राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |


मुंबई : एकही उमेदवार लोकसभेसाठी निवडणूक लढवत नसताना मोदी शाह विरोधासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडीओ या नव्या शैलीत प्रचार सुरू केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजपही राज यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देण्याची तयारी करत आहे. संबंधित विषयांवर राज ठाकरे यांची यापूर्वीची वक्तव्य आणि त्यानंतरची वक्तव्य येत्या २७ फेब्रुवारीच्या सभेत दाखवली जाणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

 

मुंबई भाजपच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तावडे म्हणाले, "एकाच विषयावर राज यांची आधीची आणि आताची वक्तव्ये; तसेच त्यांच्यावर रमेश किणी प्रकरणापासून झालेले अन्य आरोप प्रचाराच्या सांगतेवेळी २७ तारखेच्या सभेत दाखविले जाणार आहेत. राज ठाकरे प्रकारे आरोप करत आहेत, त्याच स्टाईलने भाजप २७ तारखेच्या सभेत उत्तर देणार आहे. आमची राज ठाकरेंना विनंती आहे की, २७ एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरू ठेवाव्यात. त्यांच्या टुरिंग टॉकिजमुळे जनतेची चांगली करमणूक होत आहे. त्यांचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नसल्याने त्यांचे स्टँडअप कॉमेडी शो सुरू ठेवायला काही हरकत नाही," असा टोला त्यांनी लगावला.

 

राज ठाकरे यांचीही फेसबुक पेजेस अधिकृत नाहीत

 

काळाचौकी येथील सभेत राज ठाकरेंनी चिले कुटुंबाचा फोटो दाखवत राज यांनी भाजपवर हल्ला चढवला त्याला प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले, "दाखलेला फोटो भाजपच्या किंवा राज्य सरकारच्या अधिकृत जाहिरातीतला नाही. कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर तो प्रसिद्ध झाला नाही. एखाद्या मोदीप्रेमीने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला असू शकतो. मात्र, अशा पद्धतीने फोटो वापरणे चुकीचे आहे. राज ठाकरेंच्या नावानेही अनेक पेजेस् आहेत, ती सगळेच काही अधिकृत नाहीत. त्यांच्या अधिकृत पेजवरील माहितीच आम्ही खरी मानतो, असा टोलाही तावडेंनी लगावला.

 

सर्वसामान्यांच्या मतावर लोकशाही टीकून

 

उद्योगपतींच्या मतांवर नाही, तर सर्वसामान्यांच्या मतांवर लोकशाही टिकून आहे. पण, पवारांचे बोट धरून चालणाऱ्या राज यांना याची कल्पना नाही. शरद पवार, चंद्राबाबू नायडू यांनी रशियावरून ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप केला आहे. नशीब त्यांनी अंतराळातून ईव्हीएम हॅक होते असे म्हटले नाही. पराभव लक्षात आल्यामुळेच विरोधकांनी आतापासून कारणांचा शोध सुरू केला आहे, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधानांच्या विविध वक्तव्यांचे राज चुकीच्या पद्धतीने भांडवल करीत आहेत. मात्र, त्यातील वास्तव आम्ही दाखवू. राज यांनी आतापर्यंत अनेकवेळा कशी आणि का भूमिका बदलली हेही या सभेत दाखविले जाणार आहे, असे ते म्हणाले.

 

भाजपची व्यूहरचना

 

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिले, तर ते त्याचा प्रतिवाद करू शकणार नाहीत. आचारसंहितेमुळे तितका तेवढा वेळही मिळणार नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांची कोंडी करण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. त्यानंतरही मनसैनिकांनी उत्तर द्यायचे ठरवले, तर त्यांना ते सोशल मीडियावर द्यावे लागेल, हे गृहीत धरून भाजपने प्रचाराचा शेवटचा दिवस निवडल्याचे सांगण्यात येते. राज ठाकरेंवर आरोप करणाऱ्या काही व्यक्तींना व्यासपीठावर आणण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@