन्य नेत्यांनी आपसोबत आघाडी होत असेल तरच निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. आपसोबत आघाडी न झाल्यामुळे कपिल सिब्बल यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने दिल्लीतील आपले दोन खासदार वगळता अन्य पाच खासदारांवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. पूर्व दिल्लीचे खासदार महेश गिरी आणि उत्तर-पश्चिम दिल्लीचे खासदार उदितराज यांना भाजपाने उमेदवारी नाकारली आहे. मीनाक्षी लेखी यांनाही उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा होती, भाजपा अध्यक्ष अमित शाह मदतीला धावल्यामुळे लेखी यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आपल्या सोयीने अर्थ काढण्याच्या राहुल गांधी यांच्या विधानाला मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यामुळे राहुल गांधी यांची अडचण झाली आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांची केलेली कोंडी मीनाक्षी लेखी यांची पक्षातील प्रतिमा उंचावून गेली, परिणामी त्यांना उमेदवारी मिळाली.
महेश गिरी यांच्या मतदारसंघात भाजपाने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि उदितराज यांच्या जागेवर प्रसिद्ध पंजाबी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी नाकारल्यावर महेश गिरी यांची प्रतिक्रिया समजू शकली नसली, तरी उदितराज यांनी मात्र आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या पहिल्या यादीत नाव नसल्यानंतरच उदितराज यांनी भाजपाच्या नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, पण भाजपाचे नेतृत्व त्यांच्या दबावाला बळी पडले नाही.
उदिततराज यांनी दलित कार्डही खेळून पाहिले, पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उदितराज यांनी भाजपात प्रवेश करताना आपली इंडियन जस्टिस पार्टी भाजपात विलीन केली होती. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले उदितराज यांनी भाजपाचा त्याग करून कॉंग्रेसचा हा धरला आहे. पण उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यामुळे उदितराज यांना आता तिकीट मिळणार नाही, त्यामुळे त्यांना निवडणूकही लढवता येणार नाही. ते आता कॉंग्रेससाठी प्रचार करणार आहेत.
दिल्लीच्या सातही लोकसभा मतदारसंघांत यावेळी चुरशीची तिरंगी लढत होणार आहे. मात्र, त्यातही सर्वाधिक चुरशीची लढत उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघात होणार आहे. या ठिकाणी दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांचा मुकाबला दिल्ली प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष राहणार आहे. कारण या ठिकाणी दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांतच दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची दिशा ठरणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका दिल्लीत सर्वच म्हणजे भाजपा, कॉंग्रेस आणि आप यांच्यासाठी जीवनमरणाच्या ठरणार आहेत. यात जो पक्ष बाजी मारेल, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्याच्या गळ्यात वरमाळा पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अरविंद केजरीवाल यांनी मध्यंतरी जे प्रयोग केले, त्यामुळे दिल्लीची जनता कंटाळली आहे. आता त्यांचा पूर्वीसारखा दबदबा राहिलेला नाही. शिवाय दिल्लीतील विकास कामे जनतेच्या नजरेत आहेत. त्यामुळे लोकसभेसारखी विधानसभेतही भाजपाचीच सरशी होणार, असे बोलले जात आहे.
 
 
 
9881717817
@@AUTHORINFO_V1@@