कलिंगची पुनरावृत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019   
Total Views |


 

भगवान महावीर यांची जयंती नुकतीच साजरी झाली. त्याच वेळी अमेरिकास्थित टॅमी हर्बेस्टर या महिलेने जैन धर्माची दीक्षा स्वीकारत जैन साध्वी म्हणून आपले कार्य सुरू केले आहे. त्या जैन साध्वी होणाऱ्या अमेरिकेतील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

 

इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, असे म्हणतात. भारतीय इतिहासात कलिंगचा नरसंहार पाहून मन व्यथित झाल्याने सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारून अहिंसेचा प्रसार व प्रचार करण्याचा मार्ग अवलंबिला होता, याची इतिहासात नोंद आहेच. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती भारतीय आध्यात्मिक शिकवणुकीच्या आधारावर महासत्तेच्या परिघात नुकतीच झाली. साधारणतः २६१८ वर्षांपूर्वी जन्मलेल्या भगवान महावीर यांनी जगाला सत्य व अहिंसेचे महत्त्व अधोरेखित करण्याचे कार्य केले होते. तसेच, या गुणांनाच त्यांनी आपली जीवनशैली बनवले व कोट्यवधी लोकांना त्यांनी प्रेरणा दिली. त्यांनी अहिंसा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. हिंसेने कधीच कोणाचे दु:ख दूर करता येत नाही, अशा प्रकारचा उपदेश जगाला दिला. भगवान महावीर यांची जयंती नुकतीच साजरी झाली. त्याच वेळी अमेरिकास्थित टॅमी हर्बेस्टर या महिलेने जैन धर्माची दीक्षा स्वीकारत जैन साध्वी म्हणून आपले कार्य सुरू केले आहे. त्या जैन साध्वी होणाऱ्या अमेरिकेतील पहिल्या महिला ठरल्या आहेत. मुळात टॅमी हर्बेस्टर यांचा जन्म कॅथोलिक कुटुंबातील. सन २००८ मध्ये त्यांनी आचार्य श्री योगीश यांच्याकडून दीक्षा घेतली. दीक्षाग्रहणानंतर त्या आता ‘साध्वी सिद्धाली’ या नावाने ओळखल्या जाणार आहेत.

 

जगाला हिंसेच्या दृष्टिकोनातून अनेकविध प्रश्नांनी ग्रासले आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मानवी तस्करी. या मानवी तस्करीला रोखण्याचे काम त्या आज जोमाने करत आहेत. तसेच, केवळ तस्करीच्या विळख्यातून मानवाची सुटका न करता त्याचे पुनर्वसन करण्याचे आणि त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याचेदेखील कार्य त्या करत आहेत. वर नमूद केल्याप्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते, हे टॅमी हर्बेस्टर उपाख्य साध्वी सिद्धाली यांनी त्यांच्या जीवनानुभवाची जी माहिती काही प्रसारमाध्यमांना दिली, त्यावरून लक्षात येते. त्या म्हणतात की, “सन २००५ मध्ये अमेरिकी लष्करात परिचारिका म्हणून इराकमध्ये मी कर्तव्यावर होते. जखमी अमेरिकी जवानांवर उपचार करणे, हे माझे काम होते. या वेळी मी अनेक अमेरिकी जवानांना अपंगत्व आल्याचे व मृत्युमुखी पडताना पाहिले. अशाच एका दिवशी मी ताफ्यासमवेत लष्करी छावणीत दाखल होत असताना अचानक रस्त्याच्या बाजूला स्फोट झाला. या स्फोटात सर्व रक्ताने माखले होते, एकाचा मृत्यू झाला होता. त्या जवानाच्या अंत्यविधीवेळी मला खूप वेदना झाल्या आणि त्याच दिवशी मला अहिंसेचे महत्त्व समजले. हिंसाचार खूप कठोर व बीभत्स असतो, हे मी जवळून अनुभवले असे त्या सांगतात. हिंसाचार हा मानवतेसाठी मोठा आजार असल्याचे सांगताना त्या इराकमधील आपले अनुभवदेखील विशद करतात. हिंसा माझे मनही निष्ठुर करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इराकमध्ये निरपराध मुले, महिला, युवक व वृद्धांच्या पार्थिवांमध्ये अन्नपाण्याचा शोध घेतानाचे चित्र पाहिले असल्याचेदेखील त्या सांगतात.

 

अशा सर्व भीषण वास्तवाचे साक्षीदार झाल्याने स्वत्वाचा शोध घ्यावा आणि मानवता कुठे आणि का लोप पावत चालली आहे, याबाबत आत्मचिंतन करावे, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली. यातून त्या आचार्य श्री योगीश यांच्या संपर्कात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. टॅमी हर्बेस्टर उपाख्य साध्वी सिद्धाली यांनी अनुभवलेले वास्तव भारतीय इतिहासात सम्राट अशोकानेदेखील अनुभवले आहे. त्यामुळे टॅमी हर्बेस्टर उपाख्य साध्वी सिद्धाली यांनी जैन धर्माची दीक्षा घेत व विधिवत तिचे आचरण करण्याचे केलेला निश्चय हा इतिहासाची पुनरावृत्ती आहे, असे म्हटले तर वावगे ठरत नाही. मुळात भारतीय संस्कृती ही तिच्या निर्माणापासून अहिंसात्मक आहे. भारताचे परराष्ट्र धोरणदेखील याच तत्त्वावर आधारभूत आहे. भारताने जगाला बुद्ध, महावीर दिले आहेत, याची ओळख आजही जगाला आहे. आणि भारतीय विचार आणि संस्कृती ही जगन्मान्य आहे, हेच या घटनेवरून दिसून येते. तसेच, शस्त्रास्त्र निर्मितीचा व्यापार करणाऱ्या अमेरिकेत आणि त्याच देशाच्या सैन्यात कार्य करणाऱ्या एका महिलेने शांतीचा, अहिंसेचा मार्ग स्वीकारावा, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. विनाकारण पाश्चिमात्त्य संस्कृतीची कास धरणाऱ्या आणि त्याची प्रौढी मिरवणाऱ्या भारतीय जनमानसाने यातून बोध घेण्यास नक्कीच हरकत नसावी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@