‘हिंदू दहशतवादा’चा व्यापक कट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019
Total Views |



देशात काहीही झाले तरी हिंदूंना सन्मानाने आणि अभिमानाने जगायचे असेल तर काँग्रेसला सत्तेतून उखडून फेकणे का आवश्यक आहे, तेदेखील ‘हिंदू दहशतवादा’च्या या व्यापक कटावरून स्पष्ट होते.

 

भारतात हजारो वर्षांपासून प्रत्येकाला आपल्यात सामावून घेणार्‍या हिंदू समाजाला क्रमांक एकचा दुश्मन ठरवत काँग्रेसने दहशतवादाचे लेबल चिकटविण्याचे षड्यंत्र रचले. २००४ ते २०१४ दरम्यान देशात सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या पी. चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदे या दोन्ही गृहमंत्र्यांनी हिंदू धर्मीयांच्या विरोधात सातत्याने कारवाया केल्या. इतकेच नव्हे तर आजकाल गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, कपाळाला भस्म फासून घाट-मंदिरांच्या आडोशाने हिंडण्या-फिरणार्‍या विदूषकाने कधीकाळी भारताला जिहादी दहशतवादापेक्षा हिंदू दहशतवादाचा सर्वाधिक धोका असल्याचे संतापजनक विधान केले, तेही अमेरिकन राजदूतासमोर! मात्र, काही दिवसांपूर्वीच पंचकुला न्यायालयाने समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट खटल्यातील स्वामी असिमानंद आणि अन्य लोकांना निर्दोष मुक्त करत काँग्रेसच्या ‘हिंदू दहशतवादा’च्या कारस्थानाची पोलखोल केली. सोमवारी वर्ध्यातील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करत जगभरात हिंदूंच्या नाचक्कीला जबाबदार धरले. नरेंद्र मोदींनी केलेले विधान सोळा आणे खरे असून काँग्रेसचा हिंदूविरोधी पाशवी चेहरा समोर आणणारे आहे. सोबतच, देशात काहीही झाले तरी हिंदूंना सन्मानाने आणि अभिमानाने जगायचे असेल तर काँग्रेसला सत्तेतून उखडून फेकणे का आवश्यक आहे, तेदेखील या व्यापक कटावरून स्पष्ट होते.

 

वस्तुतः बारा वर्षांपूर्वीच समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणात पाकिस्तानी मुसलमानांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. शिवाय मुसलमान विद्यार्थ्यांची संघटना म्हणून मिरविणार्‍या पण प्रत्यक्षात देशविघातक कारवायांत हात असलेल्या ‘सिमी’च्या सफदर नागोरीलाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. नागोरीनेदेखील नार्को चाचणीत पाकिस्तान्यांचीच नावे घेतली होती. परंतु, कसल्याशा कारणाने तपास यंत्रणांनी अर्धवट चौकशी करून पाकिस्तानी नागरिकांची घरवापसी केली. पुढे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी समझौता एक्सप्रेस स्फोट प्रकरणात लक्ष घातले आणि सगळीच चक्रे उलटी-पालटी झाली. काँग्रेसने ‘इस्लामी दहशतवादा’ऐवजी ‘हिंदू दहशतवादा’ची संकल्पना मांडली व प्रचलित केली. इस्लामी दहशतवाद, फुटीरतावाद, नक्षलवाद आदी कोणत्याही हिंसक अन् अराजकी विचारांपेक्षा हिंदू असणे हाच सर्वात मोठा धोका असल्याचे, हिंदू म्हणजे अमानुष विखार असल्याचे काँग्रेसी गोटातून पद्धतशीरपणे पसरवले जाऊ लागले. काँग्रेसने अशाप्रकारे आपल्या कार्यकाळात हिंदूंची जितकी म्हणून बदनामी करता येईल, तितकी करण्याचे शक्य ते सर्वच उपद्व्याप केले. २००६ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जसे हिंदूंना गोवले गेले, तसेच समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाबाबतही करण्यात आले. स्वामी असिमानंद आणि इतरांची अटक ही काँग्रेसच्या याच हिंदूविरोधी मानसिकतेची द्योतक होती.

 

दरम्यानच्याच काळात बारामतीसम्राट ‘खणत्या राजा’ने यावेळीही १९९३ सालच्या साखळी स्फोटादरम्यानचे दाढी कुरवाळू धोरण अवलंबले. केंद्रात मंत्रिपदी असलेल्या शरद पवारांनी निष्पाप मुसलमानांचा उमाळा येऊन प्रत्येकवेळी मुसलमानांनाच का गजाआड करता? अन्य धर्मीयांना (हिंदू?) का संशयित समजले जात नाही? असा टाहो फोडला. परिणामी, साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानणार्‍या राज्यातल्या तपास यंत्रणांनीही लगोलग ‘अन्य धर्मीय’ चा अर्थ ‘हिंदू’ असाच घेत त्यांना अडकविण्याचे सत्र आरंभले. तत्कालीन एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांनी केलेली साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांची अटक हिंदूविरोधी राजकीय दबावाचाच भाग होती. इथूनच मग समझौता एक्सप्रेस असो वा मालेगाव, दोन्ही ठिकाणच्या बॉम्बस्फोटात हिंदुत्वनिष्ठांवर, राष्ट्रवाद्यांवर आरोप सिद्ध करण्यासाठी आणि ‘हिंदू दहशतवाद’ अस्तित्वात असल्याचे पटवून देण्यासाठी लबाडीचा खेळ सुरू झाला. खोटे-नाटे पुरावे उभे करायचे, संबंध नसलेल्या गोष्टींचा संबंध लावायचा, शेंडा-बुडखा नसतानाही हिंदूंनाच दोषी ठरविण्याचा आटापिटा केला जाऊ लागला. कुठल्याही घातपातात जिहादी मुसलमानी दहशतवाद्यांचा संबंध नाकारून तो हिंदूंशी कसा जोडता येईल, हे ठसविण्याचे एकच काम तपास यंत्रणांवर येऊन पडले अन् या सगळ्याच प्रकाराला प्रसारमाध्यमांनीही पुरेपूर साथ दिली.

 

काँग्रेसी रमण्यावर गुजराण करणार्‍या ल्युटियन्स दिल्लीतून हिंदूच देशविघातक असल्याची कॅसेट दिवसरात्र वाजू लागली. मात्र, पुरावे नसताना केलेली अटक न्यायालयासमोर टिकणार नव्हती. म्हणून काँग्रेसी गुलामांनी भेसूर खेळ खेळला. हिंदुत्वनिष्ठांना दहशतवादाच्या आरोपावरून तुरुंगात तर डांबायचे, तिथे त्यांचा अतोनात छळ करायचा, हवे ते वदवून घ्यायचे, पण खटला न्यायालयात सुनावणीलाच येऊ द्यायचा नाही, असा डाव या लोकांनी अमलात आणला. परिणामी कारागृहात खितपत पडलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या नावाने ‘हिंदू दहशतवाद’ असल्याचे सांगण्याची सोय झाली आणि न्यायालयापुढे सुनावणी न झाल्याने काँग्रेसी बिंगही शाबूत राहिले. अर्थात, हे सगळेच देशावर पहिला हक्क मुसलमानांचा, अशी वृत्ती बाणवलेल्या काँग्रेसने मोहल्ल्या-मोहल्ल्यांतल्या भाईजान-अम्मीजानच्या एकगठ्ठा मतांसाठी चालवले. म्हणजेच मुसलमानी मतांच्या भिकेपायी हिंदुत्वनिष्ठांची-कुटुंबीयांची आयुष्ये तर उद्ध्वस्त केलीच, पण समस्त हिंदूंच्या बदनामीचे उद्दिष्टही साध्य झाले. हिंदूंच्या नाचक्कीचा हा उद्योग सोनिया गांधी वा राहुल गांधींपासून लपून राहिला नसेलच किंवा त्यांच्याच संमतीने हे सगळे झाले असणार. अन् आज हेच लोक ‘सौम्य हिंदुत्वा’चा नारा देत राम-कृष्णाच्या वा महादेवासमोर माथा टेकताना दिसतात. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हिंदू दहशतवादा’ची संकल्पना पैदा करणारा काँग्रेसी बीभत्सपणा समोर आणण्याचे काम केले.

 

दुसरीकडे पंतप्रधानांनी ‘हिंदू दहशतवादा’वरून काँग्रेसचा बुरखा फाडल्याने पृथ्वीराज चव्हाणांच्या पायाखालची वाळू सरकली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही गेल्यावेळेप्रमाणे पक्षाचे बारा वाजणारच्या नुसत्या कल्पनेने पृथ्वीराजबाबांना कसंतरी व्हायला लागले. म्हणूनच पंतप्रधानांनी विकासाच्या मुद्द्यावर भाषण करायला हवे होते, पण त्यांनी एकाच व्यक्तीवर टीका केल्याचे ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप मोदींनी शरद पवारांवर (एका व्यक्तीवर) केलेल्या टीकेवरच असल्याचे दिसते. परंतु, शरद पवार ही काही एक व्यक्ती नव्हे तर, ती गेल्या कित्येक वर्षांपासून जनतेला निरनिराळ्या प्रकारे कंगाल करणार्‍या, जातीयवादाचा धुरळा उडवून देणार्‍या व नंतर सत्तेचा मलिदा खाणार्‍या मानसिकतेचे निदर्शक आहे. नरेंद्र मोदींनी केलेली टीका प्रथमतः शरद पवारांवरील वाटेल, पण ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत वर्षानुवर्षे सत्तेभोवती फेर धरून नाचणार्‍या सगळ्याच प्रस्थापित राजकारण्यांच्या किंवा घराण्याच्या पक्षांना लागू पडते. कुठे मुलाने तर कुठे पुतण्याने बापाला वा काकाला बेदखल केल्याचे, सवतासुभा मांडल्याचे पाहायला मिळते अन् सत्तेत असताना खा खा खात सुटायचे व नंतर जनतेची कामे करण्याची वेळ आली की डाराडूर झोपायचे, ही कुंभकर्णी पद्धतीही सर्वत्र दिसते. मोदींनी त्यावर घणाघात केला, तर पृथ्वीराज चव्हाणांना विकासाचा मुद्दा आठवला.

 

अर्थात हा नरेंद्र मोदींचाच विजय आहे. कारण जो आशा-आकांक्षा पूर्ण करू शकतो, त्याच्याकडून तशी अपेक्षा केली जाते. नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षांत आपल्या कार्यप्रणालीतून तेच सिद्ध करून दाखवले. ‘सब का साथ-सब का विकास’चा मूलमंत्र घेऊन समाजातल्या प्रत्येकाच्या उन्नतीसाठी काम केले, योजना राबवल्या, प्रकल्प सुरू केले. परिणामी गेली ७० वर्षे गरिबांना, वंचितांना, पीडितांना गरिबी हटावपासून आता ७२ हजारांच्या जुमल्याच्या नावाने बनवणार्‍यांना विकासाचा मुद्दा आठवला. म्हणूनच पृथ्वीराज बाबाजी, आभार माना त्या मोदींचे, ज्यांनी तुम्हाला विकासावर बोलायला भाग पाडले; अन्यथा तुमच्यासारख्या काँग्रेसींनी हिंदू-मुस्लिमांची एकमेकांना भीती दाखवत, कोणाला तरी उल्लू बनवत खुर्च्या उबवण्यातच हयात घालवली असती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@