स्वप्नामधील गावां... एक सिंहावलोकन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019   
Total Views |



मला बसचा प्रवास करताना वाचन करायला मुळीच आवडत नाही. झोप येते. पण, त्या दिवशी पुणे ते रत्नागिरी या आठ तासांच्या प्रवासात झोप आली नाही. कारण, माझ्या हातात जे पुस्तक होतं, ते झोप आणणारं नव्हतं. दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी यांचं ‘स्वप्नामधील गावां’ हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचताना मी बसमध्ये आहे, याचं भानच राहिलं नव्हतं. मी शरीराने जरी बसमध्ये असलो तरी, मनाने एका गावात गेलो होतो.

 

खोपोली तालुक्यातल्या कुडावळे या गावी राहणारे दिलीप कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा कुलकर्णी हे एक पूर्ण निसर्गस्नेही जीवनशैली जगलेलं जोडपं म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. शिबिरांमधून, व्याख्यानांमधून पुस्तकांच्या रूपाने, मुलाखतींमधून अनेकदा दिलीप कुलकर्णी लोकांसमोर येत असतात. स्वत: पर्यावरणपूरक जीवनशैली जगता जगता अशा प्रकारच्या जीवनशैलींविषयी उपलब्ध त्या सर्व माध्यमांतून व्यापक प्रबोधन ही दोघं करतात. कोणाला त्यांची भूमिका टोकाची वाटते पण, त्यांच्या बाबतीत एका गोष्टीचा आदर मात्र निश्चित वाटतो आणि तो म्हणजे, ज्या जीवनशैलीचा ते प्रचार-प्रसार करतात तशा प्रकारची जीवनशैली ते गेली २५ वर्षे निष्ठेने जगत आहेत. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ अशी त्यांची गत नाही. गेली २५ वर्षे अशी निसर्गस्नेही जीवनशैली जगताना काय काय अनुभव आले, त्याचा एक मूल्यमापनरूपी संक्षेप ‘स्वप्नामधील गावां’ या पुस्तकात दिला आहे.

 

दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी ही दोघंही मूळची पुण्याची. दोघंही उच्चशिक्षित संपूर्ण निसर्गस्नेही जीवनशैली जगण्याचे स्वप्न घेऊन १९९३ साली गावात येऊन ही दोघं स्थानिक झाली. तेव्हापासून आजपर्यंत ‘स्वप्नातल्या’ किती गोष्टी साध्य झाल्या आणि किती साध्य झाल्या नाहीत, त्याचं एक सिंहावलोकन म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेतच दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी म्हणतात, “गांधीजींनी जसे त्यांचे ‘सत्याचे प्रयोग’ सर्वांपुढे ठेवले तसेच आमचे हे ‘निसर्गस्नेही जगण्याचे प्रयोग‘ आम्हाला सर्वांपुढे ठेवावेसे वाटतात.” यावरून त्या दोघांचा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू स्पष्ट होतो. तो आत्मस्तुतीचा नसून अनुभवकथनाचा आहे, हे कळतं. संपूर्ण पुस्तक वाचतानाही हा हेतू स्पष्टपणे जाणवतो. पुढे पुस्तकातल्या पहिल्या दोन भागांत शहर सोडून कायमस्वरूपी गावात जाऊन राहण्याचा निर्णय घेण्यासाठी करावी लागलेली मानसिक तयारी, १९९३ साली ‘पंचनदी’ या गावी जाऊन राहायला लागल्यानंतर गावातील जीवनशैलीची झालेली ओळख, चुलीवर स्वयंपाक करणं, जमीन सारवणं, मातीत अनवाणी फिरणं या सगळ्या अजिबात सवयीच्या नसलेल्या गोष्टी कशा अवगत होत गेल्या, यांचं छान मनोरंजक पद्धतीने वर्णन केलं आहे. पहिल्या विभागात अशी जीवनशैली जगण्यामागची वैचारिक बैठक कशी तयार होत गेली, त्याबद्दल लिहिलं आहे.दिलीप कुलकर्णी यांनी ‘निसर्गायण’ हे पुस्तक पुण्यात स्थायिक असतानाच लिहिलं होतं. पर्यावरणाविषयी जागरूकता आणि प्रबोधनाचं काम पुण्यात स्थायिक असतानाच सुरू झालं होतं. पण ‘आपण स्व:त असं जगलो नाही, तर नुसत्या प्रबोधनाला काय अर्थ?’ ही रुखरुख त्यांना होती. तेव्हापासून गावात राहून तसं जगण्याचं कार्य आणि बाहेर प्रबोधनाचं कार्य अशी त्यांची दोन जीवनध्येयं ठरली. ‘मुक्काम पोस्ट कुडावळे’ या प्रकरणात दिलीप कुलकर्णी म्हणतात, “प्रबोधनाने लोक किती बदलतील या विषयी शंका होती. पण किमान त्याप्रमाणे आपण जगलो, तर निसर्गावरचा भार तेवढा तरी कमी करण्याचं श्रेय आम्हाला मिळणार होतं. खरं म्हणजे जग बदलता येतं, म्हणण्याला काही अर्थ नाही. आपण फक्त स्वत:ला बदलू शकतो अन् तेच किती कठीण आहे, हे कळलं की, जग बदलणं किती कठीण आहे हे कळून चुकतं.”

 

 
 

या पुस्तकाचा तिसरा विभाग खऱ्या अर्थाने अंतर्मुख करायला लावणारा आहे. यात दिवसभरातले प्रत्येक काम करताना आणि प्रत्येक वस्तू वापरताना निसर्गाचा विचार का आणि कसा करायचा, याचं सखोल विश्लेषण केलं आहे. आपण सहज बाजारात जाऊन हव्या त्या वस्तू पैसे देऊन विकत आणतो.पण, त्या वस्तूच्या पर्यावरणपूरकतेचा विचार होतो का? त्या वस्तूसाठी वापरलेली संसाधनं नवीकरणक्षम आहे की अनवीकरणक्षम? ती वस्तू विघटनशील आहे की अविघटनशील? ती वस्तू किती टिकावू आहे? ती वस्तू तयार करण्यासाठी किती प्रमाणात ऊर्जा वापरली गेली आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार कुठलीही वस्तू घेताना करणं म्हणजेच पर्यावरणीय विचार आहे. या सगळ्या प्रश्नांचा सारासार विचार करून मग जीवनाची चतु:सूत्री दिलीप कुलकर्णी मांडतात- Refuse-Reduce-Reuse-Recycle पर्यावरणपूरतकतेच्या निकषांवर ज्या वस्तू निसर्गाला घातक ठरतात, त्यांचा वापर पूर्णपणे टाळणं (Refuse), तो वापर कमी करणं (Reduce) पुनर्वापर करणं (Reuse) आणि पुनर्चक्रीकरण (Recycle) करणं ही ती चतु:सूत्री. ही चतु:सूत्री दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी स्वत: कशी आचरणात आणतात, हे वाचणं मनोरंजक आणि उद्बोधक आहे. अनेकदा हे वाचताना अनेक विधाने अतिशयोक्तीपूर्ण वाटतात पण, केवळ विधानांवर न जाता त्यामागची तत्त्व आणि निष्ठा डोक्यात ठेवून हे पुस्तक वाचलं, तरच त्यातला सकारात्मक भाव लक्षात येतो.

 

या पुस्तकातला सर्वात लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांनी मांडलेले स्वत:चे प्रगतिपुस्तक. या प्रगतिपुस्तकात पर्यावरणपूरकतेच्या १८ निकषांवर आधारित रोजच्या दिनचर्येचं मूल्यमापन केलं आहे. उदा. स्प्रिंगचं घड्याळ वापरणं, सुती कपडे वापरणं, साबण न वापरणं अशा रोजच्या जगण्यातल्या ५० गोष्टींची यादी करून कोणती गोष्ट पर्यावरणाचे कोणकोणते निकष पूर्ण करते, यावर तिला १० पैकी गुण दिलेले आहेत. अशा प्रकारे स्वयं-मूल्यमापन केल्यावर दिलीप कुलकर्णी पर्यावरणपूरकतेच्या निकषावर स्वत:ला ५०० पैकी २५४ म्हणजे ५०.८% गुण देतात! ही फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. हे प्रगतिपुस्तक दाखवून दिलीप कुलकर्णी स्वत: मान्य करतात की, गेली २५ वर्षे निसर्गस्नेही जगण्याचा इतका आटोकाट प्रयत्न करूनही आणि त्याविषयी महाराष्ट्रभर व्यापक प्रबोधन करूनही आम्ही ५० टक्केच पर्यावरणपूरक जगतो आहोत. परंतु, प्रत्येक माणसाने स्वत:च्या जीवनशैलीचं असं प्रगतिपुस्तक मांडावं आणि स्वत:चं मूल्यमापन करून सुधारणेला कुठे कुठे वाव आहे ते तपासावं आणि आपल्या आयुष्याचं carbon footprint कमीत कमी ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, असं आग्रहपूर्वक आवाहन दिलीपजी वाचकांना करतात.

 

या पुस्तकाच्या शेवटच्या भागातलं ‘मागे घेतलेली पावलं’ हे प्रकरण वाचकांना अंतर्मुख करणारं आणि व्यावहारिक शहाणपणाची जाणीव करून देणारं आहे. घर बांधताना सिमेंटचा वापर अजिबात करायचा नाही, वीज अजिबात वापरायची नाही, असे काही टोकाचे विचार गावात स्थानिक होण्यापूर्वी डोक्यात होते. परंतु, व्यवहारात या गोष्टी शक्य झाल्या नाहीत. अनेकदा तत्त्वांशी तडतोड करावी लागली, हे दिलीप कुलकर्णी प्रामाणिकपणे मान्य करतात. ‘पुढल्या हाका’ या शेवटच्या प्रकरणात दिलीप कुलकर्णी म्हणतात, “आमचं वय जसं जसं वाढतं आणि शारीरिक शक्ती कमी कमी होत जाते आहे, तसतशा आम्हाला तडजोडी वाढवाव्या लागणार आहेत. पण आम्ही आमच्या विचारांतील विकास-प्रतिमान प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जगू शकलो याचं आम्हाला समाधान निश्चित आहे. २५ वर्षांच्या ‘त्या’ जगण्याचं हे कथन वाचून कोणाला ‘असं’ जगण्याची प्रेरणा मिळाली, तर आम्ही भरून पावू.” आज ‘खेड्यातून शहरात’ आणि ‘शहरातून खेड्यात’ अशी दोन्ही प्रकारची स्थलांतरं होत आहेत. मुंबई-पुण्यातला २०-२५ वर्षे नोकरी झालेला धनाढ्य वर्ग झपाट्याने गावाकडे येतो आहे. गावांतील निसर्ग सगळ्यांना ‘एन्जॉय’ करायला आवडतो पण, पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या दृष्टिकोनाचा मात्र सर्वत्र अभाव आहे. सर्वांना त्यांच्यासारखं नाही जगता आलं तरी, 'Refuse-Reduce-Reuse-Recycle' ही जीवनाची चतु:सूत्री प्रत्येकाने जितकी शक्य तितकी आचरणात आणण्याचा प्रयत्न जरूर करावा, हा दृष्टिकोन देणारं हे पुस्तक आहे. कुठलेच विचार हे १०० टक्के स्वीकारार्ह नसतात आणि १०० टक्के टाकाऊही नसतात. अनेकदा आपण उथळमाथ्याने विचार करून ‘हे काहीतरी फालतू आहे’ असं विधान करतो. या पुस्तकात निसर्गस्नेही जगण्याची मूलतत्त्व सांगितली आहेत. ती किती प्रमाणात आचरणात आणण्याची, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. पण किमान त्यांचं आकलन होण्यासाठी तरी हे पुस्तक वाचलंच पाहिजे!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@