सागरी कासवांचा रक्षणकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |



काही माणसं केवळ वन्यजीव संवर्धनाचे काम करण्यासाठीच जन्माला आलीत का, असा प्रश्न पडतो आणि कासवमित्र मोहन उपाध्ये याला भेटल्यानंतर तर त्याचं नक्कीचं होकारार्थी उत्तर मिळतं.


काही माणसं निसर्गानेच आपल्या रक्षणासाठी जन्माला घातल्यासारखी वाटतात. जणू काही निसर्गाची सेवा करण्यासाठीच ही माणसं नेमल्यासारखी. तोदेखील असाच. स्वच्छंदी, मनमोकळा, प्रामाणिक आणि शिस्त-नियमांच्या चौकटीत निसर्गाची आणि खासकरून सागरी कासवांची काळजी घेणारा. मुंबईत घर आणि मुख्य म्हणजे स्थिर पगाराची नोकरी असतानाही निसर्गाच्या ओढीने त्याने या शहराला रामराम ठोकला. आपले कोकणातले गाव वेळास गाठले आणि कासवांच्या वेडापायी तो तिथेच स्थायिक झाला. गेल्या १४ वर्षांपासून तो सागरी कासव संवर्धनाचे काम झपाटल्यासारखा करतोय. त्याचे नाव कासवमित्र मोहन उपाध्ये म्हणजेच सगळ्यांचा लाडका 'मोहनदादा'! कासवांशी घट्ट मैत्री असणाऱ्या मोहनदादांचा जन्म ५ फेब्रुवारी, १९७८ सालचा. चेंबूर येथील मध्यमवर्गीय उपाध्ये कुटुंबातील तो शेंडेफळ. आई-वडील आणि तीन मोठ्या बहिणी असे त्याचे कुटुंब. लहानपणापासून प्राण्यांची विशेष आवड. शाळेत जाताना रस्त्यात कुठे कुत्र्या-मांजरांची जखमी पिल्ले दिसली की, त्यांना घरी आणणे, त्यांची देखभाल करणे असे सगळे त्याचे उद्योग. त्यामुळे निसर्गाप्रती काम करण्याची आवड लहानपणीच रुजलेली. पण, 'निसर्गाचे काम म्हणजे भिकेचे डोहाळे' अशी धारणाच त्याकाळात असल्याने, दादाला नोकरी करणे भाग होते.

 

अगदी महाविद्यालयीन वयापासून नोकरी करत तो शिक्षण पूर्ण करत होता. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर सूर्या वायर कंपनीत त्याने तीन वर्ष नोकरी केली. मात्र, निसर्गासाठी काहीतरी करण्याची सल मनाला खात होती. अखेरीस २००० मध्ये नोकरी सोडून आईवडिलांसह त्याने मुंबईला राम राम ठोकला. दापोलीतल्या समुद्रकिनाऱ्याच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य वेळास गावात हे कुटुंब स्थायिक झाले. या गावातील वडिलोपार्जित घरात ही मंडळी एकत्र कुटुंबपद्धतीत राहू लागली. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी दादाने नारळ-आंब्याची वाडी सांभाळली. त्यादरम्यान गावात दिसणाऱ्या पशुपक्ष्यांच्या जैवविविधतेचे निरीक्षण त्याने सुरू केले. २००२च्या दरम्यान वेळासच्या किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यापाशी त्याला एक दुचाकी दररोज उभी असलेली दिसे. चौकशी केल्यावर चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्गमित्र' संस्थेची काही माणसं किनाऱ्यावर कासव बघायला येत असल्याचं त्याला समजलं. तोपर्यंत आपल्या गावातल्या किनाऱ्यावर समुद्री कासवे येतात, याबाबत मोहनदादाही अनभिज्ञ होता आणि हीच कासवे पुढे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होणार असल्याची पुसटशीही कल्पना त्याला नव्हती.

 

त्या दुचाकीवर येणारे व्यक्ती होते, महाराष्ट्राच्या सागरी कासव संवर्धन मोहिमेचे प्रणेते भाऊ काटदरे. समुद्री कासव संवर्धन मोहिमेचे काम भाऊंनी २००२ पासून वेळासच्या किनाऱ्यापासून सुरू केले. गावातले गोपीनाथ महाडिक त्यांच्या मदतीला होतेच. मात्र, भाऊ गावातल्या शिकलेल्या आणि सचोटीने काम करणाऱ्या तरुणाच्या शोधात होते. गावात चौकशी केल्यानंतर बहुतांश लोकांनी मोहनदादाच्या दिशेनेच इशारा केला. 'कोणाच्या घरात जाण्यापूर्वी हा मुलगा पहिल्यांदा त्यांच्या गोठ्यात जाऊन गायी-गुरांना कुरवाळत बसतो, म्हणून काय ते प्राण्यांचे काम करण्यासाठी यालाच घ्या,' असे वेळासवासीयांचे म्हणणे. भाऊंनी विचारणा करताच दादा या कामासाठी तयार झाला. भाऊंनी त्यासाठी प्रतिमहिना काही पैसेही त्याला देऊ केले. मात्र, संवर्धनाचे काम शिकल्याशिवाय पैसे घेणार नाही, असा निर्णय दादाने घेतला. पुढे दोन वर्ष मन लावून त्याने हे काम शिकून घेतले. या कामाला वनविभागाचे सहकार्य मिळल्यानंतर दादाला प्रतिमहिना १५०० रुपये पगार मिळू लागला. मात्र, तोही तुटपुंजा असल्याने त्याने घरशिकवणी आणि बाणकोटमधील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवण्यास सुरुवात केली.

 

मात्र, कासव संवर्धन आणि महोत्सवाचा व्याप वाढल्यानंतर त्याने संपूर्णवेळ स्वत:ला या कामात झोकून दिले. गेल्या १४ वर्षांपासून तो कासवांच्या रक्षणासाठी काम करतोय. त्याचे वेळासमधील घर आज 'कासवांचे घर' म्हणून ओळखले जाते. संवर्धनाच्या कामाच्या सुरुवातीला सहा वर्ष त्याला किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या मादी कासवाचे दर्शन झाले नव्हते. आता मात्र दादा मादी अंडी घालण्यासाठी केव्हा येणार, हे अचूक सांगतो. गंमत म्हणजे त्याच दिवशी मादी किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी शंभर टक्के येतेच. कासव आणि त्याची घट्ट मैत्री झाल्याचा हा अनुभव आम्हीदेखील घेतलाय. शिस्त आणि नियमांच्या चौकटीत राहून कासव संवर्धनाचे काम करण्यासाठी तो ओळखला जातो. 'आज मी जो काही आहे, ते केवळ कासवांमुळे,' असे सांगून तो कासवांनी केलेल्या उपकारांची जाण आपल्याला करून देतो. भाऊ काटदरे आणि गोपीनाथ महाडिक यांचे ऋण कधीही न फेडण्यासारखे असल्याचे तो सांगतो. गेल्या दोन वर्षांपासून 'मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशन' मधील नोकरीचा त्याने आता राजीनामा दिला आहे; तोही केवळ पुन्हा झोकून निसर्ग संवर्धनाचे काम करण्यासाठी. अशा या निसर्गवेड्या अ वलियाला दै. 'मुंबई तरुण भारत'चा सलाम.

  

- अक्षय मांडवकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@