पायांनी विमान उडविणारी जेसिका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019   
Total Views |




हात नसतानाही आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न जेसिका कॉक्सने पाहिले अन् ते साकारही केले. जेसिकाच्या धैर्याचा आणि जिद्दीचा हा विस्मयकारक प्रवास...

 

आपल्या हाताला जरासे कुठे खरचटले तरी दैनंदिन कामे करताना अडथळा निर्माण होतो. जर एका हाताला काही दुखापत झाली असेल आणि दुसरा हात बरा असेल तरी लाचारी पत्करावी लागते.पण, एखाद्या व्यक्तीला दोन्ही हात जन्मतःच नसतील तर... त्या व्यक्तीला किती संकटांचा सामना करावा लागत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. काही कामं दोन्ही हात असूनही अगदी कौशल्यपूर्वक आजही करता येत नाहीत. परंतु, हात नसतानाही एका व्यक्तीने गगनाला गवसणी घातली आहे. तिचे नाव आहे जेसिका कॉक्स...

 

अमेरिकेतील जेसिका कॉक्स ही जगातील पहिली आणि एकुलती एक खांदेविहीन वैमानिक आहे. जेसिका चक्क तिच्या पायांनी विमान उडवते. या पराक्रमासाठीच तिचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात आले आहे. जेसिकाचा जन्म १८८३ मध्ये अमेरिकेतील अ‍ॅरिझोनामध्ये झाला. जन्मत:च तिला हात नव्हते. अशाप्रकारे तिचा जन्म कसा झाला, याचे उत्तर डॉक्टरांकडेही नव्हते. कारण, प्रसूतीपूर्व चाचण्यांमध्ये गर्भात कुठलाही दोष दिसून आला नाही. पण, आता डॉक्टर आणि जेसिकाचे पालक काहीही करू शकत नव्हते. जेसिका दिव्यांग असली तरी तिनेही सामान्य मुलांसारखे आयुष्य जगावे, अशी तिच्या पालकांची इच्छा होती. त्यामुळे विशेष शाळेत किंवा खाजगी शाळेत प्रवेश न घेता जेसिकाने नियमित शाळेतच शिक्षण घेतले. इतर मुले जसे आपले बालपण जगतात, तसेच जेसिकाही जगली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जेसिकाला हात नाहीत, तर ती आपली दैनंदिन कामे कशी करते? जेसिका ही सर्व कामे आपल्या दोन पायांनी करते. सुरुवातीला तिने कृत्रिम हातांचा वापर केला खरा. परंतु, कृत्रिम हातांमुळे ती अस्वस्थ होती. त्यामुळे जेसिकाने शपथ घेतली की, ती पुन्हा हे हात वापरणार नाही. ११ वर्षांची झाल्यावर तिने कृत्रिम हातांना दूर केले आणि सर्व कामे ती पायांनीच करू लागली.

 

जेसिका सांगते की, “सामान्यपणे जेव्हा लोकं माझ्याकडे पाहतात, तेव्हा त्यांना वाटते की, माझे आयुष्य किती मर्यादित आहे. हिला कुठे जाता येत नसेल, काही करता येत नसेल. पण त्यांचा हा अंदाज मी खोटा ठरवला.” कारण, जेव्हा जेसिका तीन वर्षांची होती, तेव्हापासून ती जिम्नॅस्टिकशी जोडली गेली. सहाव्या वर्षी ती नृत्य करायला लागली. सामान्य व्यक्ती जो जो विचार करतो, ते ते सर्व काम जेसिका आज आपल्या पायांच्या जोरावर करू शकते. ती लहान असताना तिला इतर मुलांप्रमाणे खेळ किंवा इतर गोष्टींचा आनंद घेता यावा, यासाठी तिचे पालक प्रयत्नशील असायचे. पण, जेव्हा मैदानात इतर मुले मंकीबारवर चढायचे, तेव्हा तिला चढता यायचे नाही. तिला केवळ झोका घेता यायचा. तिला वाटायचे की, ती एका परीप्रमाणे गगनात भरारी घेईल आणि जगाची सुंदरता अनुभवेल. तिच्या सोबतच्या मुलांनाही ती आकाश किती सुंदर आहे, हे दाखवायची. पण, एक दिवस असा आला की जेव्हा तिनेही आकाशात भरारी घेतली. माजी लढाऊ वैमानिक रॉबिन स्टोडार्ड ‘राईट फ्लाईट’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवित होते. त्यांनी जेसिकाला विमान चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या एका संस्थेने शिष्यवृत्ती दिली, तसेच तिचे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार करण्यास मदतही केली.

 

जेसिका वयाच्या तब्बल २२व्या वर्षी विमान उडवायला शिकली आणि केवळ तीन वर्षांत तिला अधिकृत परवानाही मिळाला. जेसिका ही तायक्वांडोमधील ब्लॅक बेल्टधारक असून, जगातील ती पहिली ‘आर्मलेस ब्लॅकबेल्ट’ धारक आहे. जेसिका तिच्या पायांचा वापर हातांप्रमाणेच करते. ती पायांच्या मदतीने कार चालवते, गॅस भरते, डोळ्यांच्या लेन्सेस लावते, स्कूबा डायविंग करते आणि कीबोर्डवर पायांनीच टंकलेखनसुद्धा करते. आश्चर्याची बाब म्हणजे, तिचा टंकलेखनाचा वेग हा मिनिटाला २४ शब्द इतका आहे. काही वर्षांपूर्वी जेसिकाची भेट पेट्रिकशी झाली. दोघांनाही तायक्वांडोचे विशेष आकर्षण होते. दोघांचे प्रेमही जुळून आले आणि ३६ वर्षीय जेसिकाने पेट्रिकशी लग्नगाठी बांधली. पॅट्रिकने जसिकाला ती जशी आहे तसे स्वीकार केले आणि जेसिकाच्या पायातचवेडिंग रिंग’ घालून आपल्या प्रेमाला एक मूर्त रुप दिले.जेसिकाच्या या प्रवासात पेट्रिकचाही मोलाचा वाटा आहे, असे ती आवर्जून सांगते. ती म्हणते, “हे सर्व सोपे नव्हते. कित्येक गोष्टी करताना अडचणी येत होत्या. विशेषत: कपडे घालताना जास्त कष्ट घ्यावे लागत होते. परंतु, पेट्रिकशी भेट झाल्यानंतर या गोष्टी आपोआप सोप्या झाल्या,” असे ती सांगते.

 

२००८ मध्ये वैमानिकाचा परवाना घेऊन जेसिकाने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ला आपली दखल घ्यायला लावली. जेसिका केवळ एक उत्तम वैमानिक नसून ती एक उत्तम वक्ताही आहे.जेसिका पेट्रिकसोबत जगभरात विविध ठिकाणी जाऊन दिव्यांगांच्या समस्यांविषयी जनजागृतीही करते. जेसिका आणि पेट्रिकचे मत आहे की, अजूनही शारीरिक रूपाने अपंग असलेल्या दिव्यांग व्यक्तींकडे समाजात दयेच्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे हा विचार बदलण्याची गरज आहे. म्हणून जेसिका जगभर प्रेरणादायी व्याख्याने देत असते. जेसिकाच्या हिमतीला आणि जिद्दीला सलाम करावा, असेच तिचे संपन्न, स्वछंद जिणे...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@