पर्यावरण रक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019
Total Views |



केशवसृष्टी प्रकल्प आपल्या अनेक आयामांच्या मदतीने गेल्या ३० वर्षांपेक्षा काळ अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे. केशवसृष्टीचा पर्यावरण विभाग ‘माय ग्रीन सोसायटी’द्वारे संपूर्ण देशात कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे, नदीशुद्धीकरण तसेच ‘माय ग्रीन सोसायटी’द्वारे ‘केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट’ या प्रकल्पांतर्गत शहरात कमीत कमी जागेत ‘अकिरा मियावाकी’ पद्धतीने ‘सिटी फॉरेस्ट’ उभारून पर्यावरणाचा ढासळता समतोल सुधारणे इ. विषयांच्या माध्यमातून आजच्या पर्यावरणासारख्या गंभीर समस्यांना सोडविण्याचे काम केले जात आहे.

 

केशवसृष्टीहा प्रकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावावर आधारित आहे. मुंबईजवळ भाईंदरच्या उत्तन गावामध्ये २०० एकर इतक्या निसर्गरम्य परिसरात हा प्रकल्प वसला आहे. दरवर्षी हजारो पर्यटक, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद तसेच, विविध विषयांची माहिती घेण्यासाठी केशवसृष्टी प्रकल्पाला भेट देतात. केशवसृष्टीचा परिसर अनेक दुर्लभ वृक्ष आणि आयुर्वेदिक वनस्पतींनी संपन्न आहे. ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’ हा केशवसृष्टीचा पर्यावरण आयाम आहे.

 

· ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’चे मुख्य उद्देश -

· मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना कचरामुक्त बनवणे.

· या शहरांतील नद्यांना पुनर्जीवित करणे.

· कचरा नियोजन आणि पर्यावरणाच्या बाबतीत जनजागृती करणे.

· पर्यावरणाला हानी पोहोचवणार्‍या ग्रीन हाऊस गॅसेस व कार्बन फूटप्रिंट यांना कमी करणे.

· देशाच्या इतर सर्व शहरांना कचरामुक्त बनविण्यासाठी आदर्श मॉडेल तयार करणे.

‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’द्वारा कचरा व्यवस्थापनासाठी राबविले गेलेली जनजागृती अभियाने

वेस्ट टू कंपोस्ट



शैक्षणिक वर्ष २०१७ -१८ मध्ये ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’ने ‘वेस्ट टू कंपोस्ट’ या नावाने महा जनजागरूकता अभियान राबविले होते. या अभियानात मुंबई विद्यापीठातील एनएसएस विभागाचे १५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरातल्या विविध सोसायट्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांशी कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग विषयावर संवाद साधला. 'Segregation Home, Compost Society' हा या अभियानाचा मूलमंत्र होता.

आशीर्वाद खाद

हजारो वर्षांपासून मठ व मंदिरे समाजात जनजागृती व समाज परिवर्तनाचे कार्य करीत आहेत. सीएसआर फंडिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रच्या ६० मंदिरांना कंपोस्टर उपलब्ध करून दिले. या सर्व मंदिरांत निर्माण होणार्‍या निर्माल्याचे मंदिराच्या प्रांगणात कंपोस्टरच्या माध्यमातून कंपोस्ट खातात रूपांतरण करून मंदिरांना कचरामुक्त बनविले. यामुळे मंदिरात येणार्‍या भाविकांना कंपोस्टिंगच्या प्रक्रियेची माहिती मिळाल्याने त्यांनीही आपापल्या घरी कंपोस्टिंग सुरू केले.

गुरुकुल कंपोस्ट

गुरुकुल कंपोस्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांच्या प्रांगणात कंपोस्टर लावून शाळा-महाविद्यालयांना कचरामुक्त करणे व विद्यार्थ्यांमध्ये ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयाबाबत जागृती निर्माण करणे. मठ-मंदिरांनंतर शाळा-महाविद्यालये म्हणजे सरस्वतीमातेच्या या मंदिरांना कचरामुक्त करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

मीरा-भाईंदर येथील वैकुंठभूमीमधील फुलांचे होत आहे कम्पोस्टिंग!

कचर्‍याचे व्यवस्थापन करायचे असल्यास कचरा निर्माण करणार्‍या मोठ्या जागेचे नियोजन करणे गरजेचे आहे. मंदिरे व विविध शाळा-महाविद्यलयांमधील कचर्‍याचे व्यवस्थापन सुरू केल्यानंतर ‘माय ग्रीन सोसायटी’च्या लक्षात आले की, अंत्यविधीसाठी आणण्यात येणार्‍या प्रेतासोबत फार मोठ्या प्रमाणात हार-फुले वैकुंठभूमीमध्ये जमा होतात. मीरा-भाईंदर महानगरपालिकेमधील प्रभाग क्र. १ चे सभापती सुनील अग्रवाल यांच्या सहकार्याने ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’ने प्रायोगिक तत्त्वावर भाईंदर पश्चिम येथील वैकुंठभूमीत कम्पोस्टर यंत्र लावले. मीरा-भाईंदरच्या महापौर डीम्पल मेहता यांनी या प्रकल्पाचे ४ जानेवारी, २०१९ रोजी उद्घाटन केले. सुरुवातीला ही वैकुंठभूमीमधील प्रेतावरील फुलांचे खत तयार करणे व ते वापरणे हे ऐकून थोडे विचित्र वाटत होते. परंतु, वैकुंठभूमीमधील सर्व सेवकांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा विषय मनावर घेत कम्पोस्टिंगबाबतची सर्व शास्त्रशुद्ध माहिती करवून घेतली. वैकुंठभूमीमधील सर्व निर्माल्याचे खतामध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली. आज वैकुंठभूमी संपूर्णपणे कचरामुक्त झाली असून, वैकुंठभूमीमध्ये येणारे नागरिकदेखील कम्पोस्टिंगची माहिती घेत आहे.

केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट

शहरांच्या वाढत्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’चा नवा उपक्रम ‘केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट.’ आज शहरांमध्ये प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर जागेचे दरदेखील प्रचंड वाढत आहेत. यामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा बसवून पर्यावरणाचा समतोल जपण्यासाठी ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’ने ‘केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट’ हा नवा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या उक्तीनुसार ‘केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट’ हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. ‘केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट’ हा प्रकल्प जपानी वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या (डेन्स फॉरेस्ट पद्धती) अध्ययनाच्या आधारे राबविण्यात येत आहे. या उपक्रमात भारतीय वंशाच्या वनस्पतींच्या साहाय्याने कमीत जागेत घनदाट जंगल निर्माण करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शहराचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाचा समतोल जपण्यास मदत होईल. तसेच ही छोटी जंगले पक्षांचा नवा निवारा बनतील. वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून ‘केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट’ ही प्रकृतीची श्वसन यंत्रणा बनेल. शहरातील अवघ्या एक हजार स्क्वेअर फूट जागेत सूर्यप्रकाशाच्या उपल्बधतेनुसार ८०० ते १२०० वृक्ष लावले जातात किंवा जागेनुसार ही संख्या वाढूही शकते.

‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’ने ‘केशवसृष्टी सिटी फॉरेस्टप्रकल्पांतर्गत मुंबई शहरात १०० जंगलांची निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात येत आहे. सध्या ११ शहरेही ‘सिटी फॉरेस्ट’ बनून तयार आहेत व ही निर्माण केलेली जंगले निसर्गाची सेवा करीत आहेत. या सर्व जंगलांमुळे जंगलांच्या आजूबाजूच्या परिसरात, वातावरणात झालेला बदल साफ दिसून येत आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे व विविध प्रजातींचे पक्षी येथे दिसून येतात. या ‘सिटी फॉरेस्ट’ला भेट देणार्‍या व्यक्तींनी त्याचे अभिप्राय देताना म्हटले, ‘आम्ही येथे आलो तेव्हा आम्हाला रोजच्या धकाधकीचे टेन्शन होते. मानसिक तणाव होता. परंतु, या ‘सिटी फॉरेस्ट’ला भेट देताना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यावर मन प्रसन्न झाले. मनावरील ताण नाहीसा झाला.’

आज संपूर्ण जग अनियमित पाऊस, दुष्काळ, महापूर अशा पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे हैराण झालेला आहे. यामुळे शेतीमध्येदेखील विविध प्रकारचे रोगांचे प्रादुर्भाव झाले आहेत.

अनियंत्रित जंगलतोड़, शहरांमध्ये वाढते प्रदूषण, विविध विकास कामांकरिता होणारी वृक्षतोड, नद्यांचे प्रदूषण या सर्वांमुळे संपूर्ण जग आज जागतिक तापमानवाढीच्या समस्येला तोंड देत आहे. निसर्गाच्या या दुर्दशेला आपण मानवच जबाबदार आहेत. निसर्गाचे हे होणारे नुकसान रोखणे हे प्रशासनाचे काम नसून, हे संपूर्ण मानवजातीचे काम आहे. म्हणून ‘माय ग्रीन सोसायटी’ सर्व नागरिकांना निवेदन करते, आपण सर्वांनी आपापला ठिकाणी अशी ‘सिटी फॉरेस्ट’ तयार करण्याचा प्रयत्न करून पर्यावरणाचे रक्षण करूया.

‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’ने तयार केलेल्या ‘सिटी फॉरेस्ट’चे यश पाहता वन विभाग महाराष्ट्र शासनाने ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’च्या कामाचे कौतुक करून महाराष्ट्र राज्याच्या जंगल निर्माण व सामाजिक वनीकरणाबाबत दिशानिर्देश समितीमध्ये सामील होण्यासाठी ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’ला निवेदन दिले आहे.

सीडबॉल मेकिंग’ कार्यशाळेचे आयोजन

मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसारख्या शहरी भागांमध्ये राहणार्‍या नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करून सामाजिक वनीकरण व वृक्षारोपण करण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता ‘केशवसृष्टी : मायग्रीन सोसायटी’ने आपल्या ‘सिटी फॉरेस्ट’ प्रकल्पांतर्गत ‘सीडबॉल मेकिंग’ कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

सीडबॉल मेकिंगकार्यशाळेत सहभागी होण्यासाठी शहरातील निवासी सोसायट्यांनी आपल्या सोसायटीच्या आवारात ‘सीडबॉल मेकिंग कार्यशाळे’चे आयोजन करावे. ‘केशवसृष्टी माय ग्रीन सोसायटी’द्वारे १ तासांचे ‘सीडबॉल मेकिंग’चे मोफत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच सीडबॉलसाठी लागणारे कच्चे सामानदेखील ‘माय ग्रीन सोसायटी’तर्फे पुरविण्यात येईल. वृक्षारोपण करण्यासाठी आपल्याला नियोजित ठिकाणी खड्डे खोदणे, त्यात खत टाकणे, त्यासोबत झाडांची कलमे इच्छित ठिकाणी घेऊन जाणे, त्यांना पाणी देणे इ. पूर्वतयारी करावी लागते. परंतु, सीडबॉलचा वापर करताना आपल्याला यापैकी काहीही करावे लागत नाही. सीडबॉल हे लाल माती, गोबर, गोमूत्र यापासून बनलेले असतात. त्यामुळे एखाद्या अंड्याप्रमाणे बीला उगविण्यासाठी लागणारी सर्व पोषक तत्त्वे या सीडबॉलमध्ये उपलब्ध असतात. हे सीडबॉल्स साधारण एक ते दोन महिने आपण जतन करून ठेवू शकतो आणि जेव्हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल तेथे फक्त आपल्याला हे सर्व सीडबॉल एखाद्या पिशवीतून घेऊन जावे लागतात. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आपण वृक्षारोपण करू शकतो. म्हणून हे सीडबॉल्स खूप उपयोगी आहेत.

ग्रामविकास व पर्यावरणाच्या रक्षणासाठी करावेच लागणार वृक्षारोपण

केशवसृष्टीच्याग्रामविकास योजनाया आयामातर्फे पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना विकासाकरिता दत्तक घेतले गेले आहे. शहरी युवांना ग्रामीण भागाशी जोडून गावांचा विकास करणे हा ‘केशवसृष्टी ग्राम विकास योजना संस्थे’चा मुख्य उद्देश आहे. गेल्या वर्षी याच संकल्पनेच्या आधारे ८०० शहरी युवांच्या मदतीने दोन तासांत ४२ गावांत १५ हजार वृक्ष लावले गेले. या उपक्रमाचे यश व लोकांचा उत्साह पाहता केशवसृष्टीने या वर्षी दीड लाख वृक्षारोपण करण्याचे ठरविले आहे. या अभियानाला सहकार्य करण्यासाठी ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’ने आपल्या ‘सिटी फॉरेस्ट’ प्रकल्पांतर्गत ‘सीडबॉल मेकिंग कार्यशाळे’चे आयोजन केले गेले आहे. या कार्यशाळेत तयार करण्यात येणार्‍या सीडबॉलमध्ये वापरल्या जाणार्‍या बिया या पालघर जिल्ह्यातील हवामानाला व तेथील जंगलांची गरज लक्षात घेऊन निवडण्यात आल्या आहेत. शहरातील विविध कार्यशाळांमध्ये तयार होणारे सीडबॉल हे पालघर जिल्ह्यातील जंगलांमध्ये वापरण्यात येतील.

केशवसृष्टी मायग्रीन सोसायटी

८३६९१९०१५९ / ९९३००४०२६०


सुरजबा विद्यामंदिर शाळेत आयोजित झाली पहिली
सीडबॉल मेकिंग’ कार्यशाळा

दि. १६ मार्च, २०१९ रोजी जोगेश्वरी पूर्वच्या सुरजबा विद्यामंदिर शाळेत ‘केशवसृष्टी : माय ग्रीन सोसायटी’च्या ‘सिटी फॉरेस्ट’ प्रकल्पाच्यांतर्गत ‘सीडबॉल मेकिंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध डॉ. अलका मांडके यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारोहात केशवसृष्टी संस्थेच्या विविध उपक्रमांचे पदाधिकारी, स्थानिक जन प्रतिनिधी, शेजारील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, नागरिक तसेच विशेष निमंत्रित नागरिक उपस्थित होते. १०.३० ते ११.३० पर्यंत चालणार्‍या या ‘सीडबॉल मेकिंग’ कार्यशाळेत १०० विद्यार्थी व ५० पालकांनी सहभाग घेतला. एक तास चाललेल्या या कार्यशाळेत ९५० सीडबॉल्स तयार करण्यात आले. हे सर्व सीडबॉल्स पालघर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी वापरण्यात येतील. हे सीडबॉल्स बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या बिया या पालघर जिल्ह्यातील हवामान व जंगलाची गरज लक्षात घेऊन निवडल्या गेलेल्या आहेत.

- नीलय चौबळ 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@