आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी नाहीत - पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019
Total Views |



चित्तोडगड/पाटण :पाकिस्तान वारंवार भारताला युद्धाची आणि अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देत असतो. त्यांच्याजवळ अणुबॉम्ब आहे, तर मग आमच्याकडे असलेला काय आहे? आम्ही काय आमचा अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवला आहे काय?,” असे स्पष्ट करताना, “विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना जर पाकिस्तानने सुखरूप मुक्त केले नसते, तर ती रात्र पाकिस्तानसाठी काळरात्र ठरली असती,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यावेळच्या सज्जतेविषयीची माहिती दिली.

 

“समुद्र, पृथ्वी आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणांवरून अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता भारताकडे आहे,” असे मोदी यांनी राजस्थानच्या चित्तोडगड येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना सांगितले. “विरोधक गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवरील हल्ले करीत आहेत, मी ते सहन करू शकतो, पण देशावर झालेला एकही हल्ला कदापि सहन होणार नाही. याची जाणीव आता देशवासीयांनाही झालेली आहे,” असे मोदी यांनी या सभेत स्पष्ट केले. “नव्या भारताची बांधणी करण्याची जबाबदारी नवमतदारांनाच पार पाडायची आहे,” असे सांगताना त्यांनी काँग्रेसवरही हल्ला केला. “काँग्रेसने आतापर्यंत केवळ एकाच घराण्याचे हित जोपासले आहे. भ्रष्टाचार आणि खोटी वचने या पक्षाच्या डीएनएचा भाग आहे,” असा आरोप त्यांनी केला.

 

पाकिस्तानला तसा इशाराच होता!

 

तत्पूर्वी गुजरातच्या पाटण येथील सभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “पाकिस्तानचे ‘एफ-16’ विमान पाडल्यानंतर या देशाच्या हद्दीत पॅराशूटच्या मदतीने उतरलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना धक्का जरी लावला, तरी गंभीर परिणाम होतील, असा कडक इशाराच मी पाकिस्तान सरकारला दिला होता. त्यामुळेच आपला वैमानिक अवघ्या 48 तासांमध्ये सुरक्षित मायदेशी परतला.

 

अभिनंदन यांनी पाकिस्तानचे विमान पाडले आणि त्यानंतर त्यांच्याही विमानाला अपघात झाला. ते गुलाम काश्मिरात पोहोचले. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर लगेच आपल्या देशातील विरोधकांनी, या मुद्द्यावरून माझी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पत्रपरिषद घेतली आणि पाकिस्तानला खणखणीत इशारा पाठविला. आमच्या वैमानिकाला थोडे खरचटले तरी, त्यानंतर तुम्ही जगाकडे, ‘मोदींनी असे केले, मोदींनी तसे केले’ असे रडगाणे गात फिराल. पाकिस्तानला त्या इशार्‍यातील गंभीरता समजली आणि लगेच अभिनंदन यांची मुक्तता करण्याची घोषणा या देशाचे पंतप्रधान इमरान खान यांनी केली.”

 

अभिनंदन मुक्त होण्याच्या एक दिवस आधी अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, “मोदी यांनी 12 क्षेपणास्त्रे सज्ज ठेवली असून, ते मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत. यामुळे स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. पाकिस्तान सरकारने एकूणच गंभीर्य ओळखले आणि अभिनंदन यांना मुक्त केले, याकडे पंतप्रधानांकडे लक्ष वेधले.

 

पुन्हा सर्व 26 जागा द्या!

 

गुजरात हे माझे गृहराज्य आहे आणि मी तुमचाच आहे, या भूमीचा पुत्र आहे. त्यामुळे या राज्यातील एकही जागा अन्य पक्षाला जायला नको, सर्व 26 जागा फक्त भाजपलाच मिळायल्या हव्या, याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. 2014 च्या निवडणुकीत तुम्ही जे केले, तेच यावेळीही करायचे आहे,” असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

 

शरद पवारांवरही चढवला हल्ला

 

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. “नरेंद्र मोदी यांचे पुढचे पाऊल काय असू शकते, याचा अंदाज मलादेखील नसतो,” असे पवार यांनी मान्य केले आहे. मी त्यांना इतकेच विचारतो की,” मोदी काय करणार हे पवारानांच माहीत नसते तर, मग पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कसे कळणार?”, असा चिमटा मोदी यांनी काढला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@