राहुल गांधी की राऊल विन्सी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019
Total Views |



आता राहुल गांधींना की (राऊल विन्सी?) घुसखोरीचा निकष लागू होत नसला तरी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा नक्कीच लागू होतो. म्हणूनच त्यांना खोटी माहिती सादर करण्यावरून निवडणूक लढविण्यापासून रोखण्याचा निर्णय अमेठीतील निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही.

 

व्यक्तीला आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत, हे सांगण्यासाठी दोन दिवस लागतात, तो इसम देशाच्या पंतप्रधानपदी बसावा; असे वाटणाऱ्यांची इथे अजिबात कमतरता नाही. मुद्दा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा असून अमेठी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी केलेला खोटारडेपणा पकडला गेला. अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांनी राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या चुकीच्या माहितीवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. परिणामी राहुल गांधींच्या लढतीवरच अपात्रतेची तलवार टांगली गेली. राहुल गांधींनी लिखित स्वरूपात सांगितलेल्या माहितीवरून त्यांची केंब्रिज विद्यापीठातील एम. फीलची पदवी बोगस असल्याचा आणि ते भारतीय नागरिक नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. कारण राहुल गांधींच्या एम. फील पदवी प्रमाणपत्रावर राहुल गांधी नव्हे तर राऊल विन्सी असे नाव आहे. सोबतच २००४, २००९ आणि २०१४ सालच्या प्रतिज्ञापत्रातही राहुल गांधींनी आपल्या पदवीविषयी निरनिराळे दावे केले आहेत. इथूनच प्रश्न निर्माण होतो की, अमेठीतून उभा राहिलेला हा माणूस नक्की कोण? राहुल गांधी की राऊल विन्सी? जर राहुल गांधी असेल तर राऊल विन्सी नावाचे पदवी प्रमाणपत्र त्यांनी अर्जासोबत का जोडले? अन् राऊल विन्सी असेल तर त्या नावाचे प्रमाणपत्र राहुल गांधींच्या अर्जाबरोबर का? आणि ही जी कोणी व्यक्ती अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे ती भारतीय आहे की ब्रिटिश? की आणखी कोणी? मुळात राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत, एम. फिल पदवीबाबत आणि ब्रिटनमधील बॅक ऑफ्स या कंपनीबाबत घेतलेले आक्षेप आजचे नाहीत. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काही वर्षांपूर्वी राहुल गांधींनी लपवलेल्या, दडवलेल्या तपशीलाबद्दल आणि चुकीची माहिती देण्यावरून लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हा हा मुद्दा संसदेच्या आचार समितीकडे सोपवला गेला, परंतु, त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतर हा विषय गृहमंत्रालय आणि तिथून पुढे पंतप्रधान कार्यालयापर्यंत गेला. आता अमेठीतील निवडणूक अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गेले असून ते सोमवारी त्यावर आपला निर्णय देतील.

 

सर्वप्रथम आपण नागरिकत्वाचा मुद्दा पाहूया. भारतीय संविधानाच्या कलम ९ नुसार जी व्यक्ती स्वेच्छेने भारताव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारते, त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते. राहुल गांधी यांनी एम. फील पदवीवेळी आणि बॅक ऑफ्स कंपनी सुरू करतेवेळी ब्रिटिश नागरिक असल्याचे म्हटले. शिवाय २००३-०४ आणि २००४-०५ साली राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये आयकर परतावादेखील भरला होता, जो ब्रिटिश नागरिकच देऊ शकतात. इथेच राहुल गांधींचा भारतीय असण्याचा मुद्दा निकालात निघतो. पण तरीही ते भारतात राहून स्वतःला भारतीय असल्याचे म्हणवून घेतात, हा दुटप्पीपणाच नव्हे तर देशाशी, देशातल्या जनतेशी केलेली घोर प्रतारणाच ठरते. हा झाला एक भाग, दुसरा भाग म्हणजे सोनिया गांधी. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेला आरोप सोनिया गांधींच्या इटालियन मुळाशी आहे. स्वामींच्या म्हणण्यानुसार, कोणतीही इटालियन स्त्री जगात कुठेही असली तरी तिच्या मुलांना इटालियन नागरिकत्व मिळते. म्हणूनच राहुल गांधींकडे भारतीय, ब्रिटिश आणि इटालियन असे तिहेरी नागरिकत्व असल्याचा दावा स्वामी करतात. परंतु, राहुल गांधी वा सोनिया गांधींनी सुब्रह्मण्यम स्वामींच्या आक्षेपांवरही कधी ठोस उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले नाही. म्हणूनच राहुल गांधींच्या नागरिकत्वावर संशयाची सुई रोखली जाणे साहजिकच म्हटले पाहिजे. सोबतच हा एखाद्या आंतरराष्ट्रीय व्यापक कटाचा तर भाग नाही ना, अशीही शंका घेण्यास वाव असल्याचे दिसते. दुसरी गोष्ट भारताची, संविधानानुसार भारत हा केवळ आणि केवळ भारतीयांसाठीचाच देश आहे. भारतात कोणत्याही व्यक्तीच्या दुहेरी वा तिहेरी नागरिकत्वाला मान्यता नाही. ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या अन्यायी, जुलमी गुलामगिरीच्या वरवंट्याखाली पिचले गेल्यानेच घटनाकारांनी ही गोष्ट संविधानात नमूद केल्याचे इथे स्पष्ट होते. आसामातील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तकावरून हा विषय किती गंभीर आहे, त्याचीही खात्री पटते. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील वेळोवेळी भारतात घुसखोरी करणाऱ्यांना पिटाळून लावण्याची भाषा केलेली आहे. आता राहुल गांधींना घुसखोरीचा निकष लागू होत नसला तरी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा नक्कीच लागू होतो. म्हणूनच त्यांना खोटी माहिती सादर करण्यावरून निवडणूक लढविण्यापासून रोखण्याचा निर्णय अमेठीतील निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही.

 

नागरिकत्वावरून चुकीची माहिती देणाऱ्या राहुल गांधींनी कोणीतरी सांगितल्याने गेल्यावर्षी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सौम्य हिंदुत्वाचा मुद्दा उचलला. राहुल गांधी जिथे जिथे जात तिथे तिथे मठ-मंदिरांना भेटी देत, कपाळाला भस्म फासून, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या अवतारात ते दिसत असत. दरम्यानच्याच काळात राहुल गांधींना दत्तात्रय गोत्रीय जानवेधारी कौल ब्राह्मण म्हणून लादण्याचा उद्योगही घराण्याच्या गुलामांनी केला. मात्र, आता ते सगळेच खोटे असल्याचे, हिंदूंच्या भावनांशी, श्रद्धा-आस्थेशी खेळण्याचे डाव असल्याचे लक्षात येते. म्हणजे एकीकडे ब्रिटिश नागरिकत्व घ्यायचे, त्यात आपले नाव राहुल गांधी नव्हे तर राऊल विन्सी असे सांगायचे आणि इकडे भारतात मात्र हिंदूंच्या मतांसाठी देवालयांचे उंबरे झिजवायचे! अर्थात हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचे कारस्थान रचणाऱ्या पक्षाचा अध्यक्ष आणखी काय करणार म्हणा? विशेष म्हणजे टिमोथी रोमर या अमेरिकेच्या राजदूतांची भेट घेऊनभारताला मुस्लीम दहशतवादाचा वा नक्षलवाद्यांचा नव्हे तर देशातल्या हिंदूंचाच सर्वाधिक धोका आहे,” असे राहुलनेच सांगितले होते. इथेच काँग्रेस कोणत्या मानसिकतेच्या पायावर उभी आहे, ते निदर्शनास येते. इतकेच नव्हे तर माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग तर खुलेआम म्हणाले होते की, “देशातल्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क आहे तो मुस्लिमांचा!” श्रीराम, सीता, हनुमान आणि रामसेतूच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काँग्रेसच होती. आता अमेठीतून पळ काढून वायनाडसारख्या अहिंदूबहुल भागातून निवडणूक लढविण्यातूनही राहुल गांधी व काँग्रेसची वृत्ती दिसून येते. अशा अनेकानेक प्रकारे काँग्रेसचा हिंदूविरोधी चेहरा आपल्यासमोर येत गेला. पण मुखवटा गळून पडण्याची वेळ आली, तेव्हा काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा आडोसा घेण्याचा प्रयत्न केला. आता तर काँग्रेसचा अध्यक्षच भारतीय नागरिक नसल्याचे त्यांनीच सादर केलेल्या कागदपत्रांवरून उघड झाले. उद्या हा पक्ष भाजपने सूडापोटी राहुल गांधींविरोधात षड्यंत्र रचल्याचाही आरोप करू शकतो. कारण ज्यावेळी सत्य लपवायचे असते आणि खोटेच खरे असल्याचे ठासून सांगायचे असते, तेव्हा माणूस समोरच्याने काही आक्षेप घेतला की सूड, द्वेष वगैरे ठरवून मोकळा होतो. परंतु, राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत तसे काहीही नाही. ते स्वतःच चोरी करताना दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष पकडले गेले, आता त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागणार. कदाचित यंदाची लोकसभा निवडणूक राहुल गांधींच्या (की राऊल विन्सीच्या?) लढतीशिवायही होऊ शकते. अर्थात ते असले तरी काय फरक पडणार होता म्हणा?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@