फुलपाखरांचे मराठीत बारसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019
Total Views |


फुलपाखरांच्या मराठी नावांची संभाव्य यादी जाहीर ; सूचनांसाठी विनंती

 
निसर्गात मुक्तछंदाने बागडणारी फुलपाखरे नेहमीच आपल्या मनाचा ठाव घेतात. या फुलपाखरांचे आता मराठीत बारसे होणार आहे. आजवर भारतातील सर्वच फुलपाखरांना लॅटिन भाषेतील शास्त्रीय आणि इंग्रजीतील सामान्य नावाने ओळखले जात होते. आता मात्र ‘महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा’च्यावतीने सुमारे २८४ प्रजातींच्या फुलपाखरांना मराठीत नावे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठी नावांची ही संभाव्य यादी मंडळाने जाहीर केली असून, सर्वसामान्य आणि तज्ज्ञ मंडळींच्या सूचनांसाठी ती खुली करण्यात आली आहे. या सूचनांनंतर फुलपाखरांचे अधिकृतपणे मराठीत बारसे होणार आहे.
 

भारत हा फुलपाखरांच्या जैवविविधतेने संपन्न असा देश आहे. जगाच्या तुलनेत भारताच्या दोन टक्के भूभागावर तब्बल ११ टक्यांपेक्षा अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळत असून त्यांची संख्या १५०० एवढी आहे. यापैकी महाराष्ट्रामध्ये सुमारे २८५ प्रजातींच्या फुलपाखरांचा वावर आहे. फुलपाखरू हा कीटक इतका छोटा आहे की, ‘अलेक्झांड्रा बर्डिवग’ (२५० मिमी) हा त्यांच्यातला सगळ्यात मोठा जीव, तर ‘ग्रास ज्वेल’ (१४ मिमी) हे सर्वात छोटे फुलपाखरू आहे. देशातील दोन ठिकाणं फुलपाखरांच्या वैविध्याच्या दृष्टीने गर्भश्रीमंत आहेत. एक म्हणजे हिमालय-उत्तर पूर्वेकडील राज्ये आणि दुसरे म्हणजे सुमारे १ हजार, ६०० किमी विस्तृत लांबीचा पश्चिम घाट. केवळ पश्चिम घाटात फुलपाखरांच्या ३३४ इतक्या प्रजाती अढळतात. विशेष म्हणजे त्यातील ११ प्रजाती फक्त पश्चिम घाटामध्ये सापडतात. या घाटांमध्ये आढळणारी फुलपाखरे सह्याद्रीत काही ठिकाणी दिसतात. यातील महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि त्याचा आसपासचा परिसर. राज्यात फुलपाखरांचा वावरदेखील जंगलांच्या पद्धतीनुसार बदलता आहे. उदाहरणार्थ, आंबोलीच्या सदाहरित जंगलांमध्ये ‘सदर्न बर्डिवग’ हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरु आढळते. मात्र, ते इतरत्र कुठे दिसणार नाही. तसेच विदर्भातील रखरखीत जंगलात ‘क्रिमसन टिप,’ ‘लिटील ऑरेंज टिप,’ ‘स्पॉटेड पीआरओ’ ही फुलपाखरे दिसतील.

 
 

फुलपाखरांचे जीवन

फुलपाखरांचे जीवनचक्र अंडी, अळी, कोश आणि प्रौढत्व या स्वरूपाचे असते. नर हा आयुष्यात दोन ते चार वेळा समागमाची प्रक्रिया करतो, तर मादी तिच्या आयुष्यात एकदाच विणीवर येते. कोशातून बाहेर पडलेल्या मादीच्या पोटात अंड्यांचे अस्तिव असते. मात्र, ती परिपक्व झालेली नसतात. तिने नराशी समागम केल्यानंतर अंडी फलित होतात. त्यानंतर मादी अंड्यांना पानावर सोडते. अंड्यावर चिकट स्त्राव असल्याने ती पानावर चिकटून राहतात. काही माद्या एकच अंडं घालतात, तर काही अनेक. शिवाय ही अंडी वेगवेगळ्या झाडांवरदेखील घातली जातात. फुलपाखरांमध्ये ‘पालकत्व’ हा प्रकार नाही. त्यामुळे अंड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही निसर्गावरच असते. अंड्यांच्या आत अळी विकसित झाल्यानंतर ती अंड्याचे पुढील आवरण फोडून बाहेर पडते. कोशात जाण्यापूर्वी अळी योग्य सुरक्षित जागेचा ठावठिकाणा घेते. रेशमाचे धागे विणून ती जागा सुरक्षित करून घेते. पतंगाइतके रेशीम फुलपाखरांकडे नसते. कोशातून फुलपाखरू बाहेर पडण्याची प्रक्रिया साधारण पहाटेच्या वेळी होते. कोशातून बाहेर पडल्यानंतर साधारण १२ ते १५ दिवसांमध्ये त्याचे नवीन अवयव विकसित होतात. फुलपाखराचे आयुष्य हे किमान दोन आठवड्यांपासून जास्तीत जास्त सुमारे दोन महिने असते.

 

फुलपाखरे का महत्त्वाची ?

फुलपाखरांच्या अळ्या या अनेक पक्ष्यांच्या खाद्य असतात. विणीच्या हंगामातील पक्ष्यांना प्रथिनयुक्त अन्नाची गरज असते. त्यामुळे अळी या अन्नाची गरज भागवते. फुलपाखरांचा दुसरा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे परागीभवन. फुलपाखराला जगण्यासाठी अनेक घटकांची गरज असते. अगदी मांसाहारी प्राण्यांच्या विष्ठेपासून ते रुईच्या विषारी चिकापर्यंत विविध घटकांचा वापर फुलपाखरे करतात.

 
 
फुलपाखरांची गंमतीशीर नावे
 
भारतात आढळणाऱ्या फुलपाखरांचा अभ्यास हा स्वातंत्र्यापूर्वी झाला. यामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. फुलपाखरांचे रंग, रूप, आकार, रचना, अधिवास किंवा संशोधनकर्त्याच्या नावांवरून त्यांची इंग्रजी नावे ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, काही नावे ही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हुद्द्यांनुसार म्हणजेच कमांडर, सार्जंट, लास्कर, काऊंट, ड्युक, सेलक अशी ठेवण्यात आली. काही नावे पौराणिक कथांमधील पात्रांच्या आधारे ठेवली गेली. उदाहरणार्थ ग्रीक राजाच्या अंगवस्त्राचे नाव ‘जेझबेल’ असे होते. त्यानुसार एका फुलपाखराचे नावे ‘जेझबेल’ असे ठेवण्यात आले. ‘मॉर्मन’ हादेखील अशाच एका ग्रीक कथेतील नायक, ज्याला अनेक नायिका असातात. त्यावरून ‘मॉर्मन’ या फुलपाखराचे नाव ठेवण्यात आले. जो तीन रंगांच्या मादी फुलपाखरांशी समागम करतो. महाराष्ट्रात सापडणाऱ्या सर्वच फुलपाखरांना मराठमोळी नावे देण्याच्या उद्देशाने राज्य जैवविविधता मंडळाने एका समितीचे गठन केले आहे. 
यामध्ये मंडळाचे अध्यक्ष डाॅ. विलास बर्डेकर, डाॅ. जयंत वडतकर, दिवाकर ठोंबरे, हेमंत ओगले आणि डाॅ. राजू कसांबे यांच्या समावेश आहे. पक्ष्यांप्रमाणेच फुलपाखरांची नावे मराठीत असतील, तर ती उच्चारण्यास अधिक सोपी आणि त्याबद्दल आपुलकी निर्माण होईल. या उद्देशाने फुलपाखरांचे मराठीत बारसे करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आता मराठी नावांची ही संभाव्य यादी पूर्ण झाली आहे. अभ्यासक आणि निसर्गप्रेमी यांना ही यादी पाठवून सर्वांची मते/सूचना जाणून घेतल्यानंतर या यादीस अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
 
 

 
 

सूचना कुठे नोंदवाल ?

फुलपाखरांच्या मराठी नावांची संभाव्य यादी मंडळाच्या http://maharashtrabiodiversityboard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर गेल्यास 'Research and Documentation' मध्ये जाऊन 'Download' वर क्लिक केल्यास ही यादी आपल्याला दिसेल. या यादीतील नावांवर आपले विचार-सूचना [email protected] या ई-मेलवर ११ मे, २०१९ पर्यंत पाठवाव्यात. एखाद्या फुलपाखराला सुचवलेल्या नावापेक्षा वेगळे नाव आपल्याला सुचवायचे असल्यास, त्या नावाचादेखील विचार करण्यात येणार आहे. 

 

 
 
 


वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@