होय, डासांचा नायनाट होऊ शकतो!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019   
Total Views |



 

डास हा कीटक आज जागतिक समस्या बनली आहे. यामुळे जगभरात लाखो लोक मलेरिया, डेंग्यू, पीतज्वर आणि चिकुनगुनिया सारख्या आजारांना बळी पडतात. या आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच अनेक देश आपापल्या पातळीवर प्रयत्नशील आहेत.

 

आज २५ एप्रिल म्हणजेच ‘जागतिक मलेरिया दिन.’ जगभरात डेंग्यू आणि मलेरियाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने ‘युनिसेफ’ने २५ एप्रिल, २००८ पासून ‘जागतिक मलेरिया दिना’ची सुरुवात केली. डेंग्यू-मलेरियाने जगभरात भयंकर असे रूप धारण केले असून यामुळे दरवर्षी लाखो नागरिक या आजारांना बळी पडतात. जगातील एकूण प्राण्यांमुळे वर्षभरात जेवढ्या व्यक्तींचा मृत्यू होत नाही, त्यापेक्षा अधिक लोकांना डासांमुळे आपला जीव गमवावा लागतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, १०६ देशांमध्ये डेंग्यू-मलेरियाचा प्रभाव असून यामुळे वर्षभरात तब्बल ५० लाख लोक बाधित होत असतात. या बाधित रुग्णांपैकी जवळपास २० लाखांपेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. सर्वाधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे, याचा सर्वाधिक परिणाम पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांवर होताना आढळतो. एका अभ्यासानुसार, प्रत्येक मिनिटाला जगातील दोन बालकांचा मृत्यू डासांपासून फैलावणाऱ्या आजारांमुळे होतो.

 

डास हा कीटक आज जागतिक समस्या बनली आहे. यामुळे जगभरात लाखो लोक मलेरिया, डेंग्यू, पीतज्वर आणि चिकुनगुनिया सारख्या आजारांना बळी पडतात. या आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच अनेक देश आपापल्या पातळीवर प्रयत्नशील आहेत. नुकतेच मलावी या आफ्रिकेतील देशात जगातील पहिला डोस (मलेरिया व्हॅक्सिन) तयार करण्यात आला आहे. यावर मागील तीस वर्षांपासून संशोधन चालू होते. अशाप्रकारचे अनेक प्रयत्न जगभरातील अनेक देश आपापल्या परीने करत आहेत. अशाच प्रकारचा प्रयत्न गुगलनेही केला आहे. मलेरियासारखे आजार पसरविणाऱ्या डासांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चक्क नवीन डास तयार करण्याची कल्पना गुगलची एक कंपनी ‘अल्फाबेट’ने प्रत्यक्षात आणली आहे. गुगलची ही आयडियाची कल्पना कदाचित तुम्हाला धक्कादायक वाटू शकते, यावर मतमतांतरही होऊ शकते. पण, ‘अल्फाबेट’च्या या प्रयोगात तब्बल ९५ टक्के डासांचा नायनाट करण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. ‘अल्फाबेट’ने कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्नो या शहरात डासांचा नायनाट करण्यासाठी २०१७ पासून ‘वेरेली’ संशोधन प्रकल्प सुरू केला होता. ‘डीबग प्रोजेक्ट’ असे या प्रकल्पाला नाव देण्यात आले. या प्रकल्पांतर्गत एका प्रयोगशाळेत डासांची निर्मिती केली जायची. या नवीन डासांची निर्मिती करतेवेळी डासांमध्ये ‘वोल्बाशिया’ नावाचा जिवाणू सोडला जायचा. त्यानंतर प्रयोगशाळेत तयार केलेले दीड कोटी डास एका ठराविक क्षेत्रात सहा महिन्यांसाठी सोडण्यात आले. मर्यादित क्षेत्रात ‘वोल्बाशिया’ सहित नर डास सोडल्यानंतर हे नर डास मादी डासांशी संबंध ठेवत. या दोन्ही नर-मादीचे संबंध आल्यानंतर ‘वोल्बाशिया’ हे जिवाणू थेट या मादी डासांच्या प्रजनन क्षमतेवरच परिणाम करू लागली. यामुळे या मादी डासांच्या प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम झाला व नवीन डासांची पैदास पूर्णपणे थांबली. येथील डासांच्या नवीन पिढीचा पूर्णपणे नायनाट होत नाही, तोपर्यंत ‘अल्फाबेट’ने हा प्रयोग चालू ठेवला होता. प्रयोगानंतर दोन तृतीयांश मादी डासांची प्रजनन क्षमता पूर्णपणे नाहीशी झाली आणि एकूण डासांच्या संख्येपैकी तब्बल ९५ टक्के डासांचा नायनाट करण्यात त्यांना यश मिळाले.

 

जगभरातून डासांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गुगलची ‘अल्फाबेट’ ही कंपनी उत्सुक आहे. यासाठी गुगलने एका आरोग्य प्रमुखाची नियुक्तीदेखील केली आहे. जगभरातील अनेक व्यापारी आणि सरकार हा प्रकल्प राबविण्यासाठी तयार आहेत. “आम्ही जगभरात हा प्रकल्प राबविण्यासाठी उत्सुक असून जगभरातील लाखो लोकांना स्वस्थ जीवन देण्यासाठी आम्ही मदत करू शकतो, असे गुगलने ‘डीबग प्रोजेक्ट’ या आपल्या ब्लॉगवर सांगितले आहे. जगातील सर्वात भयंकर अशा डासांपासून जनसामान्यांची सुटका करण्यासाठी गुगल पुढे सरसावले असून जगभरातून त्यांच्या या प्रकल्पासाठी मागणी होऊ लागली आहे; एवढंच नाही तर तुम्हीदेखील या प्रकल्पात सहभागी होऊ शकता. त्यामुळे आता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डासांपासून लोकांची कायमची सुटका होईल, अशी मलेरिया दिनाच्या दिवशी आशा बाळगायला हरकत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@