स्वहित साधताना कोणी देशहित विसरु नये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |


 

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

 

मुंबई : देशात कला, संगीत, साहित्याचे अस्तित्व आहे. परंतु, या सगळ्याच गोष्टींची प्रतिष्ठा तेव्हाच असेल जेव्हा भारताची जगात प्रतिष्ठा असेल. भारत आहे म्हणून आपण आहोत, भारत सुखी असेल तर आपण प्रतिष्ठित राहू. म्हणूनच स्वहित साधता साधता देशहिताला कोणीही विसरु नये, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कला, संगीत, नाट्य, साहित्य क्षेत्रात महनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे ७७ वे वर्ष होते. शिव येथील षण्मुखानंद सभागृहात बुधवार दि. २४ एप्रिल रोजी या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार प्रदान सोहळ्याला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वरील प्रतिपादन केले.

 

आजच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे आवर्जून उपस्थित होते. सरसंघचालकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन यावेळी शिवशाहिरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंचावर पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार यांच्यासह सर्व पुरस्कारार्थीही उपस्थित होते. विजयकुमार यांचेही यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व पुरस्कारार्थींनी आपले मनोगतही यावेळी व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी केले. आपल्या मनोगतात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, आज इथे पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या प्रत्येकाने पुरस्काराचे श्रेय स्वत:कडे न घेता आपल्या गुरुंना, कुटुंबियांना, सहकाऱ्यांना दिले, ही फार मोठी गोष्ट आहे. सगळेच पुरस्कारार्थी आपापल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर आहेत, परंतु त्यांना अगदी सहजपणे, नम्रपणे कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. म्हणूनच माझ्यामते माणूस जितका गुणवान असेल तितकाच तो नम्र झाला तर जगातले कित्येक तंटे आपोआप मिटतील. माणसाला अहंकाराचा वारा लागायला नको. तसे जर झाले आणि तुम्ही स्वत:ला सगळे काही समजते, अशा आविर्भावात वागू लागला की तुमचा विकास खुंटतो. म्हणूनच इथे व्यक्त केलेली कृतज्ञतेची, नम्रतेची भावना मोलाची आहे.

 

मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या कलाकृती या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या होत्या. मात्र त्यांनी आपल्या नाटकांतून, गायनातून केवळ मनोरंजनच केले नाही तर देशातील जनतेला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जागृतही केले. मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीचा झंग समाजाला कार्यप्रवृत्त करणारा, वीररस प्रवाहित करणारा होता, असे सांगत डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, असाच देशाप्रति काहीतरी करण्याचा भाव इथल्या प्रत्येक पुरस्कारार्थीनेही व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, आपण स्वत: गुणवान असणे महान नव्हे तर इतरांसाठी उपयोगी पडणे हीच खरी महानता आहे. विद्याविन असूनही ती देण्याची गोष्ट सर्वोत्तम आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या बलिदानाबाबत सरसंघचालक म्हणाले की, सीमेवर आपल्या देशाचे शूर सैनिक मोठ्या हिंमतीने अहोरात्र उभे आहेत आणि त्याचमुळे आज आपण इथे मोकळा श्वास घेऊ शकतो. आणीबाणीच्या, संकटाच्या प्रसंगी ज्यावेळी देण्यासारखे काहीही नसते तेव्हा हे सैनिक स्वत:चे प्राणही देतात, ही किती अलौकिक गोष्ट आहे. परंतु भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्.भगवद्गीतेत मुक्ती कोणाला मिळते याचे वर्णन करताना ती संन्याशाला आणि नंतर केवळ रणांगणावर धारातिर्थी पडणाऱ्या सैनिकालाच मिळते असे सांगितले. त्यामुळे आपल्या छतीवर गोळी झेलणाऱ्या प्रत्येकालाच स्वर्गप्राप्ती, ईश्वरप्राप्ती होते, यात कोणतीही शंका नाही.

 

 
 

आज आपल्या कार्यक्रमातून पुलवामात हौतात्म्य प्राप्त झालेल्यांना आर्थिक मदत देण्यात आली, पण या घटनेतून आपल्यालाही एक संदेश मिळतो. आपणही अशाप्रकारे देशसेवा करु शकतो, हे यातून समजते, असे सांगत डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, देशात कोणत्याही कलेचे, संगीताचे, साहित्याचे वा वैज्ञानिक संशोधनाचे अस्तित्व असले तरी त्याला प्रतिष्ठा भारताच्या अस्तित्वामुळेच मिळत असते. जर भारत सुखी असेल, प्रतिष्ठिक असेल तरच आपलीही पतप्रतिष्ठा राहिल, अन्यथा नाही. म्हणूनच स्वहित साधता साधता देशहिताकडे कधीही दुर्लक्ष करु नका, विसरु नका. कारण आपण जगात तार-दोन दिवस राहु पण आपल्या मातृभूमीचे वैभव मात्र अमर राहिले पाहिजे.

 

लतादीदींकडून पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांसाठी एक कोटी

 

पुलवामात दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी आजच्या कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर यांनी एक कोटी रुपयांची मदत सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार यांना प्रदान केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लतादीदी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने ह रक्कम उषा मंगेशकर यांच्या हस्ते विजय कुमार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. सोबतच अन्य कलाकार, सहकाऱ्यांकडून 18 लाखांची मदतही यांवेळी हुतात्म्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@