दीपस्तंभाला आदेश देणारा कप्तान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019   
Total Views |



कम्युनिस्ट पक्षाचे २०१४ आणि २०१९ सालचे जाहीरनामे मी वाचले. तेच शब्द, त्याच समस्या, तोच सेक्युलॅरिझम, तीच दलित हिताची बेगडी कळकळ, महिलांविषयी आस्था, हिंदूंना शिव्या, आर्थिक धोरण कसे फसले आहे, याची रडगाणे आणि परराष्ट्रनीती कशी वाईट आहे, याचे तुणतुणे दोनही जाहीरनाम्यात सारखेच आहेत.


निवडणुका आल्या की, राजकीय पक्ष जाहीरनामे प्रकाशित करतात. तो एक उपचार असतो. सामान्य माणूस जाहीरनामे वाचत नाही. वृत्तपत्रे आणि दूरदर्शन मालिका पक्षांच्या जाहीरनाम्यावर गंभीरपणे चर्चा घडवून आणीत नाहीत. निदान माझ्या वाचण्यात आणि ऐकण्यात आलेले नाही. जाहीरनाम्यातील एखाद-दुसरा मुद्दा उचलायचा आणि त्याची बातमी तयार करून छापायची.

मार्क्सिस्ट-कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. जन्मापासून कम्युनिस्ट पक्षाची लांबलचक पत्रके काढण्याची सवय आहे. त्याला ते ‘सैद्धांतिक डॉक्युमेंट’ म्हणतात. ती पक्षातील ’इंटलेक्च्युअल’ लोकांसाठी असतात. कामगार, शोषित, दलित, पीडित यांच्या डोक्यावरून जाणारे सर्व विषय असतात. पण, कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या नावाने राजकारण करतो, त्यांच्यासाठी सत्ता मागतो. आपले म्हणणे सामान्य माणसाला समजले पाहिजे, असे त्यांना फारसे वाटत नाही.

प्रत्येक कम्युनिस्ट स्वत:ला फार मोठा ’इंटलेक्च्युअल’ समजत असतो. आकडेवारी वगैरे त्याची तोंडपाठ असते. परिस्थितीचे विश्लेषण करण्याची त्याची खास पद्धती असते. इतिहास एका ठराविक पद्धतीनेच घडत असतो, भांडवलशाही नष्ट होणार, हे ठरलेले आहे आणि कामगारांची सत्ता येणार, ती कोणी रोखू शकत नाहीत, या त्याच्या श्रद्धा असतात. एखादा भाविक ज्या अंधपणाने आपल्या श्रद्धांचे जतन करतो, तसा कम्युनिस्ट स्वत:ला रॅशनल (विवेकी) समजून आपल्या श्रद्धांचे जतन करतो.

भारतात त्याच्या मार्गातील सर्वात मोठी धोंड म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. कम्युनिस्टांचे संघाशी हाडवैर आहे. ते एकतर्फी आहे. संघाची शिकवण कोणाशी वैर करण्याची नाही. संघाची शिकवण ‘कम्युनिस्टही आपले आणि काँग्रेसवालेदेखील आपलेच,’ अशी आहे. ते विरोध करतात म्हणून अनेक वेळा त्याचा प्रतिवाद करावा लागतो. केला नाही, तर आपण केवळ मार खाण्यासाठी जन्मलो का? असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून अधूनमधून टोले हाणावे लागतात.

आता त्यांनी जो जाहीरनामा प्रकाशित केला आहे, त्यात कम्युनिस्ट पक्ष म्हणतो...

* भाजप सरकारने ज्या संघाच्या लोकांना महत्त्वाच्या शासकीय पदांवर बसविले आहे, त्या पदांवरून त्यांची हकालपट्टी केली जाईल.

* सांप्रदायिक दंग्यांविरुद्धचा सर्व समावेशक कायदा केला जाईल.

* सांप्रदायिक दंग्यात पीडित लोकांना गतीने न्याय दिला जाईल आणि पुरेशी नुकसान भरपाई दिली जाईल.

* वेगवेगळ्या ’सेनांवर’ तत्काळ बंदी घातली जाईल.

* दलित आणि अल्पसंख्यकांवर हल्ले करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

* सांप्रदायिक विद्वेष वाढविणार्‍या आणि अल्पसंख्यकांवर आक्रमण करणार्‍या संघटना आणि संस्थांवर सुयोग्य प्रकारचे कायदे करून कारवाई केली जाईल.

* अल्पसंख्यकांच्या अधिकारांचे रक्षण करून त्यांना समता आणि सन्मानाने तसेच भयरहित आणि भेदभावरहित जीवन जगण्याचा मार्ग प्रशस्त केला जाईल.

* शालेय पुस्तकातून सांप्रदायिक पक्षपात आणि पूर्वग्रह शिकविणारे पाठ काढून टाकण्यात येतील.

तसा हा जाहीरनामा खूप मोठा आहे आणि त्याच्यावरच लिहायचे म्हटले, तर किमान चार-पाच लेख लिहावे लागतील. खरं तर, या जाहीरनाम्यात गंभीरपणे वाचावे असे काहीच नाही. संघाविषयीचा पराकोटीचा द्वेष ज्या भागात व्यक्त झाला आहे, तो भाग मी फक्त वर दिलेला आहे.

संघ आणि संघ विचारधारेने चालणार्‍या संस्थांना कायद्याच्या मार्गाने किंवा घटनात्मक बदल करून चिरडून टाकण्याचा प्रयत्न १९७३ पासून कम्युनिस्टांनी केलेला आहे. यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये घुसखोरी केली. मोहनकुमार मंगलम् हे कारहोल्डर कम्युनिस्ट इंदिरा गांधींचा विश्वासू झाले. दुसरे कारहोल्डर हरिभाऊ गोखले कायदामंत्री झाले. तिसरे पी. एन. हक्सर इंदिरा गांधींचे विश्वासू सल्लागार होते. या लोकांनी ४२वी घटना दुरुस्ती करून संघाला कायमचा संपविण्याचा प्रयत्न केला. संघाचे कार्य ईश्वरी कार्य असल्यामुळे (कम्युनिस्ट ईश्वर मानत नाहीत, पण आम्ही मानतो.) त्या ईश्वराने मोहनकुमार मंगलम् यांना विमान अपघातात ठार केले. हरिभाऊ गोखले हे हृदयक्रिया बंद पडून मेले, कम्युनिस्टांच्या नादी लागणार्‍या इंदिरा गांधींची सत्ता ७७ साली गेली. संघ चिरडण्याचे कम्युनिस्टांचे स्वप्न हवेत विरले.

ते स्वस्थ बसले नाहीत. निवडणूक आली की त्यांना आपल्या अवतारकार्याची आठवण होते आणि मग ते आपल्या जाहीरनाम्यात प्रकट करतात. त्यांचे सांप्रदायिक, अल्पसंख्य कायदे, पाठ्यपुस्तकातून धडे काढणे हे सर्व विषय ’हिंदू’ या संकल्पनेभोवती असतात. जिथे जिथे ‘हिंदूपण’ व्यक्त झाले असेल, ते काढून टाकू, असा त्यांचा पण आहे. त्यासाठी त्यांच्याकडे हजारो युक्त्या असतात, असे त्यांना वाटते. आपल्यासारखे बुद्धिमान आपणच. बंगालमधून आपल्याला घालवले, त्रिपुराच्या जनतेने लाथ मारली, भारतात कोणी विचारत नाहीत म्हणून काय झाले? आमच्यासारखे बुद्धिमान आम्हीच! हजार प्रकारे आम्ही बुद्धी चालवू हा त्यांचा पण. यावरून मला एक गोष्ट आठवली. ही फिनलँडची एक कथा आहे. लांडगा, कोल्हा, मांजर आणि ससा यांच्यात भांडण झाले. भांडणाचा निकाल लावण्यासाठी ते अस्वलाकडे गेले. अस्वलाने त्यांना भांडण्याचे कारण विचारले. त्यांनी सांगितले की, “आमच्या पैकी कोणाकडे संकट आले असता प्राण वाचविण्याच्या अनेक युक्त्या आहेत. परंतु, त्यावर एकमत होत नाही. तुम्ही निर्णय द्या.”

अस्वलाने पहिल्यांदा लांडग्याला विचारले, ’‘तुझ्याकडे किती युक्त्या आहेत?” तो म्हणाला, “शंभर.”

कोल्ह्याला विचारले, “तुझ्याकडे किती आहेत?”

तो म्हणाला, “एक हजार”

ससा आणि मांजर म्हणाले, “आमच्याकडे एकच युक्ती आहे.” प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी अस्वलाने सर्वप्रथम लांडग्यावर उडी मारली. हे पाहताच कोल्हा पळू लागला. एका हाताने अस्वलाने त्याची शेपटी धरून ठेवली. दोघांच्या खेचाखेचीत ती शेपटी अर्धी तुटली. ससा दोन पायांवर जोरात पळून गायब झाला आणि मांजराने उडी मारली आणि भरभर झाडावर चढून ते वर जाऊन बसले. वर बसल्या बसल्या मांजर म्हणते, “बरं झालं माझ्याकडे एकच युक्ती होती. त्यामुळे मी आता सर्वात वर बसले आहे आणि सुरक्षित आहे.”

 

कम्युनिस्टांना भारतीय जनतेने कधी फारसे जवळ केले नाही आणि २०१४ साली असे दाबले की, त्यांचा श्वासच कोंडला गेला आहे. हजार युक्त्या असणारे कम्युनिस्ट कोणतीही युक्ती काम करीत नाही म्हणून रडत बसले आहेत आणि भाजप सत्तेवर बसले आहे.

 

जगाच्या मार्गदर्शनासाठी आणि शोषितांच्या कल्याणासाठीच आपला जन्म झाला आहे. त्यामुळे मार्गदर्शन करणे हेच आपले काम आहे, असे त्यांना वाटते. २०१४ साली त्यांनी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. २०१९ सालीदेखील केला. हे दोन्ही जाहीरनामे मी वाचले. तेच शब्द, त्याच समस्या, तोच सेक्युलॅरिझम, तीच दलित हिताची बेगडी कळकळ, महिलांविषयी आस्था, हिंदूंना शिव्या, आर्थिक धोरण कसे फसले आहे, याची रडगाणे आणि परराष्ट्रनीती कशी वाईट आहे, याचे तुणतुणे दोनही जाहीरनाम्यात सारखेच आहेत. पहिला जाहीरनामा प्रकाश करात यांनी देशापुढे ठेवला. आज प्रकाश करात यांचे नाव घेतले तर लोकं विचारतील, “कोण प्रकाश करात?” सध्या सीताराम येचुरी जोरात आहेत. त्यांची अवस्था एका जहाजाच्या कप्तानासारखी आहे.

 

एक जहाज रात्रीचा प्रवास करीत होते. कप्तानाला खूप दूरवर उजेड दिसला. त्याने संदेश पाठविला की, “जहाज १० डिग्री दक्षिणेला वळवा.” उलटा संदेश आला की, “तुमचेच जहाज १० डिग्री उत्तरेला वळवा.” कप्तानाला राग आला. मी युद्धनौकेचा कप्तान आहे. समोरचा काय समजतो? म्हणून त्याने पुन्हा संदेश पाठविला. “मी युद्धनौकेचा कप्तान आहे, जहाज १० डिग्री दक्षिणेला वळवा, नाहीतर टक्कर होईल आणि मराल.” उलटा संदेश येतो की, “मी एक साधा खलाशी आहे आणि माझा दर्जा तिसर्‍या क्रमांकाचा आहे, तुमचे जहाज वळवा.” पुन्हा संदेश जातो. “मुकाट्याने १० डिग्री दक्षिणेला जा” आणि मग शेवटचा संदेश येतो, “मी लाईटहाऊसमधून (दीपस्तंभातून) बोलतोय. तुमचे जहाज १० डिग्री उत्तरेला वळवा.” भारताला वळविण्यासाठी मेनिफेस्टो जाहीर करणारे येचुरी, एनडीएरूपी दीपस्तंभावर आदळून जलसमाधी न घेवो, असे मला मनापासून वाटते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@