हाँ, मै हूँ माफीवीर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |




आज खराखुरा ‘माफीवीर’ झालेले राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या कोठडीतून सुटकेसाठी ब्रिटिशांची माफी मागितल्याचा दावा करत आले. आपल्या मालकानेच सावरकरांना ‘माफीवीर’ म्हटल्याने गांधी-नेहरू घराण्याची थुंकी झेलण्यासाठी आसुसलेल्या राहुल गांधींच्या चमच्यांनाही मग चांगलाच चेव चढत असे.

 

कोण कशाने उत्तेजित होईल, हे काही सांगता येत नाही; कोणी मदिरेने, तर कोणी मदिराक्षीने! काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र आपण निवडणुकांची ‘गर्मी’ पाहून उत्तेजित झाल्याचे म्हणत त्यातूनच ‘चौकीदार चोर है’ चा आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या नावावर खपवल्याचे मान्य केले. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार केल्याचे न्यायालयाला पटल्यानेच चोरीच्या दस्तऐवजांवर सुनावणी होणार असल्याचे राहुल गांधींचे म्हणणे होते. सार्वजनिक सभांतून, जनसंवादातून देशातच नव्हे, तर परदेशातही मी ‘चौकीदार चोर है, चौकीदार चोर है’ चा घसा फाडून केलेला आरोप आता न्यायालयाने स्वीकारला असून नरेंद्र मोदींना शिक्षा होणेच तेवढे बाकी आहे, असा राहुल गांधींच्या भाषणाचा एकंदर सूर होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या कागदपत्रे दाखल करून घेण्याच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून त्याचा राजकीय हेतूने वापर करणाऱ्या राहुल गांधींविरोधात न्यायालयीन अवमानाचा गुन्हा दाखल केला गेला आणि राहुल गांधींची पाचावर धारण बसली. एकवेळ कोण्या नेत्याच्या वा पक्षाच्या नावाने केलेला भामटेपणा सहनही केला जाईल, पण थेट न्यायालयाच्याच नावाने मोदींविरोधात बोंबा ठोकल्या तर सहा महिने कारावासाची आणि आर्थिक दंडाची शिक्षा भोगावी लागेल, हे राहुल गांधींच्या लक्षात आले. परिणामी, ऐन निवडणुकीच्या हंगामात काँग्रेसचा एकमेव मसिहा गजाआड गेला, तर तोळामासा झालेल्या पक्षाचे काय होईल, या भयाने राहुल गांधींसह इतरांच्याही पायाखालची वाळू सरकली अन् हे होऊ नये म्हणून राहुल गांधींना आज सर्वोच्च न्यायालयापुढे हात जोडत, नाक रगडत माफी मागावी लागली, होय माफीच! अशाप्रकारे राहुल गांधींनी आपल्यामागे ‘पप्पू’, ‘बुद्धू’ याप्रमाणेच ‘माफीवीर’ हे बिरुदही सर्वोच्च न्यायालयाच्या सहीशिक्क्यानिशी रितसरपणे लावून घेतले.

 

राहुल गांधींच्या आजच्या माफीनाम्यावरून काव्यगत किंवा नियतीचा ‘न्याय’ झाल्याचेही म्हटले जाते, त्याला कारणही तसेच आहे. आज खराखुरा ‘माफीवीर’ झालेले राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या कोठडीतून सुटकेसाठी ब्रिटिशांची माफी मागितल्याचा दावा करत आले. आपल्या मालकानेच सावरकरांना ‘माफीवीर’ म्हटल्याने गांधी-नेहरू घराण्याची थुंकी झेलण्यासाठी आसुसलेल्या राहुल गांधींच्या चमच्यांनाही मग चांगलाच चेव चढत असे. म्हणूनच गल्लीतल्या चिरकुटांपासून ते दिल्लीतल्या फुटक्या मण्याच्या तोंडातूनही सावरकरांचा अश्लाघ्य शब्दांत अवमान करण्याची चढाओढ लागल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसीच नव्हे, तर नेहरू-गांधी घराण्याने फेकलेल्या चतकोर-अर्धकोर तुकड्यांवर पोसलेल्या आशाळभूत रमणेबाजांनीही मग आपली पात्रता विसरून स्वा. सावरकरांना दर्जाहीन ठरवण्यासाठी असलेली-नसलेली बुद्धी पणाला लावली. वृत्तपत्रे, मासिके आणि संकेतस्थळांवर शब्दांचे बुडबुडे सोडून सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याची थेरं या लोकांनी सांगितली. परंतु, पप्पूच्या बिनडोकपणाला भुलून त्याला डोक्यावर घेणाऱ्यांनी आणि स्वतः राहुलनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांना कमी लेखण्याचे कितीही प्रयत्न केले तरी सावरकरांचे तेज अधिकाधिकच देदीप्यमान होत राहिले. राहुल गांधींच्या पणजोबांच्या नावाने चालू असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र सुरू होत असल्याचे वृत्त ही त्याचीच साक्ष. पण राहुल गांधींचे काय? गांधी घराण्याचा कर्तृत्ववान चिराग असलेल्या राहुलच्या बदमाशीला सोन्याचा मुलामा चढविणाऱ्या गुलामांची काँग्रेसमध्ये अजिबात कमतरता नाही. राहुल गांधी असे, राहुल गांधी तसे,’ म्हणत लाळघोटेपणा करणाऱ्यांनी आता राहुलच्या माफीचाही उत्सव साजरा करावा. कारण, बड्या घरातल्या बालिश पोराने केलेली कोणतीही कृती कौतुकास्पदच असते ना? परिणामी, येत्या काही दिवसांत काँग्रेस मुख्यालयात किंवा इटलीत कोणी ‘माफीवीर’ राहुल गांधींच्या नावाने ‘माफी कशी मागावी,’ शीर्षकाने दोन-पाच रुपयांत एखादे पुस्तक विकत बसले तरी आश्चर्य वाटणार नाही!

 

दुसरीकडे स्वातंत्र्यापासून वर्षानुवर्षे सत्ता बळकावून बसलेल्या गांधी घराण्याला २०१४ साली नरेंद्र मोदींसारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाने तगडा झटका देत ४४ जागांवर आणले. सोबतच गेल्या पाच वर्षांत आपल्या कारभाराने देशातल्या जनतेचे मन जिंकले तर भ्रष्टाचाऱ्यांना, लाचखोरांना, दलालांना पळता भुई थोडी केली. कालपरवा मध्य प्रदेशात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तिथल्या कमलनाथ सरकारने केवळ तीन महिन्यांत गर्भवती महिलांच्या, लहान बालकांच्या पोषण आहारासाठीच्या पैशांना ओरबाडत घरे भरल्याचे समोर आले. ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा’ची शपथ घेतलेल्या नरेंद्र मोदींचे नेमके काय करायचे, असा प्रश्न या सगळ्या प्रकारामुळे राहुल गांधी आणि टोळक्याला पडला. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल विमानांच्या खरेदीत गोलमाल केल्याचा खोटारडा आरोप राहुल गांधींसह त्यांच्या चेल्याचपाट्यांनी सुरू केला. प्रत्येक सभेत मोदींना ‘चोर’ म्हणण्याचा मानसिक आजारच जणू काही राहुल गांधींना जडला. आज मात्र सर्वोच्च न्यायालयात मागितलेल्या माफीतून राहुल गांधींसह सारा काँग्रेस पक्ष अन् त्यांच्या जोरावर उड्या मारणारे कच्चे-बच्चेही तोंडावर आपटले. राहुलना पंतप्रधानपदी बसविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांपुढे दिवसा तारे चमकू लागले. हीच मंडळी राहुलने केलेल्या आरोपांना आपल्या विधानांतून, वक्तव्यांतून फडकावत असत. कोणी कोणी तर राहुल गांधी जणू काही देव, देवाचा अवतार असल्याचेही आरडाओरडा करून सांगत असत. ल्युटियन्स दिल्लीत तर राहुल गांधींचे किती गुणगौरव करू अन् किती नको, असे झाले होते. परंतु, या सगळ्याच लोकांचे दुर्दैव असे की जिला भरवशाची म्हैस म्हणत होते तिलाच टोणगा झाला! अर्थात, खोट्याच्या पायावर केवळ मोदीद्वेषापोटीच आरोपांची राळ उडविणाऱ्यांची अशीच दयनीय अवस्था होणार म्हणा!

 

हे झाले राहुल गांधींच्या माफीबद्दल, पण ज्याला देशाचा पंतप्रधान व्हावेसे वाटते, तो इसम राष्ट्रीय सुरक्षेच्या गंभीर मुद्द्यावरही किती छछोरपणे व्यक्त होऊ शकतो, हेही सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधी एकदा पराभूत करतो, असे झालेल्या राहुल गांधींनी देशातल्या १३० कोटी जनतेला राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून भ्रमित करण्याचा उद्योग केला. म्हणजेच स्वतःचा, स्वतःच्या पक्षाचा थोडाफार राजकीय फायदा व्हावा म्हणून हे लोक कोणत्या थरास जाऊ शकतात, त्याचा नमुनाच यातून दिसला. उल्लेखनीय म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेसने हा कारनामा केला तो सत्तेवर नसताना, विरोधात असताना. पण, हे लोक ज्यावेळी सत्तेत असतील तेव्हा, त्यांनी काय काय केले असेल, याची कल्पनाही करवत नाही. हिंदू दहशतवादाच्या आरोपातून पाकपुरस्कृत इस्लामी दहशतवादावर पांघरुण घालण्याचा प्रकार तर गेल्या १० वर्षांतलाच! आपल्या डोक्यावरचा सत्तेचा मुकुट जाऊ नये म्हणून गांधी घराण्याने अजूनही काही कृत्ये नक्कीच केली असतील. रशियाच्या केजीबी गुप्तहेर संस्थेच्या वासिली मित्रोखीन याने इंदिरा गांधींच्या कार्यकाळात भारतात पेरलेल्या हस्तकांचे वर्णन आपल्या पुस्तकात केलेलेच आहे, तर मणिशंकर अय्यर यांनी मोदींना सत्तेतून हटविण्यासाठी थेट पाकिस्तानची मदत घेण्याचा विचार करण्यापर्यंतही मजल मारली होती. आता राहुल गांधी राफेल विमान व्यवहारावरून नेमकी कोणाची मदत करत आहेत की, कोणाच्या प्रभावाखाली येऊन भलते-सलते आरोप करत आहेत, हेही समोर आले पाहिजे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@