सरन्यायाधीश रंजन गोगोईंवर लैंगिक शोषणाचे आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2019
Total Views |

 


 


न्या. गोगोई यांनी आरोप फेटाळत, हे आरोप अत्यंत घाणेरडे आणि तथ्यहीन असल्याचे सांगितले

 

नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून न्या. गोगोई यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. या महिलेने २२ न्यायाधीशांना प्रतिज्ञापत्र लिहून गोगई यांच्यावर हे खळबळजनक आरोप केले आहेत. ही महिला गोगोई यांची जुनी सहकारी असून ती सुप्रीम कोर्टात ज्यूनियर कोर्ट असिस्टंट म्हणून काम करत होती.

 

न्या. गोगई आरोप फेटाळले

 

न्या. गोगोई यांच्यावर केलेल्या आरोपानंतर त्यांच्या सचिवांनी एका ई-मेलद्वारे हे आरोप फेटाळून लावले आहेत. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. आरोप केलेली महिला २०१६ ते २०१८ या कालावधीत न्या. गोगई यांच्या ज्युनिअर असिस्टंट होत्या. मात्र, त्यांनी लावलेले आरोप अत्यंत घाणेरडे आणि तथ्यहीन असल्याचे या ई-मेलमध्ये सांगण्यात आले आहे. याशिवाय आपण येत्या काळात महत्वाच्या विषयांवर सुनावणी करणार असल्याने मला यापासून बाजूला ठेवण्यासाठी माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

 

महिलेने लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?

 

सरन्यायाधी रंजन गोगोई यांनी त्यांच्या राहत्या घरी १० आणि ११ ऑक्टोबर २०१८ रोजी माझा शारीरिक छळ केला होता असा आरोप या महिलेने केला आहे. गोगोई यांनी मला कवेत घेऊन घट्ट आवळत नको तिथे स्पर्श केला. मला मिठी मार असा आग्रह त्यांनी केला. मात्र मी स्वत:ला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होते. त्यांच्यापासून सुटका करून घेत मी तिथून पळ काढला, असे महिलेने आपल्या पत्रात म्हटले आहे. यासोबतच मी गोगोईंना प्रतिकार केल्यामुळे त्यांनी मला त्यांच्या घरी दिलेल्या कामावरून काढून टाकले. तसेच डिसेंबर २०१८ मध्ये तिला सर्वोच्च न्यायालयातील नोकरीवरूनही बडतर्फ केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याशिवाय, आपल्या पतीला आणि दिरालाही नोकरीवरून बडतर्फ केल्याचा आरोप तिने केला आहे. 

 

महिलेच्या आरोपानंतर तात्काळ सुनावणी

 

महिलेने केलेल्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयात आज विशेष सुनावणी बोलावण्यात आली. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अरुण मिश्रा आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या तक्रारीची आज तातडीने सुनावणी झाली. भारताच्या न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सरन्यायाधीशांविरोधात सुनावणी झाली. दरम्यान, या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी निर्णय देणे टाळले.

 

माध्यमांना सबुरीचा सल्ला

 

महिलेने २२ न्यायाधीशांना पत्र लिहून गोगोई यांच्यावर खळबळजनक आरोप केल्याचे वृत्त काही संकेतस्थाळावर प्रकाशित झाले. सदर प्रकरणाची पडताळणी केल्याशिवाय माध्यमांनी या महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देऊ नये असे न्या. मिश्रा व न्या. खन्ना यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@