रत्नागिरीत 'किलर व्हेल'चे दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019
Total Views |

 


समु्द्रकिनारपट्टीनजीक हा मासा फार कमी प्रमाणात पाहावयास मिळतो

 

मुंबई (अक्षय मांडवकर) : सागरी जैवसाखळीतील सर्वात मोठा डाॅल्फिन आणि शिकारी सस्तन प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'किलर व्हेल'चे दर्शन सोमवारी रत्नागिरीत घडले. गावखडी किनारपट्टीनजीक काही 'किलर व्हेल' पोहत असल्याचे स्थानिक मच्छीमारांना दिसले. ग्रामस्थांच्या मते प्रथमच या पट्यातील सागरी परिक्षेत्रात या जीवांचे दर्शन घडले आहे.

 

समुद्री जैवसाखळीत महत्वाचे स्थान असणारा 'किलर व्हेल' हा सागरी सस्तन प्राणी त्याच्या काळ्या शरीरावर उमटलेल्या पांढऱ्या डागांमुळे सर्वपरिचित आहे. मात्र या प्राण्याचे दर्शन राज्याच्या सागरी परिक्षेत्रात तसे दुर्मिळ आहे. सोमवारी सायंकाळी पूर्णगड येथील मच्छीमार गौरव नाटेकर मासेमारीकरीता गावखडी गावाच्या किनारपट्टीनजीक गेले असताना त्यांना समुद्राच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाचे मोठे पर दिसले. डाॅल्फिन समजून त्यांनी या जीवाचे मोबाईलमध्ये चित्रण केले. मात्र हा जीव डाॅल्फिन नसून 'किलर व्हेल' असल्याची माहिती गावखडीचे कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी दिली. तसेच या पट्यातील सागरी परिक्षेत्रात प्रथमच या जीवांचे दर्शन घडल्याचे त्यांनी सांगितले.

 

किलर व्हेल हा गटाने (पाॅड) शिकार करणार सागरी सस्तन प्राणी आहे. एका गटामध्ये साधारण ४० पर्यंत किलर व्हेल असतात. ५० ते ८० वर्षांपर्यत जगणाऱ्या या प्राण्याचा आकार २३ ते ३२ फुटांपर्यत असतो. त्याचे वजन सहा टनांपर्यत असते. राज्याच्या सागरी परिक्षेत्रात खोल समुद्रात या सागरी सस्तन प्राण्याचा वावर असल्याची माहिती सागरी जीवांच्या अभ्यासिका केतकी सुळे यांनी दिली. गोवादेवबाग आणि वेंगुर्ला येथील खोल समुद्रात त्यांचे दर्शन घडते. मात्र किनारपट्टीनजीक हा जीव फारच कमी पाहण्यास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मादी किलर व्हेल साधारण तीन ते दहा वर्षांच्या अंतराने पिल्लांना जन्म देते. त्यांच्या गर्भधारणेचा कालावधी १७ महिन्यांचा असतो.

 

एका पिल्लाला जन्म देऊन मादी त्याचा दोन वर्षांपर्यत सांभाळ करते. बहुतांश वेळा जन्मास आलेले पिल्लू त्याच गटामध्ये शेवटपर्यत राहतो.

 

डाॅल्फिन प्रमाणे किलर व्हेल ही वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात.

 

मासे, पेंग्विन, सील, समुद्री सिंह, व्हेल यांचावर हा जीव गुजराण करतो. त्यांची शिकार करताना वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब हा जीव करतो.

 

एकाच परिक्षेत्रात राहणारे किलर व्हेल बऱ्याचदा मासेच खाणे पसंत करतात. मात्र स्थलातंर करणारे गट सागरी सस्तन प्राण्यांची शिकार करतात.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@